विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती सोबतच व्यक्तिमत्व विकासाची बीजे पेरली पाहिजेत – श्रद्धा जगताप
उदगीर (एल.पी.उगीले) : नव्या पिढीला सक्षम आणि सर्वगुणसंपन्न बनवायचे असेल तर विद्यार्थ्यांना बालवयातच राष्ट्रभक्ती, सामाजिक जाणीवा आणि व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीच्या संदर्भात मूलभूत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी शिक्षकांनी वेगवेगळी व्यासपीठे निर्माण करणे ही गरजेचे आहे. असे विचार सामाजिक कार्यकर्त्या तथा भारतीय जनता पक्षाच्या लातूर जिल्हा सरचिटणीस सौ. श्रद्धा संजय जगताप यांनी व्यक्त केले.त्या हैदराबाद शहरातील समता नगर भागात असलेल्या एस पी टी ओक्स ट्री प्ले स्कूल शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
याप्रसंगी या शाळेतील सहशिक्षिका श्रीमती श्रुती, श्रीमती निर्मला, श्रीमती सुजाता आणि शारीरिक शिक्षक रवी सर तसेच पालक वर्गातून बिंदा ठाकूर, लक्ष्मीदेवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास सांगताना स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतःचे आयुष्य आणि संसाराचा विचार न करता देशाच्या विकासाचा आणि स्वातंत्र्याचा पहिल्यांदा विचार केला. वेळप्रसंगी जीवावर बेतले तरी हरकत नाही, पण देश स्वातंत्र्य झालाच पाहिजे. ही जिद्द आणि हे राष्ट्रप्रेम त्यांनी जपले म्हणून आपण आज स्वातंत्र्याचा आनंद उपभोगत आहोत. हा भारतीय स्वातंत्र्याचा जाज्वल इतिहास विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवला गेला पाहिजे. तेव्हा त्यांच्या मनामध्ये प्रखर राष्ट्रभक्ती तसेच राष्ट्रप्रेम निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि विकासासाठी भावी पिढी सक्षम बनली पाहिजे, आणि हे कार्य करण्यासाठी शिक्षकच समर्थ आहेत, असे सांगितले.