कृषि महाविद्यालयाचा रब्बी शेतकरी मेळावा वाढवणा बु. येथे संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाशी ( परभणी ) संलग्नित , डोंगरशेळकी तांडा येथील कृषि महाविद्यालयातील बी.एस्सी. कृषीच्या ” ग्रामिण कृषि जागरूकता कार्यानुभव व कृषि औद्योगिक संलग्नता – २०२३ उपक्रमांतर्गत कृषिकन्यांनी मौजे वाढवणा ( बु. ) येथील गायत्री मंदिराच्या सभामंडपामध्ये ” रब्बी पीक शेतकरी मेळावा ” आयोजित केला.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गंगाधररावजी दापकेकर ( सचिव, नंदीग्राम एवम ग्रामविकास संस्था, सुगाव ) , प्रमुख अतिथी तथा उद्घाटक नागेश थोट्टे ( सरपंच, वाढवणा , बु.) , विशेष अतिथी ङॉ.संग्रामजी पटवारी (अध्यक्ष, न.ए. ग्रा.संस्था ,सुगाव ) , पशुधन विकास अधिकारी ङॉ.सिताराम केंद्रे , माजी गटविकास अधिकारी विनायकराव पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंगदराव सुर्यवंशी , उपप्राचार्य ङॉ. आशोकराव पाटील, कृषि उद्योजक अक्षय हरनाळे, विश्वनाथ केसगीरे, राम मुळे, नागेश पाटील व भाऊसाहेब पाटील इत्यादी मान्यवरांच्या हस्ते हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून या शेतकरी मेळाव्याचे रीतसर उद्घाटन झाले .
कार्यक्रम समन्वयक डॉ. दिपाली कोकाटे यांनी सदरील रब्बी शेतकरी मेळावा आयोजनाची पार्श्वभूमी व महत्त्व प्रस्तावित केले . मेळाव्याच्या प्रथम सत्रामध्ये , डॉ. सीताराम केंद्रे यांनी सद्यपरिस्थितीत पशुधनामध्ये उद्भवलेल्या संसर्गजन्य लंम्पी आजाराची लक्षणे , करावयाचे प्रथमोपचार व रोगग्रस्त जनावरांचे विलगीकरण याविषयी सविस्तर माहिती दिली. विश्वनाथ केसगीरे यांनी गुळ उत्पादन उद्योगाची तांत्रिक माहिती देऊन त्यामधील समस्या व उपायोजना याविषयी मार्गदर्शन केले.नागेश पाटील यांनी शेतीला पूरक व किफायतशीर असा रेशीम शेती हा जोङव्यवसाय करावा , ज्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर आर्थिक उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत उपलब्ध होईल . यशस्वी दूध उद्योजक राम मुळे यांनी जातिवंत दुभत्या पशुधनांचे शेतकऱ्यांनी संगोपन व संवर्धन करून दुग्ध व्यवसायातून आर्थिक प्रगती साधावी , असे आवाहन केले .
तदनंतरच्या तांत्रिक सत्रामध्ये , कृषि महाविद्यालयातील तज्ञांनी अनुषंगि विषयांवर मार्गदर्शन केले . डॉ . विजय शिंदे यांनी हरभरा , करडई ( रबी पिके ) व तुर या पिकांवर प्रादुर्भाव करणाऱ्या व नुकसानकारक विविध किडींची ओळख आणि त्यांच्या बंदोबस्तासाठी करावयाच्या उपचारात्मक व नियंत्रणात्मक विविध भौतिक , रासायनिक व जैविक पद्धती बाबतचे सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. तेजस्विनी जाधव यांनी , रब्बी हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या हरभरा , करडई, राजमा , ज्वारी इत्यादी इत्यादी पिकांमध्ये पेरणीपूर्वी करावयाच्या विविध बीज प्रक्रिया , बियाणे उगवणक्षमता तपासणी आणि बीज प्रक्रियेचे विविध फायदे याबद्दल सविस्तर केले . प्रा .बी.बी.निमनवाड यांनी सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञानाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंगदराव सुर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले की माती , पाणी , किङ रोग तपासणी , योग्य निदान व त्यावरील उपाय योजनांच्या तांत्रिक सल्ल्याची मोफत सेवा महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांकडून उपलब्ध केली जाईल , याचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा. असे आवाहन केले . तसेच , शेतीविषयक अद्यावत तंत्रज्ञान ,शेतीपुरक विविध व्यवसाय व अनुषंगिक क्षेत्रांतील शास्त्रोक्त माहिती परिसरातील शेतकऱ्यांसाठी या महाविद्यालयातून देण्याचे कार्य अविरतपणे चालूच राहील , असे उपस्थितांना आश्वासित केले .
अध्यक्षीय समारोपामध्ये गंगाधररावजी दापकेकर यांनी संबोधित केले की , या कृषी महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या दर्जेदार शैक्षणिक सुविधा , तज्ञ प्राध्यापक , शेतीतील नाविन्यपूर्ण पथदर्शी प्रयोग , आधुनिक कृषी तंत्रज्ञान व अनुषंगिक सोयी – सुविधांचा परिसरातील शेतकरी बांधवांनी हक्काने लाभ घेऊन आपली व आपल्या कुटुंबाची उन्नती साधावी , असे आवाहन केले .
कार्यक्रम समन्वयक ङॉ. दिपाली कोकाटे , कार्यक्रम अधिकारी प्रा. शितल पाटील यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली , मौजे वाढवणा (बु ), किनी (य ) व एकुरका रोड येथील कृषि कन्यांनी , सदरील रब्बी शेतकरी मेळाव्याचे सुनियोजित आयोजन केले . या मेळाव्यास परिसरातील शेतकरी बंधू-भगिनी , ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक , व्यवसायिक आणि महाविद्यालयातील प्रा. एस. व्हि. जाधव, ङाॅ. पि. एच राठोङ, ङाॅ. के.पी जाधव, ङॉ. ङि. जी. पानपट्टे, ङॉ. एस.बी. माने, ङॉ. एस.एल. खटके, ङॉ.एस.एन. वानोळे, प्रा. व्हि. एल. सोमवंशी, प्रा. एन. बी .राठोड, प्रा. हमाने , इतर प्राध्यापक , प्राध्यापीका , कर्मचारी , विद्यार्थी – विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शितल पाटील यांनी केले आणि विद्यार्थिनी निकिता पाटीलने उपस्थितांचे ऋणनिर्देश व्यक्त केले.