महाविद्यालयीन जीवनातच सर्जनशीलतेचे संस्कार होतात – कवी अनिल चवळे
अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयातील विविध भाषा विभागाच्या अभ्यास मंडळांचे उद्घाटन
अहमदपूर ( गोविंद काळे ) : जीवन जगत असतांना प्रतिकूल परिस्थिती अनुकूल कधी बनते कळत नाही ; त्यामुळे जीवनात नैराश्य न येऊ देता आई- वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून जीवन जगले तर कुठल्याही परिस्थितीत माणूस यशस्वी होतो याची जाणीव ठेवणा-या विद्यार्थ्यांवर महाविद्यालयीन जीवनात लेखनाच्या सर्जनशील संस्कार होऊन तोच विद्यार्थी पुढे भविष्यात नवोदित साहित्यिक म्हणून नावारूपाला येतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध पर्यावरणवादी कवी तथा विचारवंत अनिल चवळे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभ्यास मंडळ उद्घाटन व भित्तीपत्रक प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी साहित्याचे ज्येष्ठ साहित्यकार तथा समीक्षक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर विचारमंचावर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना अनिल चवळे म्हणाले की, निस्वार्थ आणि निस्सिम प्रेम करणारं एकच नातं असतं ते म्हणजे आईचं ! आई म्हणजे आभाळ धरती, आई म्हणजेच स्वर्ग आणि आई म्हणजेच सर्वस्व… कुठलाही स्वार्थ मनात न आणता आपल्या मुलांबाळांसाठी आपले आयुष्य समर्पित करीत असते. त्या आईच्या वेदना ज्यांना समजतात तेच संवेदनशील मनाचे कवी होतात. असेही ते म्हणाले. याकरिता विद्यार्थ्यांनी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या आई- वडिलांचे जीवन वाचता पाहिजे, त्या वाचनातून जीवनाचे तत्वज्ञान कळते, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मराठी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘आविष्कार ‘ , हिंदी विभागाच्या ‘प्रयास ‘ , संस्कृत विभागाच्या ‘संस्कृत सुधा ‘ व इंग्रजी विभागाच्या ‘डेपोडिल्स ‘ या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य तथा शीघ्र कवी डॉ. दुर्गादास चौधरी यांनी मनोगत व्यक्त करून कविता सादर केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी मराठी, हिंदी. इंग्रजी व संस्कृत भाषेतील साहित्य परंपरेचा आढावा घेतला. तसेच, भाषा ही भावभावना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे साधन आहे, ज्यांना भावना कळतात त्यांच्यासाठी व्याकरण महत्त्वाचे नसते, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागातील ज्येष्ठ प्रोफेसर ह. भ. प.डॉ. अनिल मुंढे महाराज यांनी तर ; प्रास्ताविक हिंदी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. पांडुरंग चिलगर यांनी व प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार यांनी करून दिला तसेच आभार इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. अतिश आकडे यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.