मातृह्रृदयी व्याख्याते : प्रा.डॉ. ह.भ.प. रामकृष्ण बदने

मातृह्रृदयी व्याख्याते : प्रा.डॉ. ह.भ.प. रामकृष्ण बदने

ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय,वसंतनगर ता. मुखेड येथील हिंदी विभागाचे प्रोफेसर व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ.ह.भ.प. रामकृष्ण बदने यांचा आज दि.०५ आगस्ट १९६८ रोजी वाढदिवस त्या निमित्त केलेला हा शब्दप्रपंच.) मराठवाडा ही संत-महंतांची, शूर विरांची आणि विचारवंतांची भूमी आहे. विशेषतः वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीमध्ये मराठवाड्याचे योगदान अतिशय महत्त्वाचे गणले जाते. संत नामदेव(नरसी नामदेव), संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे (आपेगाव, पैठण), संत मंडळांमध्ये नामयाची दासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत जनाबाई( गंगाखेड), संत गोरोबा काका ( ढोकी, उस्मानाबाद ), संत एकनाथ ( पैठण) आदी वारकरी संतांनी मराठवाड्याची भूमी तयार केलेली आहे. संत तुकारामांच्या अभंगवाणीचा प्रभाव येथील संप्रदायावर सर्वदूर पडलेला आहे. वारकरी संप्रदायाच्या परंपरेत येथील अनेक संत महंत मंडळी राहून संप्रदायाचे कार्य पुढच्या पिढीपर्यंत अव्याहतपणे चालू ठेवलेले आहे. अशा काळात वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक बनून राष्ट्रसंत भगवानबाबा,संत मोतीराम महाराज, संत माधवबाबा मोळवणकर,गूरुवर्य मारोतराव महाराज दस्तापुरकर आदींनी वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार सर्वदूर, दुर्गम वाडी तांडा, वस्ती- वस्तीवर केला. त्यांच्याच प्रेरणेने मराठवाड्यात संत विचारांची अनेक माणसं तयार झालीत. जे या आधुनिक काळातही संतांचे मानवतावादी विचार जन सामान्यांमध्ये पेरण्याचे कार्य अविरतपणे करीत आहेत, सामान्य माणसांच्या मनांत राष्ट्रभावना, धर्मभावना जागवून त्यांना मानवतेची, मातृ-पितृसेवेची शिकवण देत आहेत. अशांपैकीच एक म्हणजे मातृ ह्रृदयी व्याख्याते ह.भ.प. प्रा. डॉ. रामकृष्ण बदने हे होत.

प्रा.डॉ.रामकृष्ण बदने यांचा जन्म ०५ऑगस्ट १९६८ रोजी लातूर जिल्ह्यातील किनगाव जवळ असलेल्या देवकरा ता.अहमदपुर या छोट्याशा खेड्यात एका वारकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आई – वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची होती. तरीही त्यांनी आपल्या मुलांना शिकविण्याची तयारी ठेवली.
शिक्षण: डॉ. बदने यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी म्हणजे देवकरा येथेच झाले. त्यानंतरचे शिक्षण किनगाव येथील जिल्हा परिषद, शाळेत झाले. शालांत परीक्षेपर्यंतचे शिक्षण गावाहून ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करत पायी प्रवासाने झाले. सुट्टीच्या दिवशी आई- वडीलांना घरकामात, शेतीत, रोजंदारीवर, गायी- गुरं सांभाळत मदत करत करत मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढे ते अकरावी – बारावीच्या शिक्षणासाठी अहमदपूर येथील नामांकित महात्मा गांधी महाविद्यालयात दाखल झाले खरे; परंतु येथे राहण्याचा मोठा पेच होता. शिक्षण घेण्याच्या जिद्दीपुढे त्यांनी परिस्थितीशी दोन हात करत पडेल ते काम स्वीकारले. ते याच महाविद्यालयात हिंदी, इतिहास, राज्यशास्त्र विषय घेऊन मोठ्या गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले.पदवी शिक्षणात गुणवत्तेत आल्यामुळे त्या काळात त्यांचा शासकीय महाविद्यालय, परभणी येथे बी.एड. शिक्षणाकरिता प्रवेश झाला व त्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयात एम.ए. हिंदी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून विद्यापीठातून प्रथम क्रमांक मिळविला व त्यांना १९९२ साली हिंदी विषयात सुवर्णपदक प्राप्त झाले. त्यानंतर त्यांना ग्रामीण ( कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय, वसंतनगर, मुखेड येथे हिंदी विषयाचे अधिव्याख्याता म्हणून नोकरी मिळाली. संस्थेचा आधार सापडला. त्यांनी इमान- इतबारे अध्यापनाचे कार्य सुरू ठेवले. त्यांच्या अध्यापन कौशल्या बरोबरच त्यांच्या इतर अनेक गुण ठासून भरलेले होते. त्यामुळे ते पुढील काळात स्वस्थ न बसता एक उपक्रमशील प्राध्यापक, प्राचार्य म्हणून नावलौकिकास पात्र ठरले.

नोकरी करत करत त्यांनी प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण करून पुढे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘नागार्जुन के कथा साहित्य मे जनवादी चेतना’ या महत्वपूर्ण विषयावर संशोधन करून ‘विद्यावाचस्पती’ ही मानाची पदवी प्राप्त केली.
भूषविलेली पदे: डॉ.रामकृष्ण बदने यांनी आपल्या महाविद्यालयात हिंदी विषयाचे अध्यापन कार्य करत संस्थेने त्यांना दिलेली उपप्राचार्य,प्राचार्य पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली व महाविद्यालयाच्या नावलौकिकांत भर टाकली.
महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी म्हणून त्यांनी केलेले काम अत्यंत स्तुत्य आहे. ग्रामीण भागातील अडीअडचणी कशा असतात हे स्वयंसेवक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना जाणीव करून दिली व शिबिर काळात त्या त्या गावात लोकांना प्रबोधन केले. त्यांचे कार्य पाहून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने त्यांना २०१७- १८ साली विभागीय समन्वयक पदाची जबाबदारी सोपविली. ही जबाबदारी देखील त्यांनी लीलया पेलली.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहि:शाल व्याख्यानमाला विभागात आणि विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या सल्लागार पदी राहून केलेले कार्य दिशादर्शक आहे. याशिवाय महाराष्ट्र शासन वृद्ध साहित्यिक व कलावंत निवड आणि मानधन वाटप समितीच्या सदस्य पदी राहून गुणी साहित्यिक व कलावंतांना न्याय मिळवून दिला. कै. मक्काजी नाईक वाड्.मय पुरस्कार समिती वसंतनगर ता.मुखेडच्या सदस्यपदी राहून वाड्.मय लेखनाची चळवळ गतिमान केली. तसेच इंडियन रेडक्रॉस समिती सदस्य, मुखेड, कै. वसंतराव नाईक व्याख्यानमाला सदस्य, मुखेड, अध्यक्ष मायबोली मराठी परिषद, मुखेड, मातोश्री भिमाई पुंडे स्मृती व्याख्यानमाला सदस्य आणि महाविद्यालयातील विविध समित्यावर कार्यरत राहून साहित्यसेवा व समाजसेवा मोठ्या तन्मयतेने सरांनी जोपासून दुर्गम भागात प्रबोधनाचा जागर घातलेला आहे.
ग्रंथ लेखन कार्य:
डॉ.रामकृष्ण बदने हे एक लेखक म्हणून देखील सुप्रसिद्ध आहेत. त्यांचे नागार्जुन के कथा साहित्य मे जनवादी चेतना, बोलू काही थोरांविषयी,विचारधन यशस्वी जीवनाचे या स्वतंत्र ग्रंथ लेखनाबरोबरच अर्वाचीन हिंदी काव्य, कर्मवीर किशनराव राठोड यांच्यावरील गौरव ग्रंथ ‘विमुक्त’, ‘गीता अमृताचा प्रवाह: रामकृष्ण महाराज आणि वारकरी संप्रदाय’ या महत्त्वाच्या ग्रंथाचे संपादन कार्य सरांनी केले आहे. याशिवाय अनेक ग्रंथांना प्रस्तावना, वार्षिक अंकांचे, स्मरणिकेचे संपादन तसेच दिवाळी विशेषांक, साहित्य पत्रिका, संशोधन पत्रिका, वर्तमानपत्रे आदिंमध्ये त्यांचे लेखन प्रसिद्ध झालेले आहे.त्यांनी आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये आपले संशोधन लेख सादर केले असून नामांकित संशोधन ग्रंथात ते प्रसिद्ध झाले आहेत.
व्याख्याते, प्रवचनकार:*
डॉ. रामकृष्ण बदने यांची खरी ओळख एक सुप्रसिद्ध व्याख्याते व उत्कृष्ट कीर्तनकार प्रवचनकार म्हणून अधिक आहे. त्यांची खरी अभिरुची वाचन लेखनाबरोबरच व्याख्यान कीर्तन,प्रवचन,समाजसेवा म्हणून अधिक असल्याचे आवर्जून सांगता येईल. महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील जवळपास नामांकित महाविद्यालयात त्यांची व्याख्याने नावाजलेली आहे. ‘आई’ या विषयावर त्यांनी आजपर्यंत हजारो व्याख्याने देऊन तरुणाईच्या मनात देशभक्ती बरोबरच मातृभक्ती निर्माण करण्याचे काम डॉ.बदने सरांनी केले आहे. त्यांनी आपल्या व्याख्यानातून मांडलेल्या आई विषयीच्या सह्रदय भावना आईची महती जागविणाऱ्या आहेत.आईकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या मनात आईची, तिच्या वात्सल्याची जाणीव निर्माण करणारी त्यांची व्याख्याने आजही गच्च गर्दीने होऊन ऐकणाराचे डोळे पाणावताना दिसून येतात. अलीकडच्या काळात मातृभक्ती बरोबरच पितृभक्तीवर देखील त्यांची व्याख्याने वडिलांच्या कर्तृत्वाची जाणीव करून देणारी आहेत. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे डॉक्टर बदने यांनी आपल्या आई-वडिलांची सेवा करून मातृॠण व पितृॠण फेडण्याचे कार्य केले आहे. अत्यंत हळव्या मनाचे डॉ. बदने सर तितक्याच रोखठोक शब्दांत आपल्या कीर्तनातून, प्रवचनातून जनसामान्य माणसाला प्रबोधन करताना दिसून येतात. सामान्य माणसाला माता माउल्यांना आपल्या जीवनाची किती कर्तव्यता तितक्याच तन्मयतेने समजावून सांगतात. वारकरी संप्रदायाचा खरा आचारधर्म कोणता आहे?याविषयी ते सामान्य जणांना डोळस भक्ती महात्म्य शिकवतात. अगदी मातृह्रयी भावनेने आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना शिकवताना दिसून येतात. त्यांनी आपल्या आयुष्यात कधीही वाकडे पाऊल टाकलेले नाही अथवा कुणाचे मन दुखावे अशा हिणकस भावनेने कोणाला अपमानित केले नाही तर ते नेहमी सर्वांना प्रेमाने आदराने बोलताना दिसतात. ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची विशेष ओळख सहवासातल्या प्रत्येकाला भुरळ पाडणारी आहे. ते एकदा का एखाद्याच्या सहवासात आले की पुढे ते त्यांचेच होऊन जातात. त्यांच्या व्याख्यान, प्रवचनाचा विशेष म्हणजे त्यांचे गोड गायन होय. त्यांचे गायन ऐकतच राहावे असे प्रत्येकाला वाटल्यावाचून राहत नाही. अलीकडच्या काळात त्यांची स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जीवन कार्यावर होणारी व्याख्याने आम जनतेच्या मनात घर करून बसत आहेत. उच्च विद्याविभूषित प्रोफेसर म्हणून वावरत असताना कधीही त्यांना अहंकार, गर्व, ताठा आलेला नाही तर ते नेहमी तळागाळातल्या, गाव खेड्यातल्या माणसांशी आपली नाळ जोडून आहेत.आपल्या शिक्षणाच्या काळातील गरिबीची जाणीव ठेवून आजही ते खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसून येतात.

प्राप्त पुरस्कार:
डॉ. रामकृष्ण बदने यांना आपल्या एकूणच कार्याबद्दल अनेक प्रतिष्ठेचे व मानाचे पुरस्कार आज पर्यंत त्यांना प्राप्त झाले आहेत. पंचायत समिती, मुखेड कडून त्यांचा गुरुगौरव, वैद्यकीय संस्था व पुंडे हॉस्पिटल यांच्याकडून गुनिजन व गुणगौरव पुरस्कार, कै. मक्काजी नाईक गुणवंत कर्मचारी पुरस्कार, राज्यस्तरीय एकता गौरव पुरस्कार, नेहरू युवा केंद्र व जिल्हाधिकारी महिला बचत गट विशेष कार्य प्रशस्तीपत्र, रोटरी क्लब मुखेडकडून गुणगौरव, महात्मा फुले समाज रत्न पुरस्कार, मराठवाडा भूषण- वंजारी युवा संघटना महाराष्ट्र राज्य यांचा पुरस्कार, राज्यस्तरीय विद्यारत्न पुरस्कार, उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार, विमुक्त ग्रंथास वाड्.मय पुरस्कार, लोकमंगल सोलापूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार, ग्रंथमित्र पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार, ज्ञानदीपची दीपावली पुरस्कार, महात्मा कबीर समता परिषदेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठानचा माऊली रत्न पुरस्कार, महात्मा फुले सत्यशोधक शिक्षक पुरस्कार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा उत्कृष्ट ग्रामीण शिक्षक पुरस्कार असे अनेक पुरस्कार सरांना प्राप्त झाले आहेत. पुरस्कार प्राप्त करण्यासाठी सरांनी कधीही हेतू ठेवून कार्य केले नाही तर या सर्व नामांकित संस्थानी त्यांच्या कार्याचे कौतुक म्हणून त्यांना हे पुरस्कार प्रदान केले आहेत.
सरांनीही समाज ऋण फेडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मी गेल्या १७-१८ वर्षांपासून सरांच्या सहवासात आहे. वाचन लेखनाबद्दल सर मला नेहमी मार्गदर्शन करीत असतात. सर आणि मी मिळून अनेक ठिकाणी प्रवचने दिली आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सरांना अनेकदा व्याख्यानांसाठी निमंत्रित केले आहे.‌एक सत्शील प्रवृत्तीचे , निर्व्यसनी व्यक्तिमत्त्व म्हणून सरांना ओळखले जाते.
आज सरांचा जन्मदिन त्यानिमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन यापुढेही त्यांचे समाजोपयोगी कार्य निरंतर चालू राहावे अशी अपेक्षा करतो.

              प्रो.डॉ.अनिल मुंढे,
                मराठी विभाग, 
      महात्मा फुले महाविद्यालय,
            अहमदपूर जि.लातूर
      भ्रमणध्वनी- ९८८१८२८५६९

About The Author