नवीन शैक्षणिक धोरण कौशल्य विकासासाठी पूरक – डॉ. दुर्गादास चौधरी
अहमदपूर ( गोविंद काळे)
येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या वतीने “नवीन शैक्षणिक धोरण ” या विषयावर महाविद्यालयाच्या सभागृहात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सुप्रसिद्ध लेखक तथा समीक्षक डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून ‘नॅक’ समन्वयक तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रो.डॉ. दुर्गादास चौधरी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे संयोजक प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सकारात्मक विचार मांडले.
यावेळी प्रमुख वक्ते प्रो. डॉ. दुर्गादास चौधरी म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण हे उपेक्षित, वंचित समूहातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणार असून, या धोरणामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या व्यवसायांचे कौशल्य अवगत करता येणार आहे. ‘नवीन शैक्षणिक धोरण- २०२०’ हे स्वतंत्र भारताचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करणारे व भारतीय शिक्षण प्रणालीत जागतिक शैक्षणिक प्रणालीशी सुसंगत असून या शैक्षणिक धोरणामध्ये खास करून उच्च शिक्षणात रोजगार निर्मिती, स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रेरणा व संधी या अनुषंगाने कौशल्य विकास शिक्षणावर भर देण्यात आलेला आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात सुप्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असे भाष्य केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य या प्रणालीने दिले आहे. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विद्यापीठात तसेच वेगवेगळ्या विद्याशाखेतील विषयात उच्च शिक्षण घेण्याची संधी या नवीन शैक्षणिक धोरणाने दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वच ज्ञान शाखांचा परिचय होणार आहे. यामुळे निश्चितच त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तीर्ण होणार आहेत. प्राध्यापकांनी देखील नवीन शैक्षणिक धोरणाचा सखोल अभ्यास व विचार करून विद्यार्थ्यांना अध्यायवत ज्ञान देण्यासाठी व त्यांना भावी जीवनात स्वावलंबी होण्यासाठी तसेच शिक्षण देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करावेत. नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवी परिवर्तनाची लाट निर्माण होणार आहे, असेही यावेळी सांगितले.
‘नवीन शैक्षणिक धोरण ‘ या विषयावर आयोजित केलेल्या या व्याख्यानास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र सहाय्यक डॉ. संतोष पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. सतीश ससाणे यांनी मानले.