श्रमदानातून श्रमप्रतिष्ठा निर्माण होते – डॉक्टर शरदकुमार तेलगाने

श्रमदानातून श्रमप्रतिष्ठा निर्माण होते - डॉक्टर शरदकुमार तेलगाने

उदगीर (एल पी उगीले) : समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वच्छतेचे महत्व सांगताना स्वतःपासून सुरुवात करून श्रमदान करावे. श्रमदान केल्यामुळे श्रमाला प्रतिष्ठा निर्माण होते. दुर्दैवाने कधीकाळी भारत देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती. त्यामुळे जो जे काम करतो, त्यावरून त्याची जात सिद्ध होत होती, पुढे पुढे या वर्णव्यवस्थेतूनच जाती व्यवस्था निर्माण झाल्या, आणि दुर्दैवाने समाजामध्ये मोठ्या प्रमाणात भेदाभेद सुरू झाली. या सर्व गोष्टीला मुठमाती देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छता आणि श्रम प्रतिष्ठेसाठी आपले जीवन वेचले. तो आदर्श प्रत्येकाने बाळगावा, असे आवाहन उदगीर येथील ख्यातनाम डॉक्टर शरदकुमार तेलगाने यांनी केले.

उदगीर येथील समता नगर परिसरात महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्रमदानाचे महत्व पटवून सांगताना ते बोलत होते. याप्रसंगी माजी नगरसेवक अशोक जमदाडे, आनंद बुंदे , माधव मोतीपवळे, शशिकांत झेरीकुंटे, चंद्रकांत डांगे, संजय वाघमारे, किशोर स्वामी, बालाजी भालेराव, श्रीडोळे, एरकुंदे, एनीले, ओमकार गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पुढे बोलताना डॉक्टर शरद कुमार तेलगाणे यांनी सांगितले की, महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास समाजातील भेदाभेद नष्ट होईल, जातियवाद नष्ट होईल, आणि आपण सारे एक आहोत. ही भावना निर्माण होईल. महापुरुषांनी श्रमदानासोबतच स्वच्छतेचे महत्त्वही पटवून दिले आहे. स्वतः सोबतच समाजाचे हित जोपासायचे असेल तर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. असेही आवाहन याप्रसंगी डॉक्टर शरदकुमार तेलगाणे यांनी केले.

About The Author