वाचन संस्कृती समृद्ध झाल्यास मानसिक दृष्ट्या सशक्त होता येईल – अर्चना मिरजकर

उदगीर (प्रतिनिधी)
वाचन ही एक प्रकारे मेंदूला व्यायाम देणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे वाचन संस्कृती विकसित झाल्यास मानवाचा ताणतणाव, चिंता दूर होऊन मन स्थिर राहील. नियमित वाचन केल्यास मनाची एकाग्रता वाढेल, वाचनामुळे शब्दसंग्रह देखील वाढतो. वाचन संस्कृती रुजत गेल्यास बौद्धिकते बरोबरच माणूस मानसिक दृष्ट्या देखील अतिशय समृद्ध होतो. असे विचार प्रसिद्ध लेखिका श्रीमती अर्चना मिरजकर यांनी व्यक्त केले. त्या उदगीर येथील श्री हावगी स्वामी महाविद्यालयातील ग्रंथालय व मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “ग्रंथ माझा सखा” या विषयावर आभासी स्वरूपात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.जी.एमेकर हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून लेखिका, युट्युब होस्ट व कॅनडाच्या दुतावासात वरिष्ठ माहिती आणि जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती अर्चना मिरजकर या उपस्थित होत्या. याशिवाय बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय कोनाळी येथील अध्यक्ष शिवाजी बिरादार, उपप्राचार्य डॉ. काळगापुरे यांची उपस्थिती होती.
सुरुवातीला प्रास्तावित मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सुशील प्रकाश चिमोरे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय इंग्रजी विभागाचे प्रा. मनोहर भालके यांनी करून दिले. याप्रसंगी पुढे बोलताना श्रीमती अर्चना मिरजकर म्हणाल्या की, आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक जण स्क्रीनवर वाचन करत आहेत, परंतु ते आरोग्यासाठी घातक आहे. पुस्तक वाचण्याचा आनंद खूप वेगळा असतो. मनशांती व मनोरंजन यासाठी देखील वाचन नितांत गरजेचे आहे. वाचनामुळे माणूस बहुश्रुत होतो. ग्रंथ एका अर्थाने आपल्याला स्फूर्ती देतात, प्रेरणा देतात. आपला आत्मविश्वास वाढवतात. इतकेच नव्हे तर वाचन ही सहनिर्मिती देखील असते असे सांगत त्यांनी आपल्याला लेखन व वाचनाची जडणघडण कशी झाली? यावर सविस्तर असे भाष्य केले. यावेळी शिवाजी बिरादार, उप प्राचार्य काळगापुरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष समारोप प्राचार्य एम जी एमेकर म्हणाले, आज माणूस जीवनात आनंद व समाधान हरवत चाललेला आहे, अशा काळात माणसाला ग्रंथच तारू शकतात. वाचन संस्कृती ही एक चळवळ म्हणून पुढे यायला हवी. ज्यामुळे मानसिक दृष्ट्या समृद्धता निर्माण होईल असे सांगितले .
या कार्यक्रमासाठी आभासी स्वरूपात दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा राज्यातील विविध महाविद्यालयाच्या प्राचार्य व अभ्यास मंडळाचे सदस्य, ग्रंथपाल, प्राध्यापक, विद्यार्थी , विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार बोईने व विभागातील प्राध्यापकाने प्रयत्न केले. सूत्रसंचालन डॉ. म.ई. तंगावार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक आजित रंगदळ यांनी केले.