नांदूरमध्यमेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे भरतपूर !!
महाराष्ट्रातील पाहिले रामसर पाणथळ
निफाड / नाशिक ( दत्तू वाघ ) : महाराष्ट्रामध्ये कॅलिफोर्निया समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्याच्या पर्यटनात वाढ करणारे जागतिक क्रमवारीत २४१० आणि भारतातील ३४ व्या क्रमांकाचे नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य ठरले आहे.
महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिमेकडील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे गोदावरी व कादवा नदी च्या संगमावर १९०७-१३ साली ब्रिटिशांनी दगडी बंधारा बांधण्यात आला. गंगापूर व दारणा धरणातून सोडलेले पाणी या भागात साठवून इथे शेती सिंचनाची सोय व्हावी अशी उद्दिष्टे ठेऊन बंधारा बांधण्यात आला होता.
दारणा व गंगापूर पाणवठ्यातुन सोडलेलं पाणी या भागात साचून असायचे व पाण्याचा फुगवटा कायम असायचा.बंधाऱ्यांतील
पाणी पुढे दोन्ही बाजूंच्या कालव्यांद्वारे सोडण्यात येऊ लागले. त्यामुळे गाळ, दलदल, गाळ साठून नदीपात्रात उंचवटे अशी भूरूपे तयार झाली.
जलाशयातील उथळ पाणी, पाण्यातील विपूल जलचर, विविध पाण वनस्पती, किनाऱ्याला असलेली वनराई आणि जवळच्या सिंचित शेतातील पिकं यामुळे पक्षांसाठी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य आकर्षणाचे ठिकाण झाले असून त्यांच्या निवासाचे ठिकाण बनलं.
पक्ष्यांना खाद्य म्हणून आवश्यक असलेले मासे,शैवाल , दलदलीतील कीटक येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे येथे पक्ष्यांची संख्या वाढत गेली.
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील एक
उत्तम ‘पक्षीतीर्थ’ बनले आहे.
,पक्षी निरीक्षणातून येथे २४० हून अधिक प्रकारचे पक्षी असल्याचे आढळून आले आहे. येथील जलाशयात २४ जातीचे मासे आहेत.
१९८२ मध्ये ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ डॉ सालीम अली
यांनी नांदूर मधमेश्वरला भेट दिली आणि “हे तर महाराष्ट्राचे भरतपूर आहे” असे उद्गार काढले आणि महाराष्ट्र सरकारला हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्याची विनंती केली.जवळपास चार वर्षांनी पुढे २५ फेब्रुवारी १९८६ रोजी हा परिसर नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला.
,
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य चा भारतीय पक्षीतीर्थ म्हणून समावेश
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य परिसर हा ११९८.६ हेक्टर किमी आहे त्या परिसरात
५,०० हून अधिक प्रजातीच्या वनस्पतींची विविधता आहे.
या परिसरात उदमांजर, कोल्हे, मुंगूस, लांडगे, बिबटे, विविध प्रकारचे साप दिसून येतात. अभयारण्यात पक्षी सुची तयार करण्यात आली आहे आणि दरवर्षी पक्षी गणनेनंतर ती सुधारित (अपडेट) केली जाते. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्षी अधिवासाची संपन्नता तसेच दुर्मिळ पक्ष्यांचे अस्तित्त्व लक्षात घेऊन हे क्षेत्र ‘भारतीय पक्षीतीर्थ जाळ्या’त समाविष्ट करण्यात आले आहे.
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य आढळणारे पक्षी
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य
मुग्धबलाक (ओपन बिल्ड स्टॉर्क), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क), पाणकावळा, काळे कुदळे, खंड्या, गाय बगळे, जांभळी पाण कोंबडी, राखी बगळा, पर्पल हेरॉन, युरेशियन कूट, हळद कुंकु बदक हे स्थानिक पाणपक्षी आढळतात. या जलाशयाच्या परिसरात जांभळी पाणकोंबडी मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने तिला नांदूर मध्यमेश्वरची राणी म्हटले जाते.
तसेच येथे टिल, पोचार्ड, विजन, गडवाल, थापट्या, पिनटेल, गारगनी, कॉटन पिग्मी गूज ही विविध प्रकारची बदके हिवाळ्यात स्थलांतर करून येतात. त्याशिवाय गॉडविट, सॅंड पायपर (तुतवार), क्रेक, रफ, स्मॉल प्रॅटीनकोल हे दलदलीत आढळणारे स्थलांतरीत पक्षीसुद्धा येतात.
मागील पंचवीस वर्षात झालेल्या सुधारणा
इस १९४०-५० साली नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात फक्त स्थानिक पक्ष्यांचे वास्तव असायचं. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागा व वन्यजीव विभागाच्या वतीने या भागात येणाऱ्या पक्षी निरिक्षणा साठी येणाऱ्या पक्षीप्रेमी साठी सोयीसुविधा उपलब्ध करायला सुरवात केली. प्रथम सुरवातीला चापडगाव,मांजरगाव येथे पाणवठ्यातील पक्षी निरीक्षणासाठी मनोरा उभा केला.पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वनविभागाने विशेष गार्डन उभारत , अभयारण्य पक्षी निरीक्षकांसाठी येथे दुर्बिण, स्पॉटिंग स्कोप, फिल्ड गाईड (पक्षी मार्गदर्शक पुस्तक), मार्गदर्शक यांची सोय करण्यात आलेली आहे. जलाशयाच्या काठाने निरीक्षण मनोरे उभारण्यात आलेले आहेत.
खाणगाव थडी येथे निसर्ग निर्वाचन केंद्र, वन उद्यान, वनविश्रामगृह इ. सुविधा उपलब्ध शासनाच्या वतीने उपलब्ध करण्यात आले आहेत.
हिवाळा सुरू झाला की विशेषतः डिसेंबर व जानेवारी महिन्यात विदेशी पक्षाचे आगमन होते व जानेवारी महिन्यात दरवर्षी पक्षी गणना केली जाते.
या अभयारण्यात मोठया प्रमाणावर जैव विविधता आढळत असल्यामुळे आणि येथे आढळणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या आणि स्थलांतराच्या काळात एकूण पक्ष्यांची संख्या हजारोंच्या घरात असल्यामुळे जागतिकदृष्ट्या हे महत्त्वाचे स्थळ आहे. २०२० मध्ये या ठिकाणाला जागतिक रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली. रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट होणारे हे महाराष्ट्रातील पहिले ठिकाण आहे.