जागतिकीकरण आणि वर्तमानकालीन आंबेडकरी कविता – भरतकुमार शिवाजीराव गायकवाड
आज सर्वत्र एकाच गोष्टीची चर्चा होत असते ती म्हणजे जागतिकीकरण…! भारतात इ.स. १९९० च्या सुमारास जागतिकीकरणाला सुरुवात झाली. म्हणजे जवळपास तीस वर्षापासून आपण जागतिकीकरणात वावरतोय. जागतिकीकरणाचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रावर परिणाम झालेला आहे. कुटुंब व्यवस्था, विवाह पद्धती, स्त्री-पुरुष संबंध, जातीव्यवस्था, भाषा इत्यादी घटकावर जागतिकीकरणाचा मोठा प्रभाव पडलेला आहे. लहान मुले, तरुण वर्ग आणि वृद्धांच्याही जीवनशैलीत जागतिकीकरणामुळे बराच बदल झालेला दिसून येत आहे. समाजजीवनाच्या वेशभूषा, केशभूषा, खाण्या-पिण्याच्या पद्धती आणि भाषाशैली यातही प्रामुख्याने दिवसेंदिवस बदल होत आहेत.
जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे संपूर्ण समाज जागृत झाला आहे. जागतिकीकरणाचे बरे-वाईट परिणाम सर्वसामान्य माणसांवर होत आहेत. साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असते. अगदी त्याप्रमाणेच जागतिकीकरणानंतर झालेला सामाजिक बदल मराठी साहित्यात मोठ्या प्रमाणात मांडला गेला आहे. मराठी साहित्यात सर्वप्रथम जागतिकीकरणाची मांडणी करणारा साहित्यप्रकार म्हणजे आंबेडकरी कविता होय. गेल्या दोन-तीन दशकात अनेक आंबेडकरी कवींनी जागतिकीकरणाबाबत आपली विद्रोही मते मांडली आहेत. पण वर्तमानकालीन आंबेडकरी कवितेचे जागतिकीकरणात काय स्थान आहे? या दृष्टीने मूल्यमापन होणे गरजेचे वाटते.
जागतिकीकरण : जागतिकीकरण म्हणजे व्यापार, वित्त, रोजगार, तंत्रज्ञान, दळणवळण, स्थलांतर, पर्यावरण, राहणीमान, फॅशन, समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, संस्कृती, भाषा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमधून होत राहणारे रूपांतर होय. जागतिकीकरणाच्या मुळाशी खाजगीकरण आणि उदारीकरण या दोन संकल्पना दडलेल्या आहेत. म्हणजेच ‘खाऊजा ‘ हे धोरण गरीब लोकांचे रक्त शोषण करून नवे साम्राज्य निर्माण करणारे आहे. सध्या जागतिकीकरणाचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागत आहेत. जागतिकीकरणानंतर समाजासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जो अगोदरच वंचित, शोषित घटक म्हणून ओळखला जात होता त्या घटकाचे पुन्हा नव्याने शोषण होऊ लागले आहे. रोजगाराच्या वाटा बंद झालेल्या आहेत. कोरोना महामारीमुळे तर या समस्येत आणखी वाढ झालेली आहे. रोजीरोटीचा प्रश्न प्रत्येकापुढे उभा आहे. म्हणजेच जागतिकीकरण हे समाज व्यवस्थेला आव्हान देणारे धोरण आहे. जागतिकीकरणामुळे मानवी मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. प्रामाणिकपणा, आदर, देशभक्ती, सहकार्य, प्रेम, सहिष्णुता इत्यादी मानवी मूल्यांचा ऱ्हास होत आहे. स्वातंत्र्याचा अतिवापर, अप्रामाणिकपणा, देशद्रोह, असहिष्णुता, न्याय व समतेचा अभाव, स्वार्थी वृत्ती अशा प्रवृत्ती समाजात वाढलेल्या दिसत आहेत. त्याचबरोबर जागतिकीकरणाचा भाषेवरही परिणाम झालेला आहे. जागतिकीकरण हे इंग्रजी भाषेचा पुरस्कार करते. जागतिकीकरणात नकळत मराठी भाषा व मराठी भाषेतील विविध बोलींचा ऱ्हास होताना दिसत आहे. एवढेच काय…जागतिकीकरणामुळेच मराठी शाळा मोठ्या प्रमाणावर बंद पडत आहेत. जागतिकीकरणात जगतील फक्त श्रीमंत लोक… आणि शिकतील फक्त श्रीमंताचीच पोरं. कारण जागतिकीकरणामुळे गरीब आणखी गरीब होत चाललाय आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होत चाललाय. जागतिकीकरणामुळे गरीब जनतेला जगण्यासाठी जो संघर्ष करावा लागत आहे त्याला कोण जबाबदार आहे? खेड्यापाड्यातील लोकांचे पारंपरिक व्यवसाय बंद पडत आहेत. शहरातील मोठ्या व्यवसायिकांसोबत शहरात जाऊन ते टक्कर देऊ शकत नाहीत. मग अशा गोरगरिबांनी जगायचं कसं? जागतिकीकरणामुळे निर्माण होत चाललेली सामाजिक विषमता हा आंबेडकरी मराठी कवितेचा चिंतनाचा विषय आहे. वेदना, विद्रोह, नकार मांडण्याचे धाडस केवळ आंबेडकरी कविताच करू शकते. समाजात कृतीमरित्या होऊ घातलेल्या दडपशाहीला विरोध करण्याचे काम साहित्याद्वारे प्रथमतः आंबेडकरी कवितेनेच केलेली आहे. आंबेडकरी कवितेचे हे वेगळेपण नोंदवणे महत्त्वाचे वाटते.
आंबेडकरी कवितेचे स्वरूप : आंबेडकरी कविता म्हणजे ज्यात आंबेडकर आणि बुद्ध आहेत ती कविता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञानाआधारे समाज परिवर्तनाची जाणीव आणि त्या प्रयत्नांना मार्गदर्शन करणारी बुद्धाची सम्यक विवेकाची जाणीव, अशा दोन जाणिवांनी ‘आंबेडकरी कविता’ निर्माण होते. मराठी साहित्यामध्ये आंबेडकरी मराठी कवितेचा खूप मोठा वाटा आहे. आंबेडकरी कविता ही सामाजिक विषमतेला नष्ट करणारी कविता आहे. आंबेडकरी कविता ही संविधानाच्या मूल्यांची समाजात पेरणी करणारी कविता आहे. आंबेडकरी कविता ही समाजासमोर निर्माण होणाऱ्या विविध प्रश्नांच्या विरोधात लढणारी कविता असते. प्रस्थापित मराठी कवितेपेक्षा परिवर्तनशील कवितेचा आशय आंबेडकरी कवितेत पाहायला मिळतो. आंबेडकरी कवींची पहिली पिढी ही अत्यंत विद्रोहाने पेटून उठली होती. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक, नामदेव ढसाळ, दया पवार, यशवंत मनोहर, अर्जुन डांगळे, ज. वि. पवार, बाबूराव बागूल इत्यादी कवींनी मराठी साहित्याला खऱ्या आंबेडकरी कवितेची ओळख करून दिली. त्यानंतर ज्योती लांजेवार, लोकनाथ यशवंत, अरुण काळे, प्रज्ञा लोखंडे, भुजंग मेश्राम यांसह इतर अनेक कवींनी आंबेडकरी कवितेच्या जाणिवेला जिवंत ठेवण्याचे काम केले.
जागतिकीकरणाच्या भांडवलदारी व्यवस्थेला खरे आव्हान देण्याचे काम आंबेडकरी कवितेने केले आहे. आंबेडकरी कवितेबाबत आपले मत मांडताना पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे लिहितात, “गेल्या काही दशकात आंबेडकरी दलित कविता ओसरली आहे की, काय असा अनुभव येत आहे. परंतु जोवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान आहे तोपर्यंत कविता साजिवंत असणारच.” आंबेडकरी कविता ही स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांचा स्वीकार करणारी कविता असते. समाजविघातक गोष्टींना सुरुंग लावण्याचे काम आंबेडकरी कविता करीत असते.
मराठी साहित्यात विविध वाङ्मय प्रकार आहेत. त्यात ‘आंबेडकरी मराठी कविता’ हा महत्त्वाचा वाङ्मय प्रकार आहे. या वाङ्मय प्रकाराने मराठी साहित्यात मोलाची भर टाकली आहे. गेल्या दोन-तीन दशकातील आंबेडकरी कवितेपेक्षा वर्तमानकालीन आंबेडकरी कवितेचा अभ्यास करणे मला महत्त्वाचे वाटते. वर्तमानकालीन आंबेडकरी मराठी कविता प्रमुख्याने डॉ. राजकुमार मस्के, डॉ. मारोती कसाब, डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे, डॉ.मिलिंद बागुल, डॉ.व्यंकट सूर्यवंशी, प्रा.चंद्रशेखर मल्कमपट्टे, प्रा.संजय कसाब, सतीश नाईकवाडे, अंकुश सिंदगीकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, प्रफुल्ल धामणगावकर इत्यादी आणि इतर काही कवी समृद्धपणे कविता लिहिताना दिसतात.
आंबेडकरी कवितेची प्रेरणा : एखाद्या साहित्यिकाला साहित्य निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारी ‘प्रेरक शक्ती’ म्हणजेच प्रेरणा होय. आंबेडकरी कवितेची प्रेरणा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा. भारतीय संविधानाला आंबेडकरी कवी आपला प्राण मानतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच दलितांना माणूसपण बहाल झाले. दलितांमध्ये आत्मविश्वास, आत्मसन्मान बाबासाहेेेेब आंबेडकर यांंनीच निर्माण केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलितांना सन्मान मिळवून देणाऱ्या लढ्याचा आणि आंबेडकरी कवितेचा फार जवळचा संबंध आहे. महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश, मनुस्मृतीचे दहन यासोबत विविध राजकीय चळवळींद्वारे बाबासाहेबांनी तळागाळातील माणसांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा त्यांनी दिलेला संदेश दलित कवितेला नेहमीच प्रेरणादायी ठरलेला आहे. दलित कविता ही आंबेडकरांच्या क्रांतिकारी चळवळीतून निर्माण झालेली आहे. म्हणूनच दलित कवितेला ‘आंबेडकरी कविता’ असेही म्हटले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी विचार हेच आंबेडकरी कवितेचे निर्मितीकेंद्र आहे. अनेक कवींनी आपल्या विद्रोही लेखनाची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर असल्याचे नमूद केले आहे. तसेच अनेक कवींनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
जागतिकीकरण आणि वर्तमानकालीन आंबेडकरी कविता : कवीला किंवा लेखकाला आलेले अनुभव त्यांच्या साहित्याद्वारे प्रतिबिंबित होत असतात. इ.स. १९९० नंतर लिहिणाऱ्या कवींनी त्यांच्या कवितांमधून जागतिकीकरणाचा विशेष संदर्भ दिलेला दिसून येतो. जागतिकीकरणानंतर आंबेडकरी कवितेची दिशा बदलली आहे. कारण जागतिकीकरणानंतर सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात पसरली आणि सामाजिक विषमता हाच आंबेडकरी कवितेचा चिंतनाचा विषय बनला.
खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या धोरणामुळे असंख्य गरीब कुटुंबे अक्षरशः उध्वस्त झाली आहेत. अगोदरच अन्न- पाण्याविना तडफडणाऱ्या माणसांना या धोरणामुळे पुन्हा शोषिकतेला, दुर्बलतेला सामोरे जावे लागत आहे. गुलामी, लाचारी पत्करत व्यवस्थेपुढे झुकावे लागत आहे. थोडक्यात, जागतिकीकरणामुळे दलित, पीडित व शोषितांना त्यांचे माणूसपण नाकारण्याचे नवे डाव आखले जात आहेत. या विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध वर्तमानकालीन आंबेडकरी कविता समर्थपणे लढा देत आहे.
जागतिकीकरण आणि कवितेचा अनुबंध स्पष्ट करताना प्रा. मारोती कसाब लिहितात, “१९९० नंतर सुरू झालेले खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण हे जीवनाच्या हरेक क्षेत्रांमध्ये प्रभाव गाजवू लागले आहे. परिणामी सामान्य माणसांची घुसमट होऊ लागली आहे. त्यामुळे सहसा चिंतनाला कुणाला वेळच मिळत नाही. अशा परिस्थितीत कोंडलेल्या श्वासांना मोकळे करण्यासाठी कविता हाच वाङ्मय प्रकार निवडला जात असल्याचे दिसून येते.”२ जागतिकीकरणानंतरच्या अनेक कटू जाणीवा आंबेडकरी कवीला अस्वस्थ करतात. त्या अस्वस्थतेतूनच आंबेडकरी कवितेचा जन्म होतो. जागतिकीकरणामुळे सामाजिक चळवळी थंडावल्या आहेत. चळवळीबाबत भाष्य करताना प्रा. मारोती कसाब म्हणतात, “चळवळीचे शत्रू सावध असतात. मात्र ज्यांच्यासाठी चळवळ चालवायची तेच गाफील असतात. म्हणून चळवळीला खोडा बसतो. लाचार, हलकट, खबरे, हुजरे, लाळघोटे हेच शत्रूच्या अमिषाला बळी पडतात.”३ नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये असलेली एकजूटही जागतिकीकरणामुळे विस्कळीत झाली आहे. याविषयी आपले मत मांडताना प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर लिहितात,
” बहुजनांचे कैवारी
आपल्याच वर्तुळात भांडत बसले
मी मोठा तू मोठा
या वादात सगळेच रुसले
चळवळीला सुरुंग लावणारे मात्र
एकत्र येऊन हसले”
अनेक उच्चशिक्षित दलित तरुणांसमोर खाजगीकरणामुळे जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘गावात घर नाही, शिवारात शेत नाही’ अशा परिस्थितीसमोर हाताश झालेल्या तरुणांनी जगायचे तरी कसे? सध्या सरकारी नोकऱ्या संपुष्टात आणण्याचा घाट सुरू आहे. खाजगीकरणाच्या नावाखाली उच्चशिक्षित तरुणांचे जगणे विद्रूप करण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा वेळी कवी छगन घोडके तरुणांना सावधानतेचा इशारा देताना म्हणतात,
“एकीकडे जागतिकीकरण-खाजगीकरण
अजूनही प्रश्न आमचा
रोटी, कपडा और मकान
हे भांडवलवादाचं तुफान”
अगदी प्राचीन काळापासून जाती-धर्मातील उच्च-नीच भेद चालत आलेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे भेद थांबवण्याचे प्रयत्न केले पण तरीही उच्च-नीच भेदाची परंपरा आजही काही ठिकाणी पहावयास मिळते. जागतिकीकरणामुळे तर या परिस्थितीत आणखी वाढ झालेली आहे. पारंपरिक समाजविघातक रूढी-परंपरांना नकार देत माणूस म्हणून एकजुटीने जगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. एकमेकांच्या जाती-धर्माला आपण सतत दोष देत असतो. त्यापेक्षा आपण जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेचा धर्म टिकवला पाहिजे. जातीसाठी माती खाणाऱ्यांचे भले होत नाही. हा संदेश देताना सुशीलप्रकाश चिमोरे म्हणतात,
“नको जातधर्म,
एका आईचे आपण मुले
जातीसाठी माती खाऊन
भले कोणाचे झाले”
जागतिकीकरणाने जाती-धर्मात दरी निर्माण केलेलीच आहे. पण जागतिकीकरणाचे दूरगामी परिणाम असंख्य कुटुंबावरही झालेले आहेत. जागतिकीकरणामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. महाराष्ट्रातील लोक मुंबई, पुणे यासारखी मोठी शहरं सोडून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपमध्ये स्थलांतरित होत आहेत. आई-वडील गावात किंवा पुण्या-मुंबईत आणि त्यांची मुलं परदेशात अशा कितीतरी घटना आज आपणास पहावयास मिळत आहेत. जन्मदात्या आई-वडीलांना न सांभाळता त्यांना दूर लुटणारी पिढी हा जागतिकीकरणाचाच परिणाम. आई-वडिलांच्या उतार वयाकडे दुर्लक्ष करत त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवणाऱ्या मुलांची संख्या येथे कमी नाही. अशा वेळी समाजमनाचा बारकाईने अभ्यास करणारे कवी डॉ. मिलिंद बागूल वृद्ध आई-वडिलांच्या व्यथा मांडताना म्हणतात,
“वृद्धाश्रमाकडं बोट दाखवीत
मुलगा दाखवतो वाट
असे अनेक आहेत बाप
कुणी पेन्शनर, शेतकरी मजूर
खरंच कुणीतरी सांगा,
आपणही होणार असतो बाप
मग का विसरतो आपलाच बाप”
जागतिकीकरणामुळे मराठी साहित्यात अमुलाग्र बदल झालेला आहे. कारण माणसांच्या जगण्यात- वागण्याच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे हे प्रतिबिंब साहित्यातून उमटताना दिसते. जागतिकीकरणानंतरच्या परिणामांचे अनेक बारकावे आंबेडकरी कवितेत अनेक कवींनी रेखाटलेले आहेत.
जागतिकीकरणाचा धर्म हा फक्त घेणे आहे, देणे नाही. जागतिकीकरणामुळे सध्या दंश करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. याविषयी संवेदनशील मनाचे कवी डॉ.राजकुमार मस्के यांनी विनोदी शैलीत जागतिकीकरणानंतरच्या झाडांविषयी केलेले विवेचन महत्वाचे वाटते. ‘जागतिकीकरणातील उतणारी झाडं’ या कवितेत ते म्हणतात,
“जागतिकीकरणातली ही झाडं आहेत
घेणेच ज्यांचा धर्म आहे…
दंश करणारीच झाडं लावली
दोष लावणाऱ्यांचाच आहे”
अनेक आंबेडकरवादी कवींनी जागतिकीकरणाला विनोदाच्या माध्यमातून मांडले आहे तर काही कवींनी जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्येविषयी थेट शासनव्यवस्थेला जाब विचारला आहे. समाजाच्या मतावर निवडून आलेले असंवेदनशील राज्यकर्ते विविध गंभीर सामाजिक प्रश्नांवर जेव्हा डोळेझाक करतात तेव्हा अशा राज्यकर्त्यांना कवीने नालायकपणाची उपमा दिलेली आहे. राज्यकर्त्यांच्या अशा वर्तनामुळे लोकशाहीचा घात होत आहे असे मत मांडत कवी अंकुश सिंदगीकर ‘सवाल’ या कवितेत लिहितात,
“जागतिकीकरण उदारीकरण
राज्यकर्त्यांच्या नालायकीपणाची देण हाय
हाच लोकशाहीचा घात हाय
अडाणी जनता त्यावर जगता
जाग तुला कवा येणार हाय
सांग कवा गरिबी हाटणार हाय”
अठराविश्व दारिद्र्य, गरीबी, उपासमार या गोष्टी गरिबांच्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत. येथे लोकशाही फक्त नावालाच आहेे. जिकडे बघावे तिकडे हुकुमशाहीचा बाजार दिसतोय. सर्व शिक्षा अभियानांतर्गत बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा नियम आहे. पण पोटाचा प्रश्न मिटत नसल्यामुळे गरिबांची बहुसंख्य मुलं रस्त्यावर, बस स्थानकात, रेल्वेेत भीक मागताना दिसतात. हॉटेलात वेटर म्हणून काम करताना दिसतात. जागतिकीकरणामुळे बालमजुरांची संख्या वाढलेली आहे. हॉटेलात काम करणाऱ्या बालमजुराने शाळेत एकदाच बाबासाहेब वाचले आणि त्याच्या जीवनात झालेेेले परिवर्तन मालेगाव येथील कवी समाधान शिंपी यांनी त्यांच्या कवितेत अतिशय समर्पकपणे रेखाटले आहे. ते ‘पुन्हा एकदा बाबासाहेब…’ या कवितेत लिहितात,
“तेरा-चौदा वर्षाचं वय
अजाण असलं तरी
परिस्थितीने मात्र
परिपक्व बनवलं होतं
खेळण्या-बागडण्याचं वय
कपबश्यांच्या गराड्यात
अन् हॉटेलच्या धुरड्यात
अडकलं होतं…”
जागतिकीकरणाने गरिबांच्या पोरांच्या नशिबी बालमजुरी लादलेली आहे. अशा बालमजुरांचे भविष्य अंधकारमय असते. पण एखाद्या बालमजूरला बाबासाहेब समजले म्हणजे त्याला शिक्षणाचा अर्थ नक्कीच समजेल. बाबासाहेबांचा विचार जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणणारा विचार आहे. ‘बाबासाहेब’ या नावातच खूप मोठी शक्ती आहे. ती शक्ती सर्वसामान्य माणसांना संघर्षाकडून समृद्धीकडे घेऊन जाते. पण फक्त बाबासाहेब वाचले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत. हे सांगताना समाधान शिंपी लिहितात,
” अशाही परिस्थितीत
प्रवास करीत होतो
संघर्षातून समृद्धीकडे
कारण
शाळेत एकदाच
वाचले मी
बाबासाहेब..! “
बाबासाहेबांच्या विचारांची जादू ही जागतिकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्येतून वाट काढणारी आहे. जागतिकीकरणामुळे मानवी मूल्यांचा ऱ्हास झपाट्याने होत चालला आहे. बदलत्या मानवी वर्तनामुळे कुटुंबव्यवस्था मोडकळीस येत आहे. या सर्व गोष्टींचे निरीक्षण नोंदवत आंबेडकरी कवितेने मराठी साहित्यात मोलाची भर टाकली आहे. जागतिकीकरणानंतर उद्भवलेल्या अनेक सामाजिक अडचणींचे संदर्भ आंबेडकरी कवितेत मोठ्या ताकतीने मांडण्यात आले आहेत. जागतिकीकरणामुळे सामाजिक मूल्ये हरवलेल्या समाजात पुन्हा समतेची मूल्ये प्रस्थापित होतील असा आशावाद निर्माण करण्यात आंबेडकरी कविता यशस्वी झाली आहे. जागतिकीकरणानंतरच्या वर्तमानकालीन आंबेडकरी कवितेचा विचार केला तर असे दिसते की, समाज व्यवस्थेत झपाट्याने बदल होत आहेत. या बदलांबरोबरच माणसांसमोरील समस्याही वाढत आहेत. समाजातील बदलांचे प्रतिबिंब आंबेडकरी मराठी कवितेत स्पष्टपणे उमटत आहे. कवितेच्या माध्यमातून जागतिकीकरणानंतरच्या समाजजीवनाचे प्रभावी चित्रण करण्याचा प्रयत्न आंबेडकरी कवींनी केलेला आहे. जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण या धोरणाच्या प्रभावामुळे सर्वसामान्य माणूस खचला गेला आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत. शिक्षण क्षेत्रातही भ्रष्ट प्रवृत्ती वाढल्या आहेत. जातीव्यवस्था दिवसेंदिवस बळकट होऊ पहात आहे. विकासाची विविध केंद्रे शोषणाची केंद्रे बनली आहेत. जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या नव्या व्यवस्थेचा सर्वसामान्य माणूस बळी ठरत आहे. आंबेडकरी कविता या सगळ्या बदलांना सशक्तपणे सामोरे जाताना दिसते.