उपजिल्हा रुग्णालय इमारतीच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता; लवकरच निधीची तरतूद करून घेणार – आ रमेशआप्पा कराड

उपजिल्हा रुग्णालय इमारतीच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता; लवकरच निधीची तरतूद करून घेणार - आ रमेशआप्पा कराड

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील मुरुड येथील उपजिल्हा रुग्णालय इमारतीच्या २५ कोटी ४७ लक्ष रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली असून या कामाकरिता सर्व संबंधित मंत्री महोदयाशी पाठपुरावा करून लवकरात लवकर शंभर टक्के निधीची तरतूद करून घेणार असल्याचे भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मुरुड येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन विशेष बाब म्हणून गेल्या ४ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मान्यता दिली. मुरुड येथे उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी निधीची तरतूद व्हावी यासाठी संबंधित मंत्री महोदय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी तोंडी मागणी करून पाठपुरावा केला. केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव ११ जुलै २०२३ रोजी झालेल्या उच्चाधिकार सचिव समितीने २५.४७ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास सहमती दर्शविली.

उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार १ ऑगस्ट २०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार मुरुड उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकाम अंदाज पत्रकास २५ कोटी ४७ लक्ष ३७ हजार रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

प्रशासकीय मान्यतेनंतर सदरील कामाकरिता निधीची तरतूद करणे महत्त्वाचे असून त्यानंतर जागेची प्रत्यक्ष पाहणी करून बांधकामाचा आराखडा तयार करणे ही प्रशासकीय बाब आहे. जनतेच्या प्रश्नांची जाणीव लक्षात घेऊन आणि वाढत्या रुग्णांची संख्या पाहता लवकरात लवकर सदरील मुरुड उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकाम व इतर कामाकरिता अंदाजपत्रकानुसार निधी उपलब्ध व्हावा याकरिता राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे आरोग्यमंत्री माननीय तानाजी सावंत साहेब यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून शंभर टक्के सदरील मुरुड उपजिल्हा रुग्णालयाकरिता निधीची तरतूद करून घेतली जाईल असे भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले.

About The Author