राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्याचे काम बंद आंदोलन
आंदोलनात महिलांचाही सहभाग
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर शहरा लगत जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 नागपूर -रत्नागीरीच्या अहमदपूर बाह्य वळण रस्त्याच्या काम कल्याण टोल इन्फ्रा स्ट्रकचर लि. इंदौर या कंपनीने सुरुवात केली असता मावेजाच्या अनुषंगाने अन्याय झालेल्या भुमीग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने आज काम बंद आंदोलन करण्यात आले.
या विषयीची अधिक माहीती अशी की, अहमदपूर शहरालगत (बायपास) जात असून रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची यासाठी जवळपास १५० शेतकऱ्याच्या जमीनी संपादित झाल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना या जमिनीच्या मावेजापोटी उपजिल्हाधिकारी यांनी खरेदीखता आधारे सरासरी २९०२ रूपये प्रती चौरस मीटर भाव निश्चित केला असता त्याला हायवे प्राधिकाराने आक्षेप घेतला असता ते प्रकरण लवादाकडे गेले. जिल्हाधिकारी हे लवादाचे प्रमुख असतात तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी दोन्ही बाजूच्या पुराव्याचा सखोल अभ्यास न करता वेळ काढू भुमिका घेत कर्तव्यात कसुर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसुन केवळ ६७९ रुपये प्रती चौ.मी.प्रमाणे दर निश्चित करून घोर निराशा केली असून या दरातील तफावतीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत.
यावेळी आंदोलनात शेतकऱ्यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांनी अपील मध्ये मंजूर केलेला ६७९ हा प्रती चौरस. मीटर दर खूप कमी आहे.संपादीत शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या प्लॉटिंग व हायवे लगत असल्यामुळे हा दर खुपच कमी व अन्यायकारक आहे व तो आम्हास मंजूर नाही. सदरचा दर हा चुकीचे निकष लावून देण्यात आलेला आहे.तालुक्यातील ग्रामीण भागापेक्षाही कमी दर देण्यात आलेला आहे.या संदर्भात २५ नोव्हेंबर २०२० च्या निकालाचा फेर विचार करून समृद्धी महामार्गाप्रमाणे मावेजा देण्याची विनंती करण्यात आली आहे आणि जर या निकालाचा फेर विचार नाही केल्यास राष्ट्रीय महामार्गाचे काम सबंधित शेतकरी होऊ देणार नाहीत.व वेळ प्रसंगी सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांना संपादीत जमिनीच्या मोबदल्याच्या दराचा फेरविचार करण्याची मागणी यापूर्वी जिल्हाधिकारी, लातूर यांना तसेच उपजिल्हाधिकारी अहमदपूर यांना निवेदनाद्वारे केली असूनही त्याचा फेर विचार झाला नसल्याने त्यानंतर अन्याय झालेल्या भुमीग्रस्त शेतकऱ्यांनी दि. १६ जुलै २१ रोजी अहमदपूर येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद करणार असल्याचे सांगुन ही अद्याप त्याची दखल घेतली गेली नव्हती.
या काम बंद आंदोलनात अन्यायग्रस्त शेतकरी प्रा. गोविंदराव शेळके, शाम भगत, बालाजी बोबडे, गोविंद भगत, सरपंच गोपाळ पाटील, बाबुराव भगत, विकास बोबडे, संजय बोबडे, संग्राम भगत, नामदेव सातापूरे, अॅड. सादीक शेख, माऊली बडगीरे, अनिल फुलारी, विजय पाटील, दिनेश भगत, ईस्माईल शेख, महेश पाटील, चैतन्य बोबडे, पंढरी बिलापट्टे, महेश बिलापट्टे, नंदु भगणूरे, मुस्ताक बक्शी, हर्षद बोबडे, गजानन हाडोळे, रमाकांत चेवले, लक्षिमण चेवले, भानुदास भगत, बाबुराव बिलापट्टे, माऊली बिलापट्टे, धर्मराज चावरे, वसंत डावरे, सुमनबाई शेळके, पार्वतीबाई साळुंके, लक्ष्मीबाई भगत, प्रतिभा बोबडे, चंद्रकला भगत, सुंदरबाई भगत, रंजना भगत, लिंबाबाई भगत, अनुसया भगत आदीं अन्यायग्रस्थ शेतकरी यांनी आंदोलन करून काम बंद पाडले. या आंदोलनामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, पोलीस उपनिरिक्षक एकनाथ डक, पो.हे.कॉ. एस.डी.भिसे, पो.ना.अभिजित लोखंडे, पोहेकॉ बेल्लाळे, ए एस आय आलापुरे आदींनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.