राजकीय इच्छशक्ती आणि लोकलढया अभावी मराठवाडा विकासात मागे – प्रा.डॉ.अशोक सिद्धेवाड

राजकीय इच्छशक्ती आणि लोकलढया अभावी मराठवाडा विकासात मागे - प्रा.डॉ.अशोक सिद्धेवाड

उदगीर (प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्ती लढ्याचे यशस्वी नेतृत्व करून मराठवाड्याला संयुक्त महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनविले. पुढे त्याच्या विकासासाठी गोविंदभाई श्रॉफ , सुधाकरराव डोईफोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सतत संघर्ष केला. त्यामुळेच मराठवाड्याला कृषी विद्यापीठ , ब्रॉडगेज आणि वैधानिक विकास मंडळ मिळाले, पण अलीकडे राज्यकर्त्यांचा मराठवाड्या प्रती उदासीन दृष्टिकोन आणि विभागीय विकासासाठी लोकांमध्ये लढा उभारण्याचा अभाव, यामुळे मराठवाड्याच्या विकासाची गती मंदावली आहे. असे प्रतिपादन नांदेड येथील पीपल्स कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.डॉ.अशोक सिद्धेवाड यांनी केले. ते उदगीर येथील दि. लिं. होळीकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर हे होते. मंचावर रमेश अबरखाने, प्रदीप बेद्रे, कॉ.के.के. जाबकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम जाधव व सत्कारमूर्ती किशन उगले हे होते.

‘मराठवाड्याचा विकास: वारसा आणि वास्तव एक दृष्टिक्षेप ‘ या विषयावर बोलताना डॉ. सिद्धेवाड पुढे म्हणाले की, प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास करणाऱ्या डॉ. वि.म.दांडेकर समितीसह अनेक समित्यांनी प्रगत महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्याचा अनुशेष प्रचंड असल्याचे सांगितले. तो अद्यापही पूर्ण झाला नाही. उलट तो वाढला हे वास्तव आहे. संयुक्त महाराष्ट्रासी समरस झालेल्या मराठवाड्याला नागपूर कराराप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात निधी ,शासकीय नोकऱ्या ,आणि प्रशासकीय सोयीसुविधा मिळाल्याशिवाय मराठवाड्याचा विकास होणार नाही. ही बाब त्यांनी उपस्थितांच्या नजरेस आणून दिली. अलीकडेच औरंगाबाद येथील मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मराठवाड्याचे मागासलेपण पुसून मराठवाड्याला एक प्रगत भाग बनविण्याचा जो संकल्प सोडला आहे. त्याचे स्वागत करून संकल्प आणि सिद्धी यातील मोठ्या अंतराचा अनुभव यापूर्वी मराठवाड्याने घेतला असूनही आम्ही आशावादी असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने किशन उगले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर किशन उगले यांनीही सत्काराला उत्तर म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत बिरादार यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा परिचय प्रा. डॉ. दत्ताहरी होनराव यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरभद्र स्वामी व डॉ .माधव कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुरलीधर जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास तुकाराम बिरादार,प्रकाश साखरे ,अनंत कदम ,बाबुराव सोमवंशी ,सुनील येणकीकर गोविंद सावरगाव ,सत्यजित येणकीकर, बाबुराव माशाळकर,डॉ.सुरेश शिंदे, डॉ.बालाजी सुर्यवंशी, बेलेकर ,प्रा.डॉ.दयानंद गुडेवार,प्रा.डॉ. गायकवाड, प्राचार्य जाधव, यांच्यासह अनेक नागरिक, प्राध्यापक ,शिक्षक, महिला, ग्रामस्थ इत्यादी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

About The Author