कोरोनामुळे आंबा व्यापाऱ्यांना आर्थिक फटका

कोरोनामुळे आंबा व्यापाऱ्यांना आर्थिक फटका

ग्राहकच नसल्याने मोठ्या प्रमाणात किंमती घसरल्या उलाढालीत तब्बल ६० टक्क्यांची घट

अहमदपूर (गोविंद काळे) : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. इतर व्यवसायांप्रमाणेच फळविक्रीही बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे व्यवसाय ठप्प झाल्याने लाखो रुपयांचे आंबे जागीच सडत असून, फळविक्रेते मोठ्या संकटात सापडले आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिकच गंभीर झाले आहे. कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. याअंतर्गत रुग्णालये व मेडिकल्स वगळता अन्य सर्व दुकाने, आस्थापना, फळविक्री सक्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्बंधामुळे फळविक्री करणाऱ्यांवर संक्रांत ओढवली असून ज्या व्यावसायिकांनी चिकू, अंगूर, पपई,टरबुज, खरबुज,यासह आंब्याचा स्टॉक करून ठेवला, त्यांच्याकडील फळे जागीच सडत आहेत. यामुळे फळविक्रेत्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
दरवर्षी अक्षयतृतीयेच्या अगोदर आंबा खरेदी-विक्रीत लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. मात्र यावर्षी लॉकडाऊन परिस्थितीने ग्राहकच नाहीत. परिणामी व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या व्यापाऱ्यांनी हापूस व इतर जातींच्या आंब्यांचा कोकण व अंध्रा प्रदेश, कर्नाटक, गुजरात
आदि भागातून मोठा साठा मागविला होता, ते व्यापारी आता मिळेल त्या किंमतीत विक्री करू लागले आहेत. त्यामुळे भावातही चांगलीच घसरण झाली आहे.
अक्षयतृतीयेच्या अगोदर आठवडाभर शहरासह तालुक्यात आंबा व्यापारात लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. अक्षयतृतीयेला आंब्यांची प्रचंड मागणी असते. त्यामुळे शहरातील अनेक व्यापारी विविध ठिकाणावरून आंब्याचा मोठा साठा मागवितात. तो साठा छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना विकतात. मात्र, यावर्षी उलट परिस्थिती आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अगोदर ऑर्डर दिलेल्या व्यापाऱ्यांचे आंबे आले. परंतु, आंब्यांना मागणीच नाही. बाजारपेठा बंद, शहरात कडक लॉकडाऊन अशा परिस्थितीत विक्रेत्यांनी व्यापाऱ्यांकडून आंबेच घेतले नाहीत. काही विक्रेत्यांनी बाजारात मागणी नसल्याने कमी दरात आंब्यांची मागणी केली. त्यामुळे व्यापाऱ्यांवरही दराचा विचार न करता मिळेल त्या किंमतीत आंब्यांची विक्री करण्याची वेळ आली आहे.
होम डिलिव्हरी व ओळखीच्या व्यक्तींमार्फतच विक्री करीत आहेत. व्यापाऱ्यांची गोदामांत आंबे पडून आहेत. अनेक व्यापाऱ्यांकडील माल खराब होत चालला आहे. भावात ५० टक्क्यांपासून ६० टक्क्यांपर्यंतही घसरण झालेली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसाठी यंदा आंबा गोड ठरण्याऐवजी कडू ठरला आहे.
शहरात कडक निर्बंध लादून विक्रेत्यांना घरोघरी जाऊन विक्री करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे विक्री करता येत नाही. ग्राहकांचाही उत्साह नाही. परिणामी केवळ ओळखीच्या व्यक्तींमार्फत जेवढी विक्री होईल, तेवढ्यावर व्यापाऱ्यांना समाधान मानावे लागत आहे. यात व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

आंबा विक्री करण्यास मुभा नाही. त्यामुळे गोदामात राहून आंबे खराब होऊ लागले आहेत. बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीवर थेट ६० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे. मागणीच नसल्याने भावातही मोठी घसरण झाली आहे.दरवर्षी अक्षयतृतीय आंबा विक्रीसाठी पर्वणी असते. मात्र, यावर्षी ग्राहकांकडून प्रतिसादच नाही. ग्रामीण भागातील गावरान आंबा तर विक्रीसाठीही आलेला नाही. बाहेरून मागविलेला हापूस, केसर, लालबाग, बदाम व इतर आंबे विक्रीअभावी खराब होऊ लागल्याने खरेदी किंमती पेक्षा कमी किंमतीत मिळेल त्या भावातच विक्री केली जात आहे.

  • जावेद फकीरसाब बागवान आंबा विक्रेता

About The Author