विद्यार्थ्यांनी समाजाशी संवादी राहिले पाहिजे – ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द.मा. माने

विद्यार्थ्यांनी समाजाशी संवादी राहिले पाहिजे - ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द.मा. माने

महात्मा फुले महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा संपन्न

अहमदपूर ( गोविंद काळे) : आजच्या जागतिकीकरणाच्या काळात जग जवळ आले असूनही माणसं मात्र दूर चालली आहेत. सार्वजनिक ठिकाणीही लोक एकमेकांशी न बोलता मोबाईलमध्ये गुंग असतात, हे चांगल्या समाजाचे लक्षण नसून, पदवीधर विद्यार्थ्यांनी आपल्या आणि समाजाच्या भल्यासाठी सतत समाजाशी संवादी राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. माने यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या पदवी वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ लोकसाहित्यिक तथा शिक्षण तज्ज्ञ माजी प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर हे होते, तर संयोजक म्हणून ज्येष्ठ पत्रकार, तथा लेखक व समीक्षक, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रा. माने म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा सामाजिक दृष्ट्या वापर केला पाहिजे. केवळ रील्स न पाहता समाजातील विविध प्रश्नांवर निर्भीडपणे व्यक्त झाले पाहिजे. सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी विद्यार्थ्यांनी मूक न बसता मुक्त संवाद साधावा असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे संयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी यावेळी महाविद्यालयाच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीची माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली. गुणवत्तापूर्ण शिक्षणासह शिस्त, संस्कार आणि व्यक्तिमत्वविकासाचे धडेही या महाविद्यालयातून दिले जातात, हे महाविद्यालय म्हणजे केवळ गुणवत्तेचे माहेरघर नसून, सामाजिक संस्काराचे विद्यापीठ आहे असेही ते यावेळी म्हणाले. अध्यक्षीय समारोप करताना लोकसाहित्यिक माजी प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वैयक्तिक हिताबरोबरच सामाजिक हिताला प्राधान्य द्यावे. आपल्या शिक्षणाचा उपयोग महाराष्ट्रासाठी करावा आणि राष्ट्राची एकात्मताही जोपासावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले, तर शेवटी सर्वांचे आभार उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी यांनी मानले. यावेळी नूतन पदवीधर विद्यार्थी तसेच आजी-माजी विद्यार्थी, पालक- कर्मचाऱ्यांसह प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author