महात्मा बसवेश्वरांचे विचार जगात पोहचावे यासाठीसमग्र महात्मा बसवेश्वर ग्रंथाची निर्मिती केली – प्रा.सुदर्शनराव बिरादार
औसा (प्रतिनिधी) : बाराव्या शतकातील महान समाजसुधारक जगद्ज्योती महात्मा बसवेश्वरांनी त्या काळात केलेले कार्य हे खुप महान आहे. त्यांचे विचार व वचन साहित्य मानवजातीसाठी खुप मोलाचे आहेत. महात्मा बसवेश्वरांचे आचार विचार जगासाठी प्रेरक आहेत. म्हणून ते सर्वांपर्यंत पोहचावेत यासाठीच समग्र महात्मा बसवेश्वर या ग्रंथाची निर्मिती केली असल्याचे मत समग्र महात्मा बसवेश्वर ग्रंथाचे लेखक तथा लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी औसा येथील हिरेमठ संस्थान मठात शांतवीरलिंग शिवाचार्य महाराजांच्या मार्गदर्शनाखाली लिंगायत महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ वितरण सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी जगाला समतेची शिकवण दिली. श्रमाला कैलासाचा दर्जा मिळवून दिला. दासोह तत्व दिले. आपणास वचन साहित्य दिले. एक पुरोगामी विचार व जीवनाचे तत्व बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी जगाला दिले. मात्र त्यांचे विचार हे कन्नड भाषेपुरतेच मर्यादित राहिले आहे. मराठी भाषिकांना महात्मा बसवेश्वर समजण्यास खुप उशीर झाला. आता मराठी भाषेत लिखान येत आहे. लिंगायत समाजाबरोबर समस्त बसवप्रेमी वाचकांना महात्मा बसवेश्वर समजावेत म्हणून मी या ग्रंथाची निर्मिती केली आहे. महात्मा बसवेश्वरांचे विचार जगात पोहचविण्यासाठी सर्व प्रसिध्दी माध्यमांचा वापर केला पाहिजे. तसेच दिल्ली येथे महात्मा बसवेश्वरांच्या जीवन कार्यावर व त्यांच्यावर माहिती देणार्या केंद्राची स्थापना व्हायला पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी औसा येथील असंख्य समाजबांधवांना समग्र महात्मा बसवेश्वर ग्रंथाचे मोफत वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी हिरेमठ संस्थानचे नुतन शिवाचार्य, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुभाषअप्पा मुक्ता, लिंगायत महासंघाचे विश्वनाथ मिटकरी, केवलराम गुरूजी, प्रा.युवराज हालकुडे, प्रा.एस.बी.आष्टुरे, धनराज मिटकरी, जयश्रीताई उटगे, वैजनाथ शिंदुरे, अमर रड्डे, बाबा स्वामी, गुरूमुर्ती स्वामी, प्रणव नागराळे सह असंख्य महिला व युवक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशन कोलतेंनी केले तर सुत्रसंचलन प्रा.युवराज हालकुडे यांनी केले तर आभार शिवाजी भातमोडे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिंगायत महासंघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले