पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचा बेमुदत संप चालू
उदगीर(एल.पी.उगीले) : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कायद्यामध्ये बदल करून, नवीन खासगी कॉलेजांना मान्यता देण्याचा निर्णयासह इतर मागण्यांसाठी राज्यातील सर्व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलनाला प्रारंभ केला आहे.
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर येथील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले असून अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त इतर सर्व सेवा व कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.
सरकार आणि विद्यापीठाने नवा डिप्लोमा सुरू करू नये,पशुवैद्यकीय श्रेणी – २ दवाखान्यांचे रुपांतर श्रेणी -१ मध्ये करुन पदवीधर विद्यार्थ्यांची तेथे नियुक्ती करावी, खासगी पशुवैद्यकीय कॉलेज सुरू करू नये, राज्यात पशू, दुग्ध आणि मत्स्य व्यवसायात अधिक प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे कारण देत खासगी पशुवैद्यकीय कॉलेज स्थापन करण्यास मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.यासह व्ही सी आयच्या नियमांना डावलून सरकार व विद्यापीठाने नवा डिप्लोमा सुरू करण्याचा घाट घातला आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्यातील सर्व पशु वैद्यकीय विद्यार्थी एकवटले असून, या विरोधात मागच्या सात दिवसापासून सर्व विद्यार्थी बेमुदत संपावर गेले आहेत.
विद्यार्थ्यांनी अगोदर प्रस्तावित नगर, जळगाव व अकोला येथील शासकीय महाविद्यालय सुरू करून, राज्यातील सर्व श्रेणी 2 चे दवाखाने श्रेणी 1 मध्ये रुपांतरीत करून तेथे पदवीधर पशुवैद्यक नेमावा अशी मागणी केली आहे.
सध्या नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठा अंतर्गत १० महाविद्यालयांमध्ये ५५७ पदवी आणि २१६ पदव्युत्तर प्रवेशांची क्षमता आहे. पशुवैद्यकीय विज्ञान विषयातील प्रस्तावित तीन वर्षांचा डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स सुरू करण्याची योजना आखली जात आहे. याला राज्यभरातील पशुवैद्यकीय विद्यार्थ्यां चा विरोध आहे. प्रस्तावित नवीन डिप्लोमा मुळे बोगस डॉक्टर तयार होण्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. या व इतर मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. जोपर्यंत राज्य सरकार या मागण्या मान्य करीत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे विद्यार्थीप्रमुख प्रितम येवारे यांनी सांगितले.