जाती अंताच्या लढ्याला गतीमान करने आवश्यक – बी.एल.खंदारे
अहमदपूर ( गोविंद काळे) : भारतीय समाज व्यवस्था जातीमध्ये विभाजित झाल्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण होत असुन जाती अंताच्या लढ्याला गतीमान करने आवश्यक असल्याचे प्रतिपादन हिंगोली येथील वक्ते डी.एल. खंदारे यांनी केले.
ते प्रबोधन शिबीर 2021 या ग्रुपवर आज दि. 11 मे 2021 रोजी दु. 2.00 वाजता गुगल मिटवर आयोजित कार्यक्रमात जाती अंताच्या लढाईतील आव्हाने या विषयावर आपले विचार मांडताना बोलत होते. यावेळी लसाकमचे संस्थापक नरसिंग घोडके, प्रदेश अध्यक्ष बालाजी थोटवे, प्रदेश महासचिव राजकुमार नामवाड, प्रदेश प्रवक्ता डॉ. मारोती कसाब, शिरीष दिवेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर दुवे, प्रा. बालाजी कारामुंगीकर यासह कार्यकारणीतील सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना डी.एल. खंदारे म्हणाले की, जात जी जात नाही ती जात, ज्या मानव समुदायाची खानपान, चालिरीती, संस्कार ज्या समुहात रोटी-बेटी व्यवहार होतात त्या समुहास जात असे म्हणतात. जातीसाठी माती खावी असेअसे म्हटले जाते परंतु जातीमुळे हीनतेची वागणुक मिळत असेल तर जात नाकारली पाहिजे. म्हणुन जातीसाठी अभिमान बाळगण्याची गरज नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ज्या जातीमध्ये मी जन्माला आलो त्या जातीमध्ये मरणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार आत्मसात करुन जाती अंतासाठी लढाई लढणे ही काळाची गरज आहे.आज बाबासाहेबांचे हे विचार समाजात मौखिक रुपाने पसरवणे अत्यंत आवश्यक आहे. जाती आणि धर्म हे सावलीसारखे आहेत. मरेपर्यंत आणि मेल्यानंतर ते आपली साथ सोडणार नाहीत. जात ही अस्मितेची बाब होवून बसली आहे. समाज वर्तमानात आर्थिक, राजकीय, शैक्षणिक परिस्थितीत मागासलेला आहे. समाजातील प्रचलित रुढी, प्रथा,परंपरा पाळत असताना आपण जातीप्रथा प्रबळ करत आहोत. जातीअंताची लढाई लढत असताना जातीयता नष्ट झाली पाहिजे. अंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानपीठ आहे त्यांची विचार आत्मसात केले म्हणजे जाती अंताच्या लढाईतील आव्हाने आपणास आपोआप समजतील. भारतातील जाती नष्ट झाल्या तर भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही असेही ते शेवटी म्हणाले.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात प्रदेश अध्यक्ष बालाजी थोटवे म्हणाले की, जाती अंताच्या लढाईतील आव्हाने समजुन घ्यावयाची असतील तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले तीन तत्वे आत्मसात केले तर जाती अंताच्या लढाईतील आव्हाने आपणास समजतील ती म्हणाजे सामाजिक न्यायाची घटनात्मक तरतुद, अंतरजातीय विवाहास प्रोत्साहन, धर्मग्रंथाची चिकित्सा. वर्तमानामध्ये जात प्रथा प्रबळ होत चालली आहे यासाठी अंतरजातीय विवाहाला मान्यता देणे आवश्यक आहे. बरबटलेल्या विचांराना नाकारले पाहिजे. यासाठी राष्ट्रपिता महात्मा फुले लिखित ब्राम्हणांचे कसब, बाबासाहेबांचे कास्ट्स इन इंडिया, चव्हाण यांचे जातीअंताची लढाई हे ग्रंथ वाचणे आवश्यक आहे असेही ते शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर सुत्रसंचलन बालाजी थोटवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदेश महासचिव राजकुमार नामवाड यानी मानले.