भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नाना पाटलांची सिंहाप्रमाणे कामगिरी – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नाना पाटलांची सिंहाप्रमाणे कामगिरी - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : क्रांतीसिंह नाना पाटलांनी १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्‍न सिंहाप्रमाणे केला, असे स्पष्ट प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर; एचडीएफसी बँकेचे कर्ज सल्लागार हुसेन पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाप्रसंगी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील पुढे म्हणाले की, नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून त्यांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देण्याचे काम नानांनी केले. नानांनी आपल्या भाषणांद्वारे ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेतले. स्वातंत्र्यलढा म्हणजे काय आणि तो का महत्वाचा आहे हे गावागावात पोहचवण्याचे काम क्रांतीसिंहांनी केले. असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी प्रो. डॉ.अनिल मुंढे, डॉ. मारोती कसाब, डॉ. सतीश ससाणे, डॉ. डी. एन. माने, शिवाजी चोपडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author