ग्रंथांच्या वाचनातूनच व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो – डॉ. बब्रुवान मोरे
अहमदपूर (गोविंद काळे) : जे लोक इतिहास विसरतात ते पुन्हा गुलाम होतात, गुलामीतून कायमचे मुक्त होण्यासाठी ऐतिहासिक ग्रंथा बरोबरच इतर ग्रंथ ही वाचली तर ; आपल्या अस्तित्वाची जाणीव होते आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असे स्पष्ट प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘क्रांती दिनाचे ‘ व ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथालयशास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्रंथालयाचा परिचय व प्रथम वर्षातील नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रम व जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते. तसेच, विचार मंचावर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, प्रमुख पाहुणे डॉ. बब्रुवान मोरे, कार्यक्रमाचे संयोजक ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. मोरे म्हणाले की, नियोजनबद्ध जीवन जगत असतांना महाविद्यालयीन नियमांचे पालन करणे हे विद्यार्थ्यांची आद्य कर्तव्य आहे. तसेच, विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच, आपण ध्येयापर्यंत निश्चित पोहोचू शकू. त्याकरिता विद्यार्थ्यांनी आळशी वृत्ती त्यागने आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारंभाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी पुस्तके वाचलीच पाहिजेत, जो पुस्तक वाचतो ; त्यांनाच माणसे ताबडतोब ओळखू येतात. कारण लेखक साहित्य आपल्या अनुभवातून लिहीत असतो. पुढे बोलतांना म्हणाले की, आजही आपण क्रांती दिन साजरा करतो पण आजची क्रांती भ्रष्टाचार, पर्यावरणाचा होणारा -हास, दहशतवाद, बेकारी, वाईट व्यसन, आदि ना ‘चले जाओ ‘ म्हणण्यासाठी साजरी करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. यावेळी जेष्ठ सामाजिक विचारवंत महात्मा फुले चे अभ्यासक डॉ. हरी नरके यांचे दुःखद निधन झाल्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाचे नियम सांगून व महाविद्यालयाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. या कार्यक्रमाच्या प्रारंभी कु. ऋतुजा देशमुख, कु. पायल मंडले, कु. वैष्णवी मंडले या विद्यार्थिनी स्वागतगीताच्या माध्यमातून मान्यवरांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागातील प्रोफेसर ह . भ.प.डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांनी केले व आभार इंग्रजी विभागप्रमुख तथा आय. क्यू. ए. सी. चे समन्वयक प्रा.अतिश आकडे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.