नारायणा महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू – निवृत्ती सांगवे
उदगीर (एल.पी.उगीले) उदगीरच्या शैक्षणिक परंपरेमध्ये भर घालत, नवीन नवीन दालने विद्यार्थ्यांना पादाक्रांत करता यावीत, या उद्देशाने उदगीर येथे नारायणा कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि नवीन क्षेत्रात करिअरची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण वचनबद्ध आहोत, असे विचार राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा एम आय एम चे विभागीय सचिव निवृत्तीराव सांगवे यांनी व्यक्त केले. ते आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास सांगितला. कु. कल्याणकर श्वेता, कु. कल्याणकर श्रावणी यांनी याप्रसंगी उपस्थितांचे मने जिंकणारे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते निवृत्तीराव सांगवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, उदगीर शहराच्या शैक्षणिक विकासामध्ये हातभार लावणाऱ्या या महाविद्यालयाच्या 30 विद्यार्थिनींसाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य आपल्या वतीने भेट देऊन तसेच भविष्यातही या महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायणा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या प्राचार्य रूपाली साबळे या होत्या. त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, या संस्थेचे अध्यक्ष प्रा. राम गायकवाड यांनी उदगीर येथे फॅशन डिझाईनचे कॉलेज सुरू करून ग्रामीण भागातील मुलींना त्यांचे करिअर निर्माण करण्याची सुवर्णसंधी दिली आहे. भविष्यामध्ये या महाविद्यालयातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. याचा फायदा जास्तीत जास्त मुलींनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. “मेरी माटी, मेरा देश” या उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्या कु. प्रेरणा मुंगे हिला प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कसबे रिंकी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक गौरव बच्चेवार यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील संपूर्ण कर्मचारी वर्ग तसेच पालक व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.