औराद शहाजानी तालुका करण्याची अभय साळुंके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

औराद शहाजानी तालुका करण्याची अभय साळुंके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

निलंगा ( प्रतिनिधी ) : लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाणाऱ्या औराद शहाजानी शहराला न्यायीक तत्त्वाने तात्काळ तालुक्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात सध्या महाराष्ट्र शासन आमच्या निलंगा तालुक्यातून कासारशिरसी हा तालुका करण्याच्या प्रयत्नात आहे, त्याच आम्ही स्वागत करतो. परंतु नैसर्गिक न्यायानुसार औराद शहाजानी या शहराचा तालुका दर्जा मिळण्याचा हक्क प्रथम आहे. कारण हे शहर निलंगा तालुक्यातीलच नव्हे तर लातूर जिल्हयातील मोठी बाजारपेठ आहे.लोकसंख्या विस हजारच्या आसपास आहे. या शहरात स्वतंत्र व जिल्हयातील तिसऱ्या क्रमांकाची उलाढाल असणारी औरादकृषी उत्पन्न बाजारसमिती आहे. स्वतंत्र पोलीस स्टेशन असून ३८ गावचे कार्यक्षेत्र आहे. कृषीमंडळात ४९ गावचे कार्यक्षेत्र आहे. महावितरणचे १५ गावांचे कार्यक्षेत्र असणारे कार्यालय आहे. अनेक कनिष्ठ महाविद्यालये व वरिष्ठ महाविद्यालये,डी.एड. कॉलेज या ठिकाणी आहेत. कपडा, सराफा, किराणाची मोठी व्यापारपेठ, दोन ऑईल मील, चार दालमील इतर अनेक छोटे- मोठे लघुउद्योग, ५०० पेक्षा अधिक व्यापारी प्रतिष्ठाने असून कर्नाटकातील सीमाभागातील किमान ७० गावांचे दैनंदिन व्यवहार येथे आहेत. जलविज्ञान प्रकल्प, हवामान केंद्र,भुकंप मापक केंद्र, अंगणवाडी उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय अनेक सुसज्ज खाजगी रुग्णालये, दुरसंचार कार्यालय, विभागीय पोस्ट ऑफिस इ. अनेक सुविधा आहेत. या तुलनेत २५ टक्के सुविधाही कासारशिरसी येथे नाहीत तरी शासन तेथे तालुका करत आहे. म्हणून हा औराद शहाजानी वर अन्याय आहे. नैसर्गिक न्याय प्रत्येकाला गुणवत्तेनुसार मिळावा हे घटनेचे मुलतत्व आहे. असे असताना औराद शहाजानीला तालुका दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्राधान्य द्यावे. तरच खरा न्याय होईल आणि तो आपल्या मार्फत होईल अशी अपेक्षा तालुक्यातील अठरापगड जातीधर्मातील प्रत्येकजण आपल्याकडून ठेवत आहे,तरी अपेक्षेला न्याय द्यावा. आपणच लक्ष घालणे आवश्यक आहे.कारण स्थानिक आमदार महोदयांनी २००४ च्या निवडणूकी पासून केवळ तालुका निर्मीतीचे आश्वासन देवून लोकांची फसवणूक केली आहे.त्यामुळे लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. तरी कृपया आपण औराद शहाजानी हा नविन तालुका तात्काळ घोषित करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

लवकरच जनआंदोलन उभे करणार – अभय साळुंके

औराद शहाजानी तालुका होण्यासाठी भौगोलिक दृष्ट्या कोणतीही आडचण नाही. मागच्या २० वर्षापासून येथील नागरिकांची मागणी असूनही केवळ स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे औराद शहाजानी तालुका झाला नाही. त्यांच्याच पक्षाचे आमदार तीन वर्षांखाली त्यांनी कासारसिरसीला दिलेला शब्द पुर्ण करताना दिसत आहेत. मात्र आमच्या आमदार महोदयांना २० वर्षात काहींच करता आले नाही. औराद शहाजानी शहर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या जनभावनेचा आदर करून औराद शहाजानी तालुका व्हावा यासाठी काॅग्रेस पक्षाच्या वतीने लवकरच जनआंदोलन उभा करणार असल्याचे अभय साळुंके यांनी सांगितले.

About The Author