खनिज कोळशाला पर्याय म्हणून इंधनकांडीचा वापर
महानिर्मिती कडून अभ्यासासाठी समिती गठित
पाशा पटेल यांच्या मागणीची दखल
लातूर (प्रतिनिधी) : महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये खनिज कोळशाला पर्याय म्हणून बांबू किंवा जैवभारावर आधारित इंधन कांड्यांचा वापर करता येऊ शकतो काय? याचा अभ्यास करण्यासाठी महानिर्मिती कंपनीच्या वतीने एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून पाशा पटेल यांनी केलेल्या मागणीची कंपनीने दखल घेतली ही समिती लवकरच आपला अहवाल कंपनीला सादर करणार आहे. महानिर्मिती कंपनीच्या वतीने औष्णिक वीज केंद्रांच्या माध्यमातून वीज निर्मिती करताना मोठ्या प्रमाणात खनिज कोळशाचा वापर केला जातो.पॅरिस करारानुसार आता खनिज कोळशाचा वापर कमी करावा लागणार आहे. खनिज कोशाच्या वापरामुळे विद्युत निर्मिती केंद्रातून निर्माण होणाऱ्या वायूच्या उत्सर्जनामुळे तापमान तापमान वाढत आहे.ही तापमानवाढ रोखण्यासाठी खनिज कोळशाला पर्याय म्हणून ग्रीन कोल इंधन कांडीचा वापर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल व कॉनबॅकचे संचालक संजीव करपे यांनी एका पत्राद्वारे कंपनीकडे केली होती.या पत्राची दखल घेऊन महानिर्मितीने औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये जैवकाद्वारे इंधनाचा वापर करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती आपला अहवाल कंपनीला सादर करणार आहे.महानिर्मिती कंपनीचे संचालक चंद्रकांत थोटवे यांनी यासंदर्भात पाशा पटेल यांना पत्र पाठविले आहे.
आपल्या पत्राची दखल घेऊन समितीची स्थापना केल्याबद्दल पाशा पटेल यांनी थोटवे यांचे आभार मानले आहेत.जैवभार इंधन कांड्यांप्रमाणेच बांबूच्या लहान तुकड्यांचा दगडी कोळशामध्ये मिसळून वापर करणे शक्य आहे काय ? याची तपासणी करावी,अशी विनंती पाशा पटेल यांनी केली आहे.एनटीपीसी दादरी नवी दिल्ली,गडचिरोली येथील वायुनंदन पॉवर लिमिटेड आणि गगनबावडा येथे डॉक्टर डी. वाय. पाटील कोजन पॉवर प्लांटमध्ये इंधन म्हणून प्रायोगिक तत्त्वावर बांबूचा वापर केला जात आहे. याची पाहणी करावी, अशी विनंतीही पाशा पटेल यांनी थोटवे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.