साहित्यरत्न अण्णाभाऊंना लातुरात अभिवादन!
लातूर (प्रतिनिधी) : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त आज 1 ऑगस्ट रोजी लातूर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हजारो मातंग समाज बांधव महिला-पुरुष नागरिकांनी अभिवादन केले.
अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने शहरांमध्ये मिरवणूक, मोटारसायकल रॅलीसह विविध कार्यक्रम घेण्यात आले. आज सकाळी राजीव नगर ते अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत साहित्य दिंडी काढण्यात आली. सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आण्णाभाऊंना अभिवादन करण्यात आले.
यावेळी दिलीपराव देशमुख म्हणाले की महामानवांची जयंती साजरी करीत असताना त्यांचे विचारच आपणास प्रगतीच्या मार्गावर नेत असतात. अण्णाभाऊंच्या लेखणीतून दिन-दलित, कष्टकरी व पीडित वर्गाला न्याय मिळाला आहे. अण्णाभाऊंचे साहित्य हे वास्तव्यवादी होते. छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ आदीसारख्या महामानवाने महाराष्ट्रात जन्म घेतला हे आपले भाग्य आहे असेही ती शेवटी म्हणाले.
यावेळी खा. सुधाकर शृंगारे यांनीही आपले मत व्यक्त करताना अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी मी संसदेत आवाज उठवणार असाही शब्द दिला.
यावेळी श्रीशैल्य उटगे,शिवाजीराव माने,ऍड. आण्णाराव पाटील, आबासाहेब पाटील, चंद्रकांत चिकटे, ऍड. किरण जाधव, पृथ्वीराज सिरसाट, शिक्षक आमदार विक्रम काळे, महापौर विक्रांत गोजगुंडे, देविदास काळे आदी मान्यवर उपस्थित होते.अण्णाभाऊ सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदेश शिंदे, विकास कांबळे, सुनील बसपुरे, अशोक देडे, आनंद वैरागे आदींसह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व मातंग समाज बांधव,नागरिकांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक देडे यांनी तर आभार सुनील बसपुरे यांनी मानले.