प्रतिभेच देणं लाभलेला निसर्ग कवी हरवला – गणेश हाके
अहमदपूर ( गोविंद काळे )ज्येष्ठ साहित्यिक, रान कवी, सुप्रसिद्ध गीतकार, प्रतिभेच देणं लाभलेला निसर्ग कवी ना.धों. महानोर हा तारा निखळला आहे. त्यांच आपल्यातून अचानक जाण हे जीवाला चटका लावून जाणार आहे.असं मत श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके यांनी संत ज्ञानेश्वर विद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केले आहे. प्रारंभी ना.धों. महानोर व कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.
गणेश दादा हाके पुढे बोलताना म्हणाले की, नितीन देसाई हे कलाक्षेत्रातील आधुनिक विश्वकर्मा होते. या दोघांच्या अचानक जाण्याने कला व साहित्य क्षेत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. लोकप्रिय कवी ना.धो.महानोर यांनी जे जगलं, जे अनुभवलं ते त्यांनी मांडलं आहे. आपण जे कार्य करतो त्यावर खूप निष्ठा ठेवा. प्रेम करा.असं आवाहन गणेश दादा हाके यांनी केले आहे.
यावेळी संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे,मुख्याध्यापक मीना तोवर, नंदकुमार मध्येवाड सह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख संगीता आबंदे यांनी केले तर आभार सतीश साबणे यांनी मानले.