शाहु महाराजांची आदर्श राजा, बहुजनांचे नेते म्हणुन असलेली ख्याती कायम आहे – प्रा. कारामुंगीकर

शाहु महाराजांची आदर्श राजा, बहुजनांचे नेते म्हणुन असलेली ख्याती कायम आहे - प्रा. कारामुंगीकर

अहमदपूर (गोविंद काळे) : रयतेचा राजा, छत्रपती शाहु महाराज एक आदर्श महाराजा, बहुजंनाचे, दलित समाजाचे नेते म्हणुन असलेली ख्याती कायम आहे असे प्रतिपादन येथील यशवंत क.महाविद्यालयातील प्रा. बालाजी कारामुंगीकर यांनी केले.
ते बामसेफ (कांशीरामजी प्रणित), लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ लसाकम, गुरु रविदास समता परिषद अहमदपूर यांच्या संयुक्‍ती विद्यमाने आयोजित छत्रपती शाहु महाराज यांच्या 147 व्या जयंती निमित्‍त आयोजित कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणुन बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घाटनांदुर येथे कार्यरत असलेले डॉ. सखाराम वाघमारे हे होते.
पुढे बोलताना प्रा. कारामुंगीकर म्हणाले की, छत्रपती शाहु महाराजांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून सबंध भारतात साजरा केला जातो. खरोखरच त्यांनी सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी शैक्षणिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे. स्वतःच्या संस्थानाला प्रगतिपथावर घेवून जाणारे छत्रपती शाहू महाराज एकमेव राजे आहेत. त्यांच्या कार्याची संपूर्ण भाारतातच नव्हे तर जगभरात त्यांच्या कार्यावर अभयास करण्यात आला आहे. एक आदर्श महाराजा, बहुजन आणि दलित समाजाचे नेते म्हणुन असलेली त्यांची लोकप्रियता कायम टिकुन आहे. त्यांच्या कार्यामुळे त्यांचे व्यक्‍तिमत्व संस्थानापर्यंत मर्यादित न रहाता ते जगभर लोकप्रिय झाले आहे. प्रिन्सिपल मॅकनॉटन यांचे मार्गदर्शन लाभले, दत्तोबा शिंदे आणि पांडु भोसले यांनी मल्ल विद्या शिकवली. राजकीय, भौगोलिक, शैक्षणिक, सामाजिक तसेच राज्यकारभार कसा चालवावा यासंबंधी एस.एम. फ्रेजर यांचे मार्गदर्शन शाहु महाराजांना लाभले.अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मिस क्लार्क नावाचे वसतिगृह सुरु केले. तसेच व्हिक्टोरिया, नामदेव , विरशैवलिंगायत, श्री प्रिंस शिवाजी मराठा बोर्डिंगची, शिवकंठी शेष समाज अशा अनेक वसतिगृहांची स्थापना शाहु महाराजांनी केली.वेदोक्त प्रकरणामुळे शाहु महाराजांच्या मनावर परिनाम झाला होता. राष्ट्रपिता म. फुलेंनी सुरु केलेल्या ब्राम्हणेत्तर चळवळीचे नेतृत्व शाहु महाराजांनी केले. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करणे, धार्मिक बंधनातुन मुक्त करणे, राजकीय हक्क मिळवुन देणे यासाठी ते आयुष्यभर कार्य केले. राजर्षि शाहु महाराजाने मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा आदेश काढला. 1918 मध्ये सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची पहिली शाळा करवीर मधील चिखली या गावी सुरु झाली. खामगाव येथील अधिवेशनात स्वातंत्र्याविषयी ते म्हणतात शिक्षणाशिवाय मागासलेल्या समाजाची प्रगती होणार नाही. देशाची उन्‍नती करावयाचे असेल तर शिक्षण हाच एक मार्ग आहे. स्वराज्याविषयी शाहु महाराज म्हणातात कि, जितक्या लवकर आम्ही जातीचे बंधने तोडुन टाकु तितक्या लवकर आपली स्वराज्याची लायकी वाढत जाईल. सर्वांना समान संधी या विचाराचे शाहु महाराज होते असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सखाराम वाघमारे म्हणाले की, छत्रपती शाहु महाराजांच्या विचारांचा व कार्याचा आढावा घेतल्यास बहुजन समाज शिकुन शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्रय, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाही हे शाहु महाराजांनी ओळखुन आपल्या संस्थानात सक्‍तीचा मोफत शिक्षणाचा कायदा केला होता त्याच बरोबर खेडयापाडयात मुलांना उच्च शिक्षणासाठी सुविधा मिळायला पाहिजे म्हणुन आपल्या संस्थानात विविध जाती धर्मासाठी अनेक वसतिगृहे, शाळा, महाविद्यालये उभी केली होती. बहुजन समाजाच्या विकासासाठी छत्रपती शाहु महाराजांनी 50 टक्के शासकीय नौकर्‍यात मागासवर्गीयांना आरक्षण देणारा क्रांतीकारी निर्णय लागु केला होता. छत्रपती शाहु महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुकनायक या वृत्‍तपत्राला व त्यांच्या इंग्लडमधील शिक्षणाला अर्थसहाय्य केले होते. जातीप्रथा व अस्पृश्यता निवारणासाठी जीवनभर कार्य केले. त्याचबरोबर चहा, कॉफी, रबर यांच्या उत्पादनाचे नवे प्रयोग जयसिंगपुर आणि शाहुपुरी सारखी नवी बाजारपेठ कोल्हापुर ही गुळाची मोठी बाजारपेठ, राधानगरी सारखे धरण, मल्‍ल विद्येची पंढरी, संगीत, चित्रकला, नाट्यकला, तमाशा यांना राजाश्रय दिला होता. म्हणुनच शाहु महाराज रयतेचे राजे, शेतकर्‍यांचे कैवारी होते असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी रमेश भालेराव यांनी मनोगत व्यक्‍त केले, प्रास्ताविक गणेश वाघमारे यांनी केले तर उत्कृष्ठ सुत्रसंचलन गंगाधर साखरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अंकुश पोतवळे मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लसाकम तालुका अध्यक्ष रमेश भालेराव, अ‍ॅड रमेश गायकवाड, प्रा. दिलीप भालेराव, सुग्रीव बेले, सचिव डी. एस. वाघमारे, श्रावण वाघमारे, दशरथ शिंदे, शिवाजी कांबळे, अंकुश पोतवळे, मनोहर माने, नरसिंग कांबळे, विश्‍वंभर जिवारे, संजीव वाघमारे, बाबासाहेब कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

About The Author