उदगीर जिल्हा निर्मितीसह विविध विषयावर राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत ना. बनसोडे यांची चर्चा

उदगीर जिल्हा निर्मितीसह विविध विषयावर राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत ना. बनसोडे यांची चर्चा

उदगीर (एल.पी.उगीले) : मागील काही वर्षात राज्य सरकारकडे विविध माध्यमातून जिल्ह्याचे विभाजन करून नवे जिल्हे निर्माण करण्याची मागणी होत आहे. लातूरच्या नंतर उदगीर तालुका हा सर्वात मोठा तालुका असून भविष्यात जिल्हा निर्मिती करत असताना उदगीर तालुक्याचा विचार करून उदगीर जिल्हा करावा. अशी चर्चा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.संजय बनसोडे यांनी केली आहे.

व्यापारी व शैक्षणिक दृष्ट्या उदगीर शहर हे परिपूर्ण असून उदगीर तालुका हा जिल्हा व्हावा. म्हणून विविध प्रकारची आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले असून भविष्यकाळात उदगीर जिल्हा व्हावा. अशी मागणी या भागातील नागरिकांची असल्याने येत्या काळात उदगीर जिल्हा निर्माण करावा.

महाराष्ट्रातील नव्याने होत असलेल्या जिल्हा निर्मितीची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात नव्या जिल्हा निर्मितीचे निकष ठरवण्यासाठी शासनाने एक समिती ही स्थापन केली होती. उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी मागील अनेक वर्षापासून असल्याने यावेळी नविन जिल्हा निर्मितीची घोषणा करताना उदगीरचा समावेश व्हावा, अशी चर्चा ना.बनसोडे यांनी केली. त्यासोबतच मतदार संघात मराठा समाज बांधवांची लक्षणीय संख्या असून त्यातच उदगीर तालुक्यात मराठा समाजाच्या मुला मुलींची संख्या जास्त आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात वसतीगृह उभारावे, अशी मागणी येथील समाज बांधवांची असल्याने भविष्यात मराठा समाजासाठी वसतिगृहाची उभारणी करणे गरजेचे आहे. व जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या नावे ग्रामपंचायत पर्यंत लागू होणारी शासनाची ध्येय उद्दिष्ट पूर्ण योजना राज्यात लागू करावी. समाजात पुढच्या पिढीला संस्कार देण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्रातील कीर्तनकार मंडळींना मानधन देण्यात यावे. यासह विविध विषयावर यावेळी महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत ना.बनसोडे यांनी चर्चा केली.

यावेळी कीर्तनकार शिवराज नांवदे गुरुजी,भाजपचे प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे,जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव कुणाल बागबंदे आदी उपस्थित होते.

About The Author