पशुसखीनी शाश्वत उत्पन्नासाठी मूल्यवर्धनाकडे वळावे – प्रा. डॉ. अनिल भिकाणे
उदगीर (एल.पी.उगीले)
पशुसखींमध्ये उद्यमिता रूजली पाहिजे. शेळीच्या दुधापासून चीज, पनीर इत्यादी मुल्यवर्धित पदार्थ पशुसखींनी बनविले पाहिजे. अधिक अर्थार्जनासाठी शेळीपालक पशुसखींनी लेंडीखत आणि गांडूळखत निर्मितीचे मार्ग चोखंदळावेत. असे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक प्रा. डॉ. अनिल भिकाणे यांनी उदगीर पशुवैद्यक महाविद्यालयात माविम पुरस्कृत पहिल्या पशुसखी प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी आभासी पद्धतीने प्रमुख अतिथी म्हणून केले. पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. नंदकुमार गायकवाड हे अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. भिकाणे पुढे म्हणाले की, शेळीपालकांना मुल्यवर्धनातून अधिक अर्थप्राप्ती होऊ शकते. त्याकरिता पारंपरिक दृष्टिकोण सोडून, उद्यमितेच्या दृष्टीने शेळीपालन केल्यास पशुसखींना उत्पन्नाचा एक शाश्वत मार्ग प्राप्त होऊ शकतो. असा विश्वास प्रकट केला. समारोप प्रसंगी पशुसखींसोबत चर्चा करून क्षेत्रातील त्यांचे कार्यानुभव आणि प्रशिक्षणाचा त्यांनी आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. गायकवाड म्हणाले की,
नवतंत्राच्या यशस्वी प्रयोगाचे समाजात वेगाने अनुकरण होत असते. त्यामुळे प्रशिक्षित पशुसखींनी आत्मसात केलेले ज्ञान आणि कौशल्य स्वत: च्या गोठ्यात प्रथम उपयोगात आणावे. पशुवैद्यकीय क्षेत्रात उपलब्ध संशोधन आणि या संशोधनाचा पशुपालकांच्या गोठयातील प्रत्यक्ष उपयोग, यात फार मोठी तफावत आहे. ही दरी कमी करण्यासाठी अशा तंत्रज्ञानाच्या प्रसाराला गती मिळणे आवश्यक आहे. प्रशिक्षणातून आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग पशुसखीने स्वतः आपल्या गोठ्यात करून इतरांना त्याबाबत प्रेरित करावे असे आवाहन केले.
समारोप प्रसंगी मंचावर माविम लातूरचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी दीपक टेकाळे आणि प्रकल्प सह-समन्वयक डॉ. नरेंद्र खोडे हे उपस्थित होते. डॉ. धनंजय देशमुख, प्रकल्प समन्वयक यांनी आभासी पद्धतीने तसेच सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी दीपक टेकाळे यांनी पशुसखींना यथोचित मार्गदर्शन केले. दि. २३ ते २७ डिसेंबर २०२४ दरम्यान घेण्यात आलेल्या श्रुंखलेतील या पहिल्या पाच दिवसीय प्रशिक्षणात लातूर जिल्ह्यातील २६ पशुसखी महिलांनी हिरीरीने सहभाग घेतला. प्रकल्प सह-समन्वयक डॉ. नरेंद्र खोडे यांनी प्रास्ताविक केले.
प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या पशुसखींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. मंगल कलढोणे, अश्विनी मस्के, रत्नमाला देडे, मुक्ता कांबळे, रुक्मिणी बैकरे, सुलताना शेख, आणि माया गायकवाड या पशुसखी महिलांनी प्रशिक्षणा बाबत अभिप्राय व्यक्त केला.
सूत्रसंचालन डॉ. राम कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. मत्स्यगंधा पाटील यांनी केले. प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी प्रशिक्षण समन्वयक डॉ. शरद आव्हाड समवेत आयोजन समिती सदस्य, पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. संकेत नरवाडे, डॉ. अयान पाटील, डॉ. वेदान्त पांडे, डॉ. सुहासिनी हजारे, आणि डॉ. विनोद जाधव यांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, कर्मचारीगण, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.