उत्कृष्ट संभाषण कौशल्यात रोजगाराच्या संधी – डॉ.प्रशांत पाटील
उदगीर (प्रतिनिधी) : समाजात बेरोजगारीवर चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. हे जरी वास्तव असले तरी विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असलेल्या कौशल्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. कॉर्पोरेट व तंत्रज्ञानाच्या या युगात उत्कृष्टपणे संभाषण साधण्याची कला अवगत केल्यास जगात इंग्रजी विषयात तरी रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणामध्ये दडलेल्या आहेत. असे विचार डॉ.प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले.
श्री हावगीस्वामी महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्यावतीने रोजगारासाठी संवाद कौशल्याचे महत्त्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी. एमेकर तर प्रमुख वक्ते म्हणून शिवनेरी महाविद्यालय शिरूर अनंतपाळ येथील इंग्रजी विभागात कार्यरत असलेले डॉ.प्रशांत पाटील उपस्थित होते. याशिवाय मंचावर इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. विठ्ठल गोरे, प्रा.जे.डी.संपाळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कु.श्रद्धा नागरगोजे यांनी स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविकात डॉ.विठ्ठल गोरे म्हणाले, कॉर्पोरेट क्षेत्रात बहुतांश ठिकाणी संभाषण कौशल्याला महत्त्व आहे. या संदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा.ज्योती पाटील यांनी करून दिला.
पुढे बोलताना डॉ.प्रशांत पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांने लेखन, वाचन, श्रवण व संभाषण कौशल्य विकसित करणे काळाची गरज आहे. शैक्षणिक गुणवत्तेला कौशल्याची जोड देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.जागतिकीकरणात इंग्रजी भाषेत तरी या सर्व कौशल्याला अधिक महत्त्व आज प्राप्त होत आहे. असे सांगत इंग्रजी साहित्य व विविध कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात कसे करावे? यावर त्यांनी भाष्य केले. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एन.जी.एमेकर म्हणाले, प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते कौशल्य असतेच. विद्यार्थ्यांनी त्या कौशल्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.आपल्यात असलेल्या कौशल्याचा विकास करण्यासाठी कष्ट व सातत्य टिकून ठेवणे गरजेचे आहे. सदरील कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रीतम दुधे, राम राठोड, राहुल कांबळे व इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जे.डी.संपाळे तर आभार डॉ.बालाजीप्रसाद घाळे यांनी मानले.