कॉक्सिटने नोकर्या देण्याचा पॅटर्न निर्माण केला – चव्हाण
आयटी कंपन्यांमध्ये निवड झालेल्या गुणवंतांचा कॉक्सिटमध्ये गुणगौरव
लातूर (प्रतिनिधी) : गुणवत्तेचा लातूर पॅटर्न संपूर्ण देशाला परिचित आहे. परंतु, कमी गुणवत्तेचे विद्यार्थी घेऊन त्यांना मल्टिनॅशनल आयटी कंपन्यांमध्ये उच्च पगाराच्या नोकर्या मिळवून देण्याचा नवा ‘डॉ. एम. आर. पाटील पॅटर्न’ कॉक्सिटने तयार केला आहे, ही अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी काढले.
२०२१ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण होण्यापूर्वीच पदवीच्या शेवटच्या वर्षातील ११४ विद्यार्थ्यांना विविध मल्टिनॅशनल आयटी कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकर्या मिळाल्या. अशा गुणवंतांचा गौरव सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील होते. यावेळी कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, इंगळे, अशोक कुटे, प्रा. अंकुश नाडे, श्रीमती निलंगेकर, उप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोेसले, डी. आर. सोमवंशी, ट्रेनिंग व प्लेसमेंटचे प्रमुख प्रा. कैलास जाधव उपस्थित होते.
सतीश चव्हाण म्हणाले, मराठवाड्यात सर्वसाधारणपणे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबे आहेत. अशा विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. एम. आर. पाटील यांनी स्वतःच्या नोकरीचा राजीनामा देवून इतरांना नोकर्या मिळवून देणारे शिक्षण देण्यास मागील २० वर्षांपासून सुरूवात केली. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकर्या मिळाल्या आहेत. यामुळे त्यांच्या कुटुंबाचे दारिद्ˆय दूर होण्यास मदत झाली आहे. आजच्या सत्कारावेळी पालकांच्या चेहर्यावरील आनंद हे सांगून जात होता, असे सांगून चव्हाण पुढे म्हणाले, गुणवत्तेचा लातूर पॅटर्न देशभर प्रसिध्द आहे. ते विद्यार्थी पहिल्यापासूनच गुणवंत असतात. परंतु, डॉ. एम. आर. पाटील यांनी कमी गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना संगणकशास्त्राचे धडे देवून त्यांना नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या पगाराच्या नोकर्या मिळवून दिल्या आहेत. हे कार्य मागील २० वर्षांपासून अविरत सुरू आहे. कॉक्सिटने संगणकशास्त्रात विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊन त्यांना नोकर्या देण्याचा वेगळा ‘डॉ. एम. आर. पाटील पॅटर्न’ तयार केला, असे चव्हाण यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात कॉक्सिटमधील ११४ जणांना विप्रो, इन्फोसीस, टेक महिंद्रा, टीसीएस, ऍमेझॉन, कॉग्निझम, सिरम इन्स्टिट्यूट, आयगेट पटणी यासारख्या नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या पगाराच्या नोकर्या मिळाल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रत्येक पालकाच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक टेनिंग व प्लेसमेंट सेल ऑफिसर प्रा. कैलास जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश पवार व प्रा. रोहित जाधव यांनी केले.
समाजासाठी जास्तीत जास्त
देण्याचा प्रयत्न करा ः डॉ. पाटील
अध्यक्षीय समारोपात संस्था प्रमुख डॉ. एम. आर. पाटील म्हणाले, मागील २० वर्षांपासून कॉक्सिटने हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षित बनवून मोठ्या पगाराच्या नोकर्या मिळवून दिल्या आहेत. यामुळे अनेक कुटुंबांचे दारिद्ˆय दूर होण्यास मदत झाली आहे. नोकरी मिळालेल्यांनी आयुष्यात येवून पैसा भरपूर कमवावा. परंतु, आपले आई – वडील, गुरूजण यांना कधी विसरू नये, त्यांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून समाजाप्रती आपलेही देणे लागते, या भावनेतून गरजवंतांना पुढे नेण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त मदत करावी, असे आवाहन करून पुढे ते म्हणाले की, वैद्यकीय व अभियांत्रिकीला प्रवेश मिळेल, या आशेवर दरवर्षी हजारो विद्यार्थी दुसरीकडे प्रवेश घेत नाहीत, उशीर झाल्यामुळे त्यांना दुसरीकडे कुठेही प्रवेश मिळत नाहीत, अशा हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते, हे टाळण्यासाठी आपण विद्यापीठात अशा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, अशी व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.