नागरिकांनी मनाची आणि परिसराचे स्वच्छता अभियान राबवा
अहमदपूर (गोविंद काळे) : भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, म्हणायचे आणि आपल्या घरातील केरकचरा रस्त्यावर टाकायचे ही कृती योग्य नसून राष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर सर्व नागरिकांनी मनाचे, आप आपल्या घराची व परिसराची मनोभावे स्वच्छता करा असे आग्रही प्रतिपादन उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले. ते दि एक रोजी नगरपरिषदेच्या प्रांगणामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून स्वच्छता पंधरवडा अंतर्गत एक तास एक साथ या अभिनव उपक्रमाच्या रॅलीला हिरवा ध्वज दाखवून उद्घाटन प्रसंगी बोलताना उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, सिनेट सदस्य निखिल कासनाळे, एस बी आय चे शाखा व्यवस्थापक सुरजकुमार कश्प, यशवंत विद्यालयाचे प्राचार्य गजानन शिंदे, राजकुमार गोटे, अशोक पेदेवाड, पापा आया यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. शहराच्या प्रमुख मार्गावरून स्वच्छता अभियान रॅली काढण्यात आली होती. कार्यक्रमाचा प्रारंभ नगर परिषदेच्या स्वच्छता दूतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून करण्यात आला.
यावेळी शहरातील प्रभाग 22 च्या सर्व विभागाची स्वच्छता करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने 22 स्वच्छता दूत पथकाची स्थापना करण्यात आली होती. यात यशवंत विद्यालय, महात्मा फुले महाविद्यालय, कमला नेहरू विद्यालय, डॉक्टर हरिवंश राय बच्चन विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संत तुकाराम नर्सिंग विद्यालय, सम्राट मित्र मंडळ, तुकोराय योगा ग्रुप, नगरपरिषद स्वच्छता कर्मचारी, शहरातील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, एन सी सी ,स्काऊट गाईड, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह स्वच्छता प्रेमी नागरिकांचा सिंहाचा वाटा होता. यावेळी डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, शिवानंद तात्या हेंगणे यांचे स्वच्छतेवर मनोगतपर भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि स्वच्छतेची शपथ उपक्रमशील शिक्षक राम तत्तापुरे यांनी दिली तर आभार प्रा. मारुती बुद्रुक पाटील यांनी मांनले. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेचा संपूर्ण स्टॉप, स्वच्छता कर्मचारी, विविध शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गणेश मंडळाचे पदाधिकारी, एन सी सी, स्काऊट गाईड यांनी विशेष परिश्रम घेतले.