माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालये वाचन संस्कृती टिकवण्यात यशस्वी – डॉ. जगदीश कुलकणी
‘वाचन संस्कृतीच्या संवर्धनात ग्रंथालयाची भूमिका ‘ या ऐतिहासिक ग्रंथाचे मान्यवरांच्या उपस्थितीत विमोचन संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : आजच्या जागतिकीकरणाच्या काळात समाजमाध्यमांचा प्रभाव वाढलेला असला तरी काळाबरोबर बदल करून आणि माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध प्रकारचे ज्ञान इंटरनेटच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याच्या कार्यात ग्रंथालये यशस्वी होत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय ग्रंथालय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर द्वारा संचलित महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय विभागाद्वारे शनिवार, दि. ११ डिसें.२०२१ रोजी ‘वाचनसंस्कृतीच्या संवर्धनात ग्रंथालयाची भूमिका’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीरचे अध्यक्ष नामदेवराव चामले यांची व सचिव ज्ञानदेव झोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उद्घाटक म्हणून डॉ. जगदीश कुलकर्णी ( संचालक, ज्ञानस्त्रोत केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड) हे तर बीजभाषक म्हणून डॉ. गोविंद हंबर्डे ग्रंथपाल,एमजीएमचे अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड यांची व साधन व्यक्ती म्हणून डॉ. शालिनी लिहितकर (सहयोगी प्राध्यापक, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर )यांची आणि डॉ.अशोक कोलंबिकर( अध्यक्ष ग्रंथालय व माहिती शास्त्र अभ्यास मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड) यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटन प्रसंगी पुढे बोलतांना डॉ. जगदीश कुलकर्णी म्हणाले की, पुस्तक माणसाला माणूस बनविते, महाविद्यालयाचे ग्रंथालय हे ज्ञानकेंद्र असतं. ग्रंथालयाच्या माध्यमातूनच वाचन संस्कृती जोपसण्याचे कार्य होत आहे, असेही ते यावेळी म्हणाले. बीजभाषक डॉ. गोविंद हंबर्डे यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी दोन सत्रात शोधनिबंध वाचन करण्यात आले. पहिल्या सत्रात डॉ. राजकुमार घुले पाथर्डी, प्रा. प्रीतम मरळ, पुणे व प्रा. प्रतिभा पांडे, चंदीगड यांनी शोधनिबंधाचे वाचन केले तर अध्यक्ष म्हणून डॉ. शालिनी लिहितकर यांनी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या शोधनिबंध वाचन सत्रात प्रा. राजीव वाघमारे, नांदेड व डॉ. नामदेव राठोड, जळकोट यांनी शोधनिबंधाचे वाचन केले. या सत्राचा अध्यक्षीय समारोप डॉ. अशोक कोलंबीकर, नांदेड यांनी केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘ वाचन संस्कृतीच्या संवर्धनात ग्रंथालयाची भूमिका ‘ या ४०च्या वर शोधनिबंध असलेल्या ग्रंथाचे ऑनलाईन पध्दतीने प्रकाशन करण्यात आले. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नामदेवराव चामले यांनी व सचिव ज्ञानदेव झोडगे यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. तर या राष्ट्रीय परिषदेचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केला.
या राष्ट्रीय परिषदेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संयोजक महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे यांनी केले तर सूत्रसंचलन मराठी विभागाचे ह.भ.प. प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी केले. यावेळी देशभरातील विविध राज्यातून नव्वद हून अधिक ग्रंथपाल, अभ्यासक ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.