युवकांनी शूर-वीरांचा इतिहास समजून घ्यायला हवा – मा.विश्वनाथ मुडपे
उदगीर (एल.पी.उगीले) : देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक तरुणांनी प्राणाची आहुती दिली. कुटुंबाकडे दुर्लक्ष करून वनवास, तुरुंगवास भोगले. म्हणून भारताला स्वातंत्र्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या अशा शूर-वीरांचा इतिहास तरुणांनी समजून घेतला पाहिजे,असे विचार राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे यांनी व्यक्त केले.
श्री हावगीस्वामी महाविद्यालयात निबंध, वक्तृत्व – वादविवाद मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने माझी माती माझा देश या अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विश्वनाथ मुडपे यांचे जे देशासाठी लढले या विषयावर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर तर मंचावर उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे व पांडुरंग बोडके उपस्थित होते. सुरुवातीला संजना सकट व मोनिका स्वामी या विद्यार्थिनींने स्वागतगीत सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ.म.ई.तंगावार यांनी करून दिला.
पुढे बोलताना विश्वनाथ मुडपे म्हणाले, मातृभूमी व सैनिकाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी असे काही कायदे केले होते की, त्यामुळे लोकांची कोंडी होत होती. ते भारतीयांमध्ये फूट पाडत होते. अशा काळात महात्मा गांधी, लोकमान्य टिळक व सुभाषचंद्र बोस इत्यादी लोकांनी त्याग केला.त्यातून तरुण पेटून उठले. खरे पाहिले तर स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्त्रियांचा देखील सिंहाचा वाटा होता, पण इतिहासाच्या अभ्यासकांनी याकडे दुर्लक्ष केल्याची खंत त्यांनी व्यक्त केले.यावेळी त्यांनी १८५७ च्या उठावापासून १९४७ पर्यंतचे अनेक संदर्भ, प्रसंग सांगत देशभक्तीपर गीत सादर करून विद्यार्थ्यांना अंतर्मुख केले.
देशभक्ती व राष्ट्रभक्तीची भावना अशा कार्यक्रमातून निर्माण होत असते, असे शुभेच्छापर मनोगतात उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे यांनी म्हटले.अध्यक्षीय समारोपात प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर म्हणाले, संस्कृती व सभ्यता तरुणांमध्ये अधिक चांगल्या प्रमाणे रुजली पाहिजे. जे देशासाठी लढले त्यांच्याविषयी आदर असायलाच हवा. अशा अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादाचे वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्यास मदत होते.
याप्रसंगी निबंध,वक्तृत्व व वादविवाद मंडळाचे या शैक्षणिक वर्षातील अध्यक्ष कु.राधा चिवटे व सचिव विशाल गोटमुकले यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.राधा चिवटे तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी
प्रा.धनराज बंडे यांनी मानले.