रब्बी पीकपेरा नोंदणी ई-पीक पाहणी व्दारे करावी ; महसूल विभागाचे आवाहन
अतनूर (एल.पी.उगीले) : ई-पीक पाहणी अंतर्गत रब्बी हंगाम २०२२-२०२३ साठी पीकपेरा नोंदणीची सुरूवात झाली आहे. मोबाईलच्या माध्यमातून पेरा नोंदणीसाठी सुधारित व्हर्जनचे अॕप तयार केले असून शेतकऱ्यांनी रब्बी पीकपेरा नोंदणी करावी, असे आवाहन महसूल विभागाचे अतनूर सज्जाचे तलाठी अतीक शेख, महसूल चे नायब तहसीलदार राजाभाऊ खरात, तहसीलदार सौ.सुरेखा स्वामी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यात १५ आँगस्ट २०२१ पासून महाराष्ट्र शासनाचा ई-पीक पाहणी प्रकल्प संपुर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अंतर्गत खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करून या प्रकल्पास प्रतिसाद दिला होता. याप्रमाणेच रब्बी हंगाम २०२२-२०२३ मध्ये ई-पीक पाहणी मोबाईल अॕपव्दारे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेवटची तारीख ३१ जानेवारी आहे.
अतनूर सज्जा अंतर्गत अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, मरसांगवी व शिवाजीनगर तांडा येथील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे कि, रब्बी पीकपेरा नोंदणी ई-पीक पाहणी यात गहु, हरभरा, करडाई, राजमा, रब्बी, ज्वारी, मका, तीळ, सूर्यफुल आदी पिकांचा पेरा नोंदविता येणार आहे. या सुधारित अॕपमध्ये शेतकऱ्यांच्या प्रत्येक गटाच्या मध्यबिंदुचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले आहे.
पेरा नोंदणीसाठी पिकाचा फोटो घेताना ते फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदुपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पेरा नोंदणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल अॕपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पिकांचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही. हे लक्षात येईल. यामुळे पेरा नोंदविण्यासाठी आता त्या क्षेत्रातच जाऊन पेरा नोंदवावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदलेला पेरा स्वयंप्रमाणित मानण्यात येऊन, त्याची गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंद होणार आहे. शेतकऱ्यांनी रब्बीतील सर्वच पिकांचा पेरा ई-पीक पाहणी अंतर्गत नोंद करावी. असे आवाहन महसूल विभागाकडून तहसीलदार सौ.सुरेखा स्वामी, नायब तहसीलदार राजाभाऊ खरात, अतनूर सज्जाचे तलाठी अतीक शेख, कृषी विभागाकडून अतनूरचे कृषी सहाय्यक संदीप पाटील, शेतकरी गटाच्या वतीने कुणबी शेतकरी समूह गटाचे अध्यक्ष शेतकरी बी.जी.शिंदे यांनी केले आहे.
हरभरा विक्रीसाठी पेरा नोंदणी गरजेची आहे.
शेतकऱ्यांनी किमान हमी दरानुसार हरभरा शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी विर्कीपूर्व नोंदणी करावी लागते. या नोंदणीसाठी त्या शेतकऱ्याच्या सातबारा वर पीकपेऱ्याची नोंद आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात जाऊन पीकपेरा नोंदणी करणे गरजेचे आहे.असे तलाठी अतीक शेख, कृषीसहाय्यक संदीप पाटील, कुणबी शेतकरी गटाचे अध्यक्ष बी.जी.शिंदे यांनी सांगितले.