शेतकऱ्यांनी दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीचा ब्रँड बनवावा – डॉ. अनिल भिकाने

शेतकऱ्यांनी दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीचा ब्रँड बनवावा - डॉ. अनिल भिकाने

उदगीर( एल.पी.उगीले) दुधातून प्रतिजैविकांचे अंश(रिसीड्यूज) मानवी शरीरात जाऊन मानवामध्ये प्रतिजैविकांचा प्रतिकार करणाऱ्या जिवाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे, यामुळे शेतकऱ्यांनी कमीत कमी प्रतिजैविकांचा व किटनाशकांचा वापर होण्यासाठी रोगनियंत्रण उपाय योजनांची प्रभावी अमलबजावणी करून स्वच्छ दूध निर्मिती व अंश विरहित दूध व दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करून आपली आर्थिक उन्नती साधावी . तसेच या अंश रेसीड्यू मुक्त दुधाला जागतिक बाजारपेठेतही मोठी मागणी आहे, व दरही जास्त आहे. असे प्रतिपादन माफसुचे विस्तार शिक्षण संचालक डॉ . अनिल भिकाने यानी केले .
ते माफसू अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर व पशुसंवर्धन खाते उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पशुधन जागरुकता अभियाना अंतर्गत आयोजित वध्यंत्व निवारण शिबीर तथा चर्चासत्रात बोलत होते. सदरील कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकार च्या पशुसंवर्धन मंत्रालयातर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कार्यक्रम संयोजक तथा पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालय, उदगीर चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी भूषविले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. नानासाहेब सोनवणे, जिप मुख्याधिकारी प्राजंल शिंदे , जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ गौरीशंकर हुलसुरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार धवलशंख, डॉ. संजय लोंढे आणि डॉ. नागनाथ पानढवळे, श्री. कुणाल घुंगार्डे, सरपंच श्री पोपट मोरे,उपसरपंच श्रीमती कोमल दळवे आदी उपस्थीत होते.
तांत्रीक चर्चासत्रात डॉ. अनिल पाटील, डॉ. अशोक भोसले व डॉ प्रफुल्ल पाटील यानी अनुक्रमे पशु वध्यंत्व , सांसर्गिक गर्भपात व पशु आहार याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी ब्रुसेल्ला रोगचाचणीचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.
तत्पुर्वी सकाळच्या सत्रात संपन्न झालेल्या भव्य पशु वंध्यत्व निवारण शिबीरात पशुप्रजनन तज्ञ तथा कार्यक्रम समन्वयक डॉ अनिल पाटील व डॉ अनुजकुमार कोळी व इतर पदव्युत्तर विद्यार्थीच्या चमुने ११५ गाई म्हशी ची तपासणी करून उपचार केले .
कार्यक्रम आयोजनासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप दळवे, डॉ.संतोष तांबडे, डॉ टकले , डॉ.ज्ञानेश्वर बाबर, डॉ.गोविंद मंगनाळे, डॉ.ओंकार देशमुख व मदर डेअरीचे चेअरमन श्री खंडू दळवे यांनी विशेष सहकार्य केले. तसेच या शिबिराचे सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रेय इंगोले यांनी केले.
या कार्यक्रमास यशस्वी दूध उत्पादक शेतकरी मोहन दळवे ,काका मोरे सह गाव परिसरातील महिला , शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…………………………………
दुग्ध व्यवसातून उत्पन्न अधिक मिळवण्यासाठी उच्च वंशावळीच्या कालवडीची पैदास , मुक्त संचार गोठ्या चा अवलंब , समतोल आहार व सुयोग्य रोगनियंत्रण उपाययोजना या चतुसुत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे
दूध व्यवसायातून दुप्पट उत्त्पन्न करणेसाठी व यशस्वी दुग्ध व्यवसायासाठी अत्यंत कमी खर्चातील मुक्त संचार गोठा पद्धती,त्याची उभारणी व त्यामध्ये गोचीड,कीटक नियंत्रणासाठी कोंबड्यांचा वापर करावा यातून दुध उतपादन वाढीस लागून शेतकऱ्यांना अंडी उत्पादनही होईल. मुरघास निर्मिती, गोठ्यावर कृत्रिम रेतनासाठी लिंग वर्गीकृत वीर्य कांड्यांचा वापर, वर्षाला वित घेण्याचे नियोजन तसेच शेतकऱ्यांनी फक्त दूध उत्पादन न करता त्या दुधाचे प्रॉडक्ट्स बनवून स्वतःचा ब्रँड बनवावा याविषयी तज्ञानी मार्गदर्शन केले.

About The Author