युवाशक्ती हीच आपल्या राष्ट्राच्या विकासाचे बलस्थान- प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

युवाशक्ती हीच आपल्या राष्ट्राच्या विकासाचे बलस्थान- प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

अहमदपूर, ( गोविंद काळे )
युवकांनो आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. परंतु, आता लक्ष भारतीय स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवाकडे आहे. सन २०४७ पर्यंत भारत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र फक्त युवाशक्तीच्या जोरावरच बनू शकतो. कारण, युवाशक्ती हीच राष्ट्राच्या विकासाचे बलस्थान आहे, असे स्पष्ट प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मेरी माटी, मेरा देश ‘ या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील बोलत होते. यावेळी विचार मंचावर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, संयोजक डॉ. पांडुरंग चिलगर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश ‘ हा उपक्रम हाती घेतला असून, या उपक्रमांतर्गत आपल्याला आपल्या देशाचा समृद्ध वारसा तर निश्चितच कळेल, त्याचबरोबर आपण आपल्या देशाचे नागरिक म्हणून आपले कर्तव्य इमानदारीने पार पडले तर; निश्चितच भारत बलशाली राष्ट्र बनेल आणि २०४७ पर्यंत ‘आत्मनिर्भर’ आणि ‘विकसित राष्ट्र’ बनण्याचे जे आपण स्वप्न पाहत आहोत ते युवकांनो, तुमच्या जातील सुप्त शक्तीवर अवलंबून आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी व उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी ही मनोगत व्यक्त केले तर ; कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांना ‘पंच प्रण’ सामूहिक शपथ दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागातील प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर ; प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी केले व आभार डॉ. मारोती कसाब यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author