एनसीसी कॅडेट पंकज खिंडीवाले याचा थलसेना कॅम्प दिल्ली येथे सहभाग
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा एनसीसी कॅडेट सीनियर अंडर ऑफिसर पंकज खिंडीवाले हा राष्ट्रीय पातळीवरील थल सैनिक कॅम्प दिल्ली येथे सहभागी झाला होता. राष्ट्रीय पातळीवरील थलसैनिक कॅम्प दिल्ली व प्रजासत्ताक दिन कॅम्प, दिल्ली हे समान प्रतिष्ठेचा मानला जातात. या कॅम्पमध्ये निवड होण्याकरिता छात्रसैनिकांना विविध पातळीवरील स्पर्धेतून जावे लागते. या स्पर्धांमधून अव्वल आलेल्या छात्र सैनिकांची या कॅम्पसाठी निवड होते. कॅडेट पंकज खिंडीवाले याने स्नॅप शूटिंग (रायफल शूटिंग) या प्रकारात सदरील कॅम्प मध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता, तसेच राष्ट्रीय पातळीवरील या कॅम्प साठी त्याने महाराष्ट्र एनसीसी डायरेक्टोरेट च्या छात्र सैनिकांच्या पथकाचे नेतृत्व केले आहे. दिल्लीतील कॅम्प मधील उज्वल यश व कामगिरी मुळे त्याचा सत्कार महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके यांच्या हस्ते कॅडेट खिंडीवाले याचा शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के व एनसीसी कंपनी कमांडर कॅप्टन प्रा.डॉ.राम साबदे व प्रा.डॉ.गौरव जेवळीकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये प्राचार्य मस्के यांनी कॅडेट पंकज खिंडीवाले याच्या पासून प्रेरणा घेऊन या महाविद्यालयातून असे अनेक पंकज घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. व पंकजच्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात तिरुके यांनी एनसीसी चे छात्र सैनिक हे भारतातील तरुणाईचे नेतृत्व करणारे असून छात्रसैनिकांनी एनसीसीच्या माध्यमातून स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साधून देशाच्या विविध क्षेत्रात आपले योगदान व नेतृत्व द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली, छात्रसैनिकांनी पंकज सारखे यश संपादन करण्याचा प्रयत्न करावा, तसेच पंकजचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र उदयगिरीतील राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या छात्र सैनिकांनी सतत दुसऱ्या वर्षी दिल्ली येथील थैलसैनिक कॅम्प मध्ये सहभाग घेऊन यशाची परंपरा कायम ठेवली आहे. गतवर्षी याच महाविद्यालयाची छात्र सैनिक विभुते प्रणिता हिची राष्ट्रीय पातळीवरील थल सैनिक कॅम्प दिल्ली मधील सहभागासाठी निवड झाली होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन प्रा. डॉ. राम साबदे यांनी केले, तर सूत्रसंचालन कॅडेट सुषमा स्वामी हिने केले. पंकज खिंडीवाले या छात्र सैनिकाची थल सैनिक कॅम्प दिल्लीमध्ये निवड होण्याकरिता 53 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल हेमंत जोशी, प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल वाय.बी.सिंग , महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे एनसीसी कंपनी कमांडर कॅप्टन प्रा. डॉ. राम साबदे, बटालियनचे सुभेदार मेजर शंभू सिंग व सर्व पीआय स्टाफ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.