माध्यमामुळे बालसाहित्याला गती – डॉ.विद्या सुर्वे बोरसे
उदगीर (एल.पी.उगीले) : पूर्वी बालसाहित्याचा अवकाश शहरांनीच व्यापलेला होता,परंतु आज माध्यमामुळे बालसाहित्य वाड्या तांड्यावर पोहचले आहे. माध्यमामुळे लेखकांना नवा वाचक घडविण्याची आज संधी मिळत आहे. एकंदरीत बालसाहित्याच्या पर्यावरणात माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत डॉ.विद्या सुर्वे बोरसे यांनी व्यक्त केले. श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्राच्यावतीने आभासी स्वरूपात आयोजित पंचधारा व्याख्यानमालेचा समारोप समारंभ संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, नाशिक येथील मराठी विभागप्रमुख डॉ.विद्या सुर्वे बोरसे या उपस्थित होत्या.
बालसाहित्य संशोधन आणि उपयुक्तता या विषयावर पुढे बोलताना डॉ.विद्या सुर्वे बोरसे म्हणाल्या , बालसाहित्याच्या जडणघडणीत साहित्य अकादमी, किशोर मासिक, वर्तमानपत्राच्या पुरवण्या, विविध संमेलने, चर्चासत्र , परिसंवाद व भाषांतर यांचा देखील सिंहाचा वाटा आहे.बाल साहित्यिक व समीक्षकांचा शासनाकडून वेळोवेळी सन्मान झाला पाहिजे. यामुळे लेखकांना अधिक जबाबदारीने लेखन करण्याचे भान येईल.बालसाहित्याचे संशोधन करताना कोविड काळातील बालकांचे भावविश्व यासारखे वर्तमान काळातील विषय व समस्या लक्षात घेणे आवश्यक आहे.बालसाहित्याचे लेखन व संशोधन जबाबदारीने करणे काळाची गरज आहे. बालकांची दैनंदिनी पाहिली तर अतिशय चिंताजनक आहे.अनेक बालक पब्जी, गेम्स व मोबाईलमध्ये अधिक रस घेत आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी निष्क्रिय होत आहेत. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी दर्जेदार बालसाहित्य निर्माण करणे व त्यावर चांगली समीक्षा करणे काळाची गरज आहे. यावेळी त्यांनी बालसाहित्य लिहिणाऱ्या लेखकाची व समीक्षकांची परंपरा सांगत, बालसाहित्याला वाहिलेल्या विविध नियतकालिकांचे संदर्भ देत हे साहित्य किती महत्त्वाचे आहे? या संदर्भात विस्ताराने अभ्यासपूर्ण विवेचन केले. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर म्हणाले, बालसाहित्याच्या संशोधकासाठी आजचे हे व्याख्यान अतिशय उपयुक्त होते. मुलांचे संगोपन, विकास व समस्यांच्या निराकरणासाठी बालसाहित्याची नितांत गरज आहे.सदरील कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध परिसरातून संशोधक मार्गदर्शक व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभाशी स्वरूपात आयोजित पंचधारा व्याख्यानमालेचा लाभ महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक व तेलंगण राज्यातील संशोधकांनी देखील घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक डॉ.म.ई.तंगावार तर आभार मराठी विभागप्रमुख डॉ.सुशीलप्रकाश चिमोरे यांनी मानले.