खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी उंचावण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ राबवणार – ना.संजय बनसोडे

0
खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी उंचावण्यासाठी 'मिशन लक्ष्यवेध' राबवणार - ना.संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले): राज्यातील खेळाडूंची कामगिरी सातत्याने उंचावण्यासाठी योजनाबध्द कृती कार्यक्रम क्रीडा विभागाने हाती घेतला आहे. राष्ट्रीय क्रीडा व खेलो इंडिया, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत खेळांडूना केंद्र बिंदू मानून खेळाडू व स्पर्धा केंद्रीत ‘मिशन लक्ष्यवेध’ आराखडा तयार करण्यात आला आहे. मंत्रीमंडळाने क्रीडा विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून मिशन लक्ष्यवेध ही महत्वकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे, असे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. क्रीडा क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार करण्यात येणार असून या योजनेच्या संनियत्रणासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे रुपांतर महाराष्ट्र क्रीडा प्राधिकरण (स्पोर्टस अथॉरिटी ऑफ महाराष्ट्र) करण्यात येणार आहे, असे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे म्हणाले.

मिशन लक्ष्यवेध
प्रथम टप्प्यात 12 खेळ निश्चित केले असून यामध्ये ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शुटींग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस व टेबल टेनिस या खेळांचा समावेश आहे. या खेळांची ‘हाय परफॉर्मन्स सेंटर’ राज्यात विविध ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे. तसेच विभागीय स्तरावर 37 स्पोर्टस एक्सलन्स सेंटर व जिल्हास्तरावर 138 क्रीडा प्रतिभा विकास केंद्राची स्थापना करण्यात येणार आहेत. जिल्हा विकास आराखडा तयार करुन 10 टक्के निधी क्रीडा विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. पुणे येथेील शिवछत्रपती क्रीडा संकुलात अत्याधुनिक सुसज्ज असे स्पोर्टस सायन्स सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. तसेच विभागीय व जिल्हास्तरावर खेळाडूंसाठी समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. त्याद्वारे खेळाडूंना करिअरच्या संधीची माहिती दिली जाणार आहे.

मिशन लक्ष्यवेधसाठी 160 कोटी निधी,
निवडलेल्या 12 खेळ प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. 160 कोटी निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तसेच प्रशिक्षण केंद्र व इतर सुविधांकरता जिल्हास्तरावर अंदाजे 55 कोटी, विभागीय स्तरावर 55 कोटी आणि राज्यस्तरावर 50 कोटी खर्च अपेक्षित आहे.

3 हजार 740 खेळाडूंच्या अद्ययावत क्रीडा प्रशिक्षणाची व्यवस्था
जिल्हास्तरावर 138 क्रीडा प्रतिभा विकास केंद्राची स्थापना करण्या येईल. त्याचबरोबर विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण 37 स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटरची स्थापना करण्यात येईल. त्याचप्रमाणे राज्यस्तरावर 12 हाय परफॉर्मन्स सेंटरची स्थापना करण्यात येईल. या माध्यमातून जिल्हास्तरावर 2 हजार 760, विभागीयस्तरावर 740 आणि राज्यस्तरावर 240 अशा एकूण 3 हजार 740 खेळाडूंच्या अद्यावत क्रीडा प्रशिक्षणची व्यवस्था केली जाणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *