कर्मसंन्यास व कर्मयोग हे दोन्ही परम कल्याणकारी आहेत – ह.भ.प.प्रशांत महाराज खानापूरकर
उदगीर (एल.पी.उगीले) : अर्जुन म्हणतात हे कृष्णा ! मागे तुम्ही कर्मांच्या संन्यासाची आणि आता पुन्हा कर्मयोगाची प्रशंसा करीत आहात. तरी या दोघा पैकी एक माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याण कारक साधन असेल.कर्मसंन्यास व कर्मयोग हे दोन्ही परम कल्याणकारी आहेत.परंतु या दोघा पैकी कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोग हा आचरण करायला सोपा असल्याने तो श्रेष्ठ आहे.असे ह.भ. प. प्रशांत महाराज खानापूरकर डोंगरशेळकी ता.उदगीर येथे संतपीठात भागवत कथेच्या पाचव्या दिवसी भाविकांना मार्गदर्शन करतांना सांगत होते.पुढे बोलताना ते म्हणाले , जो कोणीही द्वेष करीत नाही आणि कशाचीही आकांक्षा करीत नाही, तो कर्मयोगी सदा संन्यासी समजणे योग्य आहे,कारण आसक्ती-द्वेषादी द्वंद्वांपासून रहित पुरुष अगदी सुख बंधनातून मुक्त होतो.मूर्ख लोक संन्यास व कर्मयोग यांना निरनिराळी फळे देणारी मानतात.सांख्य मार्गाने जाणाऱ्यांना परम धाम मिळते,तेच कर्म योगाच्या मार्गाने जाणाऱ्यांनाही मिळते. म्हणून जो पुरुष ज्ञानयोग व कर्मयोग यांना फळ रूपाने एकत्र पाहतो, तोच यथार्थ पाहतो.कर्मयोगा शिवाय होणाऱ्या संन्यासाची अर्थात मन, इंद्रिये व शरीराद्वारे होणाऱ्या सर्व कर्मांमध्ये त्यागाची प्राप्ती होणे कठीण आहे. परंतु भगवद्स्वरूपाचे मनन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याची शीघ्र प्राप्ती करतो, ज्याने मन वश केले आहे,जो जितेंद्रिय व शुद्ध अंत:करणाचा आहे. तसेच प्राणिमात्रांच्या आत्म्याशी ज्याचा आत्मा एकरूप झाला आहे,असा कर्मयोगी सर्व कर्मे करीत असूनही अलिप्त राहतो. तत्त्ववेत्ता स्पर्श करणे,वास घेणे,खाणे, चालणे, झोपणे, श्वासोच्छ्वास करणे, बोलणे, देणे,घेणे, डोळ्यांची उघडझाप करणे या सर्व क्रिया इतरा प्रमाणेच करीत असला तरी सर्व इंद्रिये आपापल्या विषयांत वावरतात.आज कथेत दही हंडी फोडण्यात आली या दही हंडीला बालगोपाळासह डोंगरशेळकी व पंचक्रोशीतून भाविक मोठ्या संख्येत उपस्थित होते.