यमाच्या तावडीतून वाचवले ती पुण्यभूमी परळी वैद्यनाथ!
जेष्ठ शुध्द पोर्णिमा म्हणजे वटपोर्णिमा, आपल्या पतीस दिर्घ आयुष्य लाभून हाच पती पुढचे सात जन्म मिळावा यासाठी देशभरातील महिला हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. परंतु यमाच्या तावडीतून आपल्या पतीचे प्राण वाचवणार्या सत्यवान-साविञी ची ही घटना कोठे घडली ही बाब अद्याप अनेकांना ज्ञात नाही. म्हणून वटपोर्णिमे निमित्त परळी वैद्यनाथ पंचक्रोशीचे अभ्यासक तथा न.प. शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी केलेला हा लेख प्रपंच. सत्यवान-साविञी ची ही कथा महाभारतातील वनपर्वात युधिष्ठिर आणि मार्कंण्डेय ऋषी यांच्या संवादात आली आहे. यात साविञीची तुलना द्रौपदीशी करण्यात आली आहे.
महेंद्र देशाचा राजा अश्वपती यास अनेक राण्यांशी विवाह करून सुद्धा संतानप्राप्ती होत नव्हती. तेंव्हा त्याने लोकमाता साविञीदेवीची उपासना केली. त्या उपासनेमुळे देवीने प्रसन्न होऊन वर दिला. तिच्या वरामुळे राजाअश्वपतीस कन्या रत्न प्राप्त झाले. म्हणून त्या कन्येचे नाव पण साविञी असेच ठेवण्यात आले. सर्वगुण संपन्न कन्या उपवर झाल्यामुळे अश्वपती चिंताग्रस्त राहु लागले. ही बाब चाणाक्ष साविञीच्या लक्षात आली. तीने आपल्या पित्यास चिंतेचे कारण विचारले. आपले वडील आपल्या विवाहामुळे आणि योग्य जोडीदार मिळावा यासाठी चिंताग्रस्त आहेत हे ऐकल्यावर साविञीने आपल्या पित्यास सांगीतले की मीच माझा वर निवडणार आहे. आपण तशी मला परवानगी द्यावी अशी विनंती केल्यावर अश्वपती यांनी एक वयोवृद्ध अमात्य आणि तीच्या विश्वासू सख्या सोबत देऊन, पालखीतून साविञीस वर परीक्षेसाठी रवाना केले. भ्रमंती करत, वाटेत तिर्थयाञा करत असताना,निर्वासीत वनवासी राजा द्दुमत्सेन यांचा देखना तरूण पुञ साविञीने पाहिला. पाहताच क्षणी तो तिच्या मनात बसला. तिने आपल्या मनाचा निर्धार केला. हाच आपला पती. ती परत आपल्या राज्यात आली. आणि आपल्या पित्यास सत्यवानासीच विवाह करण्याचा निर्णय सांगीतला. त्याच वेळी महर्षी नारदमुनीचे आगमन अश्वपती यांच्या महालात झाले. राजाने नारदांचे सत्कार करून आदरातिथ्य केले. आणि मुलीचा निर्णय सांगीतला. आणि सत्यवाना विषयी भविष्यवाणी नारदांना विचारली. त्यावर महर्षी नारद म्हणाले की, सत्यवान अल्पायुषी असुन तो केवळ पुढील बारा महिनेच जीवंत राहिल. हे ऐकताच राजा जमीनीवर कोसळला. शुद्धीवर आल्यावर तो आपल्या कन्येस विनवणी करू लागला. तू दुसरा वर निवड. परंतु साविञी आपल्या निर्णयावर ठाम होती. नाइलाजाने अश्वपती ने साविञीचा विवाह सत्यवानाशी लावून दिला.
सावित्री पती घरी आल्यावर तीने आपले राजवस्त्र काढुन पतीच्या घरचे वस्त्रे परिधान करून राहु लागली. सासु सासरे नेञहिन होते. कुटुंब पतीवरच अवलंबून होते. सत्यवान-साविञी सुखाने संसारात रमले होते. परंतु शेवटी महर्षी नारदांनी सांगीतलेला तो दिवस उजाडला. सावित्री ला भविष्यवाणी आठवली. त्या दिवशी सत्यवान जगंलात वडिलांसाठी कंदमुळे आणण्यासाठी निघाला. सावित्री ने हट्ट करून पती आणि सासरे यांची परवानगी घेऊन पती समवेत जंगलात निघाली. कंदमुळे काढत असताना ऊन तापले होते. पतीला थकवा जाणवू लागला. सावित्री ने एका झाडाखाली पतीस बसवले. आपल्या मांडीवर डोके ठेवून पतीस झोपवले. तेवढ्यात ठरल्याप्रमाणे यमधर्म हातात पाश आणि महिशावर आरूढ होऊन त्या ठिकाणी आला. सत्यवानाचे गळ्यात पाश अडवून तो त्याला घेऊन निघत असताना साविञी यमाच्या मागे विनवणी करत निघाली. यम बोलत होता तु माझ्या मागे येऊन काही उपयोग होणार नाही. परंतु साविञी काही ऐकायला तयार नव्हती. शेवटी यमाने साविञीस पतीचे प्राण सोडुन कोणतेही तीन वर माग असे म्हटल्यावर तीने आपल्या बुद्धी कौशल्याने ते वर मागीतले माझ्या वडिलांना शतपुञ व्हावेत. आणि माझ्या सासर्याचे गेलेले राज्य परत मिळावे आणि मला पुञप्राप्ती व्हावी. पतिव्रतेच्या तेजापुढे यम भ्रमीत झाला. त्याने तथास्तु म्हणत वर देऊन टाकला. सावित्री म्हणाली मला पती नसेल तर पुञप्राप्ती कशी होणार?यमाला आपली चुक लक्षात आली. तेव्हा यमाने सावीञीस सांगीतले की
तुझा पती जीवंत करणे मला शक्य नाही. ते माझे काम नाही. माझे काम जीव घेणे आहे. जीवनदान देणे नाही.
परंतु तुझ्या पतीस जीवंत करण्यासाठीचा मार्ग सांगतो. तू प्रभाकर क्षेञी जा (म्हणजे आजचे परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्र)तेथील नगनारायण पर्वताच्या पश्चिमेला “गंध मादन”पर्वताच्या कुशीत वटेश्वर लिंग आहे. तेथे तू जाऊन “मृत्युंजय व्रत “करावे. त्या व्रतानेच तुझा पती जीवंत होईल. सावित्री लागलीच प्रभाकर क्षेञी आली. तीने मनोभावे व्रत आरंभ केले. तीच्या या व्रताने भगवान वटेश्वर प्रसन्न होऊन त्यांनी सत्यवानाचे प्राण परत दिले. तो दिवस होता. जेष्ठ शुध्द पोर्णिमा. सावित्री च्या या व्रतामुळे तेव्हा पासून हीच पोर्णिमा वटपोर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते.सत्यवानाचे प्राण साविञीने परत मिळवले ते परम पावन क्षेञ म्हणजेच प्रभाकर क्षेञ तेच आजचे परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्र होय. ही कथा जेथे घडली ते ठिकाण म्हणजे आज मलिकपूरा भागाच्या पाठिमागे वटसाविञी नगर जवळ असलेल्या तलावाच्या मधोमध हे वटेश्वर लिंग आणि सावित्री चे मंदिर एका दगडी वट्यावर उघड्यावर आहे. एवढे धार्मिक महत्त्व आणि अधिष्ठान असलेले हे मंदिर जीर्णोध्दाराच्या पतीक्षेत आहे. हे आपले दुर्दैव च म्हणावे लागेल.
आपला
गोपाळ रावसाहेब आंधळे
परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग पंचक्रोशी अभ्यासक