बाप हा खऱ्या अर्थाने वटवृक्ष असतो – प्रा.श्रीहरी वेदपाठक
जीवन जगत असताना जेव्हा संकट उभी असतात, तेव्हा संयमाने छातीचा कोट करून बाप उभा असतो. संयमाचा प्रतीक म्हणजेच बाप. बापाजवळ दुःखाचे डोंगर असतात.त्यावर आपल्याला कसं मात करता येईल, याचा तो मूकपणे विचार करीत मार्ग काढतो. एका अर्थाने संसारात, कुटुंबात बाप हा वटवृक्षाची भूमिका पार पाडत असतो, असे विचार प्रसिद्ध वक्ते प्रा. श्रीहरी वेदपाठक यांनी मांडले.
चला कवितेच्या बनात आयोजित श्री हावगीस्वामी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु.प्रतीक्षा बब्रुवान लोहकरे लिखित ‘ वडिलांना समजून घेताना ‘ या ग्रंथाचे प्रकाशन उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या सभागृहात पार पाडले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील इंग्रजी विभागात कार्यरत असलेल्या डॉ.स्मिता लखोटिया या होत्या.तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.श्रीहरी वेदपाठक हे होते. त्याबरोबरच मंचावर श्री हावगीस्वामी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.संजय शिंदे व श्री बब्रुवान लोहकरे हे उपस्थित होते. सुरुवातीला उषाताई तोंडचीरकर यांनी सुंदर असे स्वागतगीत सादर केले.प्रास्ताविक प्रा. राजपाल पाटील तर पाहुण्यांचा परिचय सार्थक परसाळगे यांनी करून दिला. याप्रसंगी सदरील ग्रंथास प्रस्तावना लिहिल्याबद्दल प्रा.जे.डी संपाळे यांचा व मलपृष्ठावरील अभिप्राय लिहिल्यामुळे प्रा.एन.आर.हाके यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना प्रा. वेदपाठक म्हणाले, भारतीय संस्कृतीत संयुक्तिक कुटुंबपद्धतीला महत्त्व आहे. आज विभक्त कुटुंबपद्धती आली.माणूस एकलकोंडा होऊ लागला.त्यामुळे अनेक समस्यांना त्याला तोंड द्यावे लागत आहे. कुटुंबात वडील नेहमीच समन्वयकाची भूमिका पार पाडत असतात. अशा वडिलांना समजून घेण्याचा प्रयत्न कु. प्रतीक्षा लोहकरे यांनी केलेले आहे. तिच्या या ग्रंथाची भाषा अतिशय समृद्ध आहे.असे सांगत आजची कुटुंबपद्धती, भारतीय संस्कृती तसेच या ग्रंथाचे वेगळेपण यासंबंधी त्यांनी विस्ताराने विवेचन केले.
प्र.प्राचार्य डॉ. संजय शिंदे म्हणाले की, आज अनेक मुलांचे आई-वडील रात्रंदिवस कष्ट करत असतात. त्यामुळे मुलांनी आई-वडिलांना देखील समजावून घ्यायला हवे, परंतु सध्याची परिस्थिती पाहिल्यानंतर असे लक्षात येते की, आई-वडिलांनाच आता मुलांना समजावून घेण्याची वेळ आलेली आहे. घरात जी काही आजोबासारखी माणसं असतात ती खऱ्या अर्थाने आपल्यासाठी संस्काररुपी विद्यापीठच असतात. त्यांचाही आपण आदर करायला हवा.
अध्यक्षीय समारोपात डॉ.स्मिता लखोटिया म्हणाल्या की, प्रत्येक पालकांनी मुलांसोबत मैत्रीचे नाते ठेवायला हवे.आज धावपळीच्या युगामध्ये पालकांना मुलांना वेळ देता येत नाही. मुलांना दमदाटी करून सुधारता येत नाही, तर मुलांच्या मनाचा प्रवास समजावून घेऊन ते आनंदी कसं राहतील याचाही पालकांनी विचार करायला हवा. असे सांगत प्रतिक्षा लोहकरे यांना हा ग्रंथ लिहावासा वाटला यातच खऱ्या अर्थाने तिचे यश आहे,असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमास डॉ. रामप्रसाद लखोटिया, अमोल निडवदे,दीपक बलसूरकर, निवृत्ती रायवाड, होळीकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम जाधव,डॉ.गौरव जेवळीकर,बालाजी सुवर्णकार, अर्चना पैके,तसेच सर्व क्षेत्रातील बंधू-भगिनी, श्रीमती इंदूताई लोहकरे व लोहकरे कुटुंबातील सर्व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चला कवितेच्या बनात मधील सर्व संयोजन समितीतील सदस्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत कदम तर आभार प्रा.एन.आर.हाके यांनी मानले.