वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी ग्रामीण भागात सुरू होतोय “रीड लातूर”

वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी ग्रामीण भागात सुरू होतोय "रीड लातूर"

सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांचा पुढाकार

भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला अनोख्या उपक्रमाची घोषणा; नामवंत चित्रपट कलावंतांकडून उत्स्फूर्तपणे पुस्तकरुपी मदत

लातूर (प्रतिनिधी) : शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांपर्यंत उत्तमोत्तम व आधुनिक पुस्तके पोचावीत आणि यातून वाचनसंस्कृती वाढावी यासाठी प्रसिद्ध निर्मात्या सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांनी ‘रीड लातूर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला असून या अंतर्गत लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात अद्ययावत पुस्तकांनी सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम लातूर जिल्ह्यामध्ये प्रथमच आकाराला येतो आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी आहे. वाचनाबाबत त्यांच्या मनात उत्सुकता आहे. पण, त्यांच्यापर्यंत मोठ्या शहरात किंवा मोठ्या शाळांत सहज उपलब्ध होणारी नवनवीन पद्धतीची, आधुनिक पुस्तके पोचत नाहीत. याचा विचार करून सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांनी ग्रामीण भागात वाचन चळवळ वाढवण्याबाबतची कल्पना आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांच्याकडे मांडली. यातून ‘रीड लातूर’ हा अनोखा उपक्रम पुढे आला. या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक शाळांत ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांनी आपल्या मित्रपरिवाराशी चर्चा केली. तेंव्हा प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा, सोहा अली खान, लारा दत्ता, नीलम कोठारी, ताहिरा कश्यप, लेखक रस्किन बॉन्ड, ड्रीमलॅण्ड पब्लिकेशन हे उत्स्फूर्तपणे पुस्तके देऊन या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सहभागी झाले आहेत. या प्रतिसादामुळे ग्रामीण भागातील मुलां, मुलींची मने उत्तमोत्तम पुस्तकांमध्ये रमलेली पहायला मिळणार आहेत.

या उपक्रमासंदर्भात बोलताना सौ. दीपशिखा धिरज देशमुख म्हणाल्या, वाचन हा एक संस्कार आहे. त्यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्वाला आकार मिळतो. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. बौद्धिक विकास होतो. त्यांची भाषा शैली सुधारते. विचारक्षमता वाढते. हे सर्व आई या नात्याने मी सध्या अनुभवते आहे. ही अनुभूती इतर महिलांना घेता यावी, ग्रामीण भागातील मुलामुलींना दर्जेदार पुस्तक वाचनाचा आनंद मिळावा, यासाठी ‘रीड लातूर’ हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे.

वाचनाची अधिकाधिक आवड मुलांमध्ये निर्माण करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये ग्रंथालय सुरू करीत आहोत. मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल, त्यांना प्रेरणा मिळेल अशा इंग्रजी, मराठी, हिंदी भाषांतील कथा, कविता, कादंबरी असे साहित्यप्रकार या वाचनालयात असतील. मला विश्वास आहे, यामुळे मुलांना नवं जग पुस्तकातून अनुभवता येईल, असे सौ. दीपशिखा देशमुख यांनी सांगितले. या उपक्रमाला बळकटी येण्यासाठी, यात लोकसहभाग वाढण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन पुस्तकरूपाने मदत करावी, असे आवाहनही सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांनी यावेळी केले.

About The Author