खरिपाच्या पूर्वसंध्येला सोयाबीनच्या भावात घसरण, खताचे भाव मात्र वाढले !
उदगीर (एल.पी. उगिले) : सध्या लग्नसराईचे दिवस असून आज किंवा उद्या आपल्या सोयाबीनला भाव वाढेल, या आशेवर शेतकरी बसला होता. गेल्या वर्षभरात सोयाबीनला भाव वाढ मिळाला नसल्याने, भाववाढीच्या आशेवर ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीचे सोयाबीन आपल्या घरीच साठवून ठेवले होते. त्यांना आता एकतर लग्नसराईसाठी नाहीतर खरिपाच्या तयारी साठी कवडीमोल भावात सोयाबीन बाहेर काढणे क्रमप्राप्य ठरले आहे. एका बाजूला शेतमालाचे भाव घसरू लागले आहेत, तर दुसऱ्या बाजूला आता खरीप मशागती करून बियाणे आणि खताची तयारी करावे म्हणताच, खताचे भाव वाढीस लागण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 10: 26 : 26 या खताला पूर्वी 1470 रुपये भाव होता, मात्र आता नवा दर 1700 रुपये झाला आहे. तसेच 24: 24: 00 या खताला जुने दर पंधराशे पन्नास होते, आता नवीन दर 1700 रुपये झाले आहेत. तसेच 20: 20: 0 .13 या खताचे पूर्वीचे दर बाराशे 50 होते, आता ते 1450 झाले आहेत. तसेच सुपर फॉस्फेटचाही भाव 500 हून सहाशे रुपयांवर गेला आहे. आपल्या मालाची किंमत घसरत जाते आणि जो माल आपल्याला घ्यायचा आहे, त्याची किंमत मात्र वाढत जाते, अशा दुहेरी अडचणीत शेतकरी सापडला आहे. तसेच शेती मशागतीसाठी नांगरणी करावी म्हटले तर डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीमुळे ट्रॅक्टरचे भावही प्रति एकरी दोनशे रुपयांनी माहागले आहेत. या सर्व दुष्टचक्रामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडून पडले आहे. सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता असतानाच केंद्र सरकारने सोयाबीन वर आधारित इतर घटक मोठ्या प्रमाणात आयात केल्यामुळे सोयाबीनच्या भाव वाढीची आशा आता पूर्णपणे मावळलेल्या आहेत. सोयाबीनच्या दरात काही केल्या वाढ होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर साडेचार हजाराच्या आसपास जो भाव मिळेल त्या भावात सोयाबीन विक्रीला काढण्याची तयारी शेतकरी करत आहे. ही एक शेतकऱ्याची फार मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. इतर वेळेस हमीभावाच्या गप्पा मारणारे पुढारी सध्या गायब आहेत. निवडणुकीचे वारे त्यांना गप्प बसू देत नसल्याने ते खोटी आश्वासने देण्यात मजबूत आहेत.
शेतकरी मात्र अर्थव्यवस्थेच्या दृष्ट चक्रात फसत चालला आहे आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठीचा खर्चही वाढत चाललेला आहे, शिक्षणाची फीस भरमसाठ वाढलेली आहे त्यात भरीस भर म्हणजे जवळपास सर्व शेतकरी सोसायटीचे पीक कर्ज सावकारी कर्ज घेऊन कर्जबाजारी झालेले आहेत त्यामुळे त्यांना बाजारातही कोणी सावकार आता पैसे द्यायच्या मनस्थिती मध्ये नाही. एक तर पैसे परतफेडीची शाश्वती उरलेली नाही. त्यात हमीभावाची ही आता कोणती आशा शिल्लक राहिलेली नाही.
सतत दुर्लक्षित असलेला घटक शेतकरी ठरत असून शेतकऱ्याचे दुःख पहायला कुणालाही वेळ नाही. पुढारी आपापल्या भागात राजकारणात मश्गुल आहेत. बी बियाणे, खते कशी घ्यावीत? याची चिंता शेतकऱ्यांना आहे. आजपर्यंत साठवून ठेवलेले सोयाबीन आता विक्री केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. काही शेतकऱ्यांच्या घरी लग्नकार्य असल्यामुळे कर्जबाजारी होणे त्यांना क्रमप्राप्य ठरू लागले आहे. जे काय थोडेफार सोयाबीन साठवून ठेवले असेल ते कवडीमोल भावात बाजारात विक्रीसाठी आणले जात आहे. पुढील महिन्यात तर आणखी आवक वाढेल आणि भाव पुन्हा कोलमडतील अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये चालू आहे.
हरभऱ्यामध्ये देखील भाव घसरत चालल्याची चिंता शेतकरी वर्ग करत आहेत. अचानक वाढलेल्या खताच्या भावामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. हताश, निराश झालेला शेतकरी विम्याची रक्कम मिळेल म्हणून तरी आशा ठेवून होता, मात्र ती देखील अशा पूर्ण होत नसल्याची जवळपास खात्रीच होऊ लागली आहे. मध्यंतरीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसाने बागायतदार शेतकऱ्यांना देखील चांगलाच तडाका दिल्यामुळे त्या शेतकऱ्यांची देखील आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहेत. बागायती आणि विशेषतः आंब्याची बाग करणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळी आणि वादळी पावसाने चांगलेच अडचणीत आणले आहे.
राज्यात लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्याने आणि आचारसंहितेचा बडगा असल्यामुळे तसेच नेते आणि अधिकारी वर्गाला शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी करायला ही वेळ मिळाला नसल्याने, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला कसलाही आर्थिक लाभ झाला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक विमंचनेत सापडलेला आहे.