दुग्धोत्पादनातून साधली शाश्वत प्रगती- एक यशोगाथा
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील वाढवणा या गावचे राजेंद्र सुधाकर जोशी यांनी शेती सोबत दुग्ध व्यवसायास सुरुवात करून आज शेतीसोबत दुधव्यवसायातून एक शाश्वत रोजगार साधला आणि ग्रामीण बेरोजगार तरुणापुढे एक आदर्श ठेवला आहे. राजेंद्र यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण झाल्यामुळे सुरुवातीस काही काळ शासकीय नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, नोकरी मिळणे दुरापास्त असल्याचे निदर्शनास आल्याबरोबर त्यांनी शेतीची कास धरली.
वडीलोपार्जित शेती आणि ती पण कोरडवाहु. त्यामुळे उत्पन्नाला मर्यादा येत होती. पुढे त्यांनी सिंचनाची सुविधा निर्माण करून ऊस लागवड केली. परंतु त्यातही उत्पन्नात सातत्य नव्हते. करीता प्रारंभी एक म्हैस घेतली. रोज ४ ते ५ लिटर दूध मिळत होते. म्हशीपासून दूध उत्पन्न मिळू लागल्यामुळे दैनंदिन गृह खर्च भागू लागला. दुग्ध व्यवसायात रुची निर्माण झाली. अशातच पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर
येथील डॉ. काळे व डॉ. कोकाटे यांचा वर्ष २०१९ मध्ये संपर्क झाला. त्यांच्याकडून दुग्धव्यवसायसंबंधी
प्रशिक्षण घेतले. शास्त्रीय माहिती मिळाली. खुराक खाद्य, खनिज मिश्रण, विविध चारापिके, जंतनिर्मूलण,
लसीकरण इत्यादिबाबत डॉ. काळे व डॉ. कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामुळे पशूखाद्यावरील खर्च
कसा कमी करता येईल याबाबत माहिती मिळाली. डॉ. काळे व कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली धारवाड
नेपियर चारापीक आणून एक एकर शेतीत लागवड केली. आज पशुधनास दररोज हिरवा चारा ते देतात.
कुट्टी यंत्र त्यांनी घेतले. त्यामुळे चारा बचत होत असल्याचे ते म्हणाले.
आजमितीस त्यांच्याकडे एकाच म्हशीच्या तीन म्हशी झाल्या. सोबतीला दोन जर्सी गाई खरेदी
केल्या. सरासरी रोज २२ ते २५ लिटर दूध मिळू लागले. खाजगी डेअरीकडून प्रती लिटर ४१ रुपये दर
मिळतो. असे सरासरी रोज ९०० ते १००० रुपये दूध विक्रीतून त्यांना प्राप्त व्हायला लागले. खर्च वजा
जाता महिन्याला दुधातून सरासरी १८००० रुपये शिल्लक राहतात. दूध उत्पन्नासोबत पशुधनापासून
मिळत असलेल्या शेणखतामुळे शेतीचे उत्पन्न वाढल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. शेती आणि दुधातून
आज ते मासिक एक लाख रुपये कमवितात. आपल्या यशाचे श्रेय ते डॉ. काळे व डॉ. कोकाटे यांना देतात.
दुग्ध व्यवसायात त्यांच्या आईचा सुद्धा हातभार त्यांना मिळतो. पुढे अजून पशुधन वाढवायचे, कमीतकमी
दैनिक १०० लिटर दूध उत्पादन घ्यायचे आणि दुधाचे मूल्यवर्धन करून उत्पादने विकायची अशी इच्छा
त्यांनी व्यक्त केली. त्यांचा मुलगा पुण्यात फार्मसीचे शिक्षण घेत आहे. बेरोजगार युवकांनी शेती किंवा
पशुपालन करतांना तो व्यवसाय म्हणून करावा. त्यातील बारकावे शिकावे, समजून घ्यावे. शासकीय नोकरी
मागे न लागता अशा व्यवसायातून सुद्धा भरघोस आर्थिक उत्पन मिळू शकते असा विश्वास त्यांनी दर्शविला.