श्री गोविंदप्रभू : महानुभावांचे चौथे परमेश्वरावतार
महानुभाव पंथाच्या पंचकृष्णांपैकी चौथे कृष्ण म्हणजे ऋद्धीपुरीं चे श्री गुंडम राऊळ. यांचे मुळ नाव गुंडम किवा गुंडो. आज शनिवार भाद्रपद शुद्ध त्रयोदशी श्री गोविंद प्रभूंची जयंती. तर आपण प्रभूंना आज स्मरणाचा वीडा अवसर वाहु या. पंचकृष्ण नमनां मध्ये आम्ही महानुभाव नमन करतोत ते असे.
नेमाम्बोदर संभुतं, काण्वादनंतनायकात।
प्रभू नमामि गोविंद, जीवाविद्या विभंजकम ॥४॥
शके ११०९ मध्ये भाद्रपद शुद्ध त्रयोदशी गुरुवारी वऱ्हाड च्या रिद्धपुर मधील काटसरे किंवा काटसूरे गावी आई नेमाईसा व पिता अनंतनायक या काण्व ब्राह्मणांच्या घरी श्री गोविंदप्रभूंनी अवतार घेतला. लवकरच आई वडिलांचे छत्र हरवले. परदेशी झालेल्या गुंडमला त्यांच्या मामा व मावशीने आधार दिला. आई वडिलांचे छत्र लवकर हरवलेले श्री गोविंद प्रभू मात्र शतायुषी राहीले. अशा श्री गोविंद प्रभूंना आपण आज त्यांच्या अवतार दिनी साष्टांग प्रणिपात करूया. आणि महानुभाव पंथाचे पुढे संस्थापक ठरलेल्या श्री चक्रधर प्रभूंना ज्यांनी “चंदनाने बोरी व्यापीयेल्या” या न्यायाने किंवा “आपल्या सारिखे करिती तात्काळ” या प्रमाणे त्यांनी श्री हरीपाळदेवांना क्षणार्धात आपल्या सारखे करून सोडले. “तयाते चुकौनी गोसावी परमेश्वर पुरासी बीजे केले: श्री प्रभू रांधवनहाटी क्रिडा करीत असतिः श्याम श्रीमुर्ती नाभी चुंबित खांड: उत्तरा संगे वस्त्र: गगनाची वास पाहत: आपणया आपण बोलत: रांधवणीचा घरी तयाचा पदार्थांसी खेळ करीत होते: ते क्रिडा आमचे गोसावी पहात असतिः श्री प्रभूंनी रांधवणी बुड्डे ओळगवीले: ते प्रभु प्रसाद करुनी आरे घे घे घेना म्हणे. ऐसे म्हणौनि गोसावियाकडे टाकौनि घातले: गोसावी वरीचेया वरि झेलीले: श्री मुगुटावरी धरिले: आरोगीले: तेथ गोसावी ज्ञान सक्ती स्विकरीली:”
अशा या श्री गोविदप्रभुंनी रामदर्शनाशिवाय अन्नपाणी न घेण्याचा वसा घेतलेल्या हरपाळ देवाकडे शेंगुळे-बुड्डे फेकून म्हटले “घे घे म्हणे, चक्रेया होय म्हणे, चक्रधर होय म्हणे” असा कृपाप्रसाद देऊन हरिपाळ देवानां पंचकृष्णां पैकी पाचवे कृष्ण श्री चक्रधरप्रभू यांना अवतारी पुरुष केले.
श्री गोविदप्रभू कुशाग्र बुद्धीचे होते. पण त्यांचा वेष वागणे खाणे पिणे खादाडपन हे त्यांचे वैशिष्ट होते. ते बेसुमार खात असत. यामुळे हा परमेश्वराचा वेडसर अवतार होता. म्हणून त्यांना “राऊळ वेडे: राऊळ पिसे:” असेच लोक ओळखत. पण असे असून ही त्याना लोक ” राउळ माए: राऊळ बापू: ” असेही मोठे जिव्हाळ्याने म्हणत असत. याला कारण ही तसेच होते. नगरातील महारां मांगाचे, अनाथाचे सासुरवाशिनींचे गोविंदप्रभू वाली होत. श्रेष्ठ कनिष्ठ भाव ते मानत नसतं. स्वतः काण्व ब्राह्मण असून ही महारा मांगा च्या घरी ते अंन्नोदक घेत. महार मांगांचे ते एकमेव आधार असल्याने त्यांना “राउळो: आम्ही पाणियेवीण मरत असो: तरि काय करुं जी?” अशी कळवळून प्रार्थना केली. की त्याना कृपा उपजून ते आपल्या दैवी शक्तीनी “अमर्याद पाणी” निर्माण करून त्यांना देत असत. “राऊळ माय: राऊळ बापू: राऊळाचेनी प्रसादे आम्ही पाणी पीत असो” असे दलितानी त्यांना म्हटले तर वावगे ठरत नाही. अनाथ सासुरवाशिण स्त्रियांना रिद्धपूर चे गोविंद प्रभू आपले माहेर वाटे.
असाच एक प्रसंग जिला माय बाप किंवा बहीण भाऊ कोणी नाही आणि जाचक सासुरवास असलेल्या सावळापूरच्या एका ब्राह्मण सूनेचा आहे. तिला नवऱ्याने भरपूर मारले. ती कंटाळून घर सोडून ती माहेरला निघून चालली. तेव्हा पतीने, तूझे माहेर कोणते ? असे विचारल्यावर ती म्हणते रिद्धपूरी माझे माहेर आहे. तिथे कोण आहे विचारल्यावर ती म्हणते “नाः राऊळ आहाति:” आणि श्री गोविंद प्रभू तिला आपली लेक मानत. अशा तिला प्रभूंच्या निधनांची वार्ता कळल्यावर ती म्हणते, “माझे माहेर गेले” असे कोमल भावनेचे नैष्ठीक ब्रह्मचर्यवृत्तीचे क्षमाशील, अनासक्तवृत्ती, सर्वभूती समत्व, असंग्रहवृत्ती व परोपकार वृत्ती व एकूण परमेश्वरी अवताराच्या ठिकाणी असणारी सर्वज्ञता व कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम शक्ती त्यांच्यात होती.
अशी काल क्रमणा करीत तरुण गोविंदप्रभू यात्रेकरुच्या सोबत द्वारावतीला गेले. तिथे आम्हां महानुभाव पंथियांचे तिसरे परमेश्वरावतार श्री चांगदेव राऊळ उपाख्य श्री चक्रपाणि हे विद्यादान करीत होते. यावेळी काही त्यांची श्री गोविंद प्रभूंशी भेट झालेली नाही. त्यांनी फक्त संन्यासदीक्षा घेतली. इतके लीळाचरित्रावरुण कळते. संन्यास घेऊन श्री गोविंद प्रभू रिद्धपूरास यात्रेकरू सह परत आले.
पून: ते कांही काळानंतर द्वारावतीला यात्रेसाठी गेले. त्यावेळी मात्र गोमतीच्या काठी ते दंड रोवून जप करत असताना श्री चांगदेव राऊळांनि आपल्या हातातील सुप त्यांच्या माथ्यावर ठेवून त्यांना खराट्याने हाणून त्यांच्यापुढे रोवलेले दंड मोडून गोमती मध्ये टाकून दिले. याप्रमाणे श्री गोविंद प्रभूंनी श्री चांगदेव राऊळांद्वारे शक्तीचा स्विकार केला. रिद्धपुरास परतू येऊन ते जीवोद्धरणाचे कार्य करू लागले. असा गुरुशिष्य संबंध त्यांचेत प्रस्थापित झाला.
रुद्धपुरात श्री गोविंद प्रभूंनी अनेक लिळा केल्या. कांहीं वर वर्णन केलेल्या आहेतच. तेलीनीच्या घरी जाऊन लाखाची भाकर खाल्ली. श्राद्धाचे घरी जेवण केले. पांगळ्याला पाय दिले. मुक्याला वाचा दिली. एका बालकासोबत सुद्धा ते नित्य खेळत. पण त्याच्याकडे खेळण्यांस गेल्यावर ते मेल्याचे समजले तर त्याला आपल्या अन्यथाकर्तुम शक्तीने जीवंत करून आईला स्तनपान करण्यास सांगितले. तिने नकार दिला तर समोरच्या एका म्हातारीस बाळाला स्तनपान करावयास लावले. हा चमत्कार बघून महाजन आश्चर्य चकीत झाले. आजही रुद्धपुर येथे एक लीळास्थान आहे. सासु सुनेची विहीर. -विहीरीवर पाणी भरण्यांच्या निमित्ताने सासु सुनेत भांडण लागले. श्री गोविंदप्रभूनी हे दोघींचे भांडण मिटवून त्या विहीरीचे दोन भाग करून, भिंत टाकून एकीकडे सासुने पाणी भरावे व दुसरीकडे सूनेने पाणी भरावे. असे परिवारांतील भांडण तंटे पण प्रभू मिटवीत. अशा अनेक लीळा श्री गोविंद प्रभूंनी केल्या. जवळपास या त्यांच्या लीळा अडीचशे ते तीनशे पर्यंत आहेत.
आज त्यांच्या जयंती दिनी त्यांनी केलेल्या लीळांचे स्मरण व चिंतन करून आपण त्यांची कृपा मागू या ! त्यांना दंडवत प्रणाम करू या. दंडवत प्रणाम!!!
ठाकूर नयनसिंह सुंदरसिंह