मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर शेळीपालनातून महिलेने साधली आर्थिक उन्नती : एक यशोगाथा
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडी गावच्या सुनिताताई सूर्यवंशी या दहावी अनुत्तीर्ण महिलेने मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर शेळीपालनात आर्थिक उन्नती साधली असून अल्पभूधारक, बेरोजगार तरुण, आणि बचत गटातील महिलासमोर एक आदर्श ठेवला आहे.
सुनीताताई या रुक्मिणी महिला बचत गटाच्या सदस्य आहेत. त्यांचे पती बालाजी सूर्यवंशी हे शिरूर अनंतपाळ येथे मेकानिक चा स्वताचा व्यवसाय करतात. मात्र जेमतेम १.१० एकर शेती असल्यामुळे उत्पन्नाची मर्यादा असल्यामुळे मुलामुलीचे शिक्षण पूर्ण करणे त्यांच्यासमोर गंभीर समस्या होती. परंतु सदर व्यवसाया च्या सहायाने त्यांचा मुलगा एमबीए आणि मुलगी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. त्यांनी २०१९-२०२० मध्ये महाराष्ट्र शासनाच्या विशेष घटक योजनेअंतर्गत शेळीगटाच्या वाटपाबाबत माहिती घेतली आणि अर्ज केला. सुदैवाने त्यांची निवड झाली. योजनेत त्यांना १० शेळ्या व १ बोकड या देण्यात आले. परंतु शेळी पालनाविषयी असे कोणतेही विशेष प्रशिक्षण घेतले नव्हते. शेळी पालन विषयी विस्तृत माहिती मिळावी आणि शेळी पालन अधिक फायदेशीर कसे करता येईल, यासाठी त्यांनी डॉ. गोल्हेर प्रत्यक्ष भेटून व तसेच डॉ. लक्ष्मीकांत कोकाटे सहायक संचालक,मपमविवि उपकेंद्र उदगीर यांच्या सह फोनद्वारे चर्चा करून सदर व्यवसायाची सुरुवात केली. एक गुंठयात नेपियर गवत पिकाची लागवड केली. शेळ्या चारण्यासाठी पडीक जमीन भाडेतत्वावर घेतात.त्यांना लागणारे व्यावसायिक शेळी संगोपन या विषयी मार्गदर्शन डॉ. लक्ष्मीकांत कोकाटे आणि डॉ. गोल्हेर हे करत आहेत.
आज रोजी त्यांचाकडे २४ शेळ्या, ३ बोकड आणि ३५ करडे आहेत.सरासरी वर्षाला २५ ते ३० करडे नळेगाव बाजारात विकतात आणि त्यापासून वर्षाला साडेतीन लाख रुपयाचे उत्पादन होत असून त्यापैकी सव्वातीन लाख हा निव्वळ नफा गाठीशी उरत आहे. सदर व्यवसाय ते झेरो इनपुट या तत्वावर करत असून भविष्यात त्याना पूर्णपणे बंदिस्त व्यवसाय करण्याची योजना असल्याचे त्याने सांगितले आहे.
शेळी पालनातील यशाचे श्रेय ते डॉ. दुर्गेश गोल्हेर आणि डॉ. लक्ष्मीकांत कोकाटे यांच्यामार्फत वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनाला त्या देतात. शेळीतून होत असलेल्या आर्थिक उत्पन्नामुळे आर्थिक उन्नतीसोबत शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात त्यांना शेळी व्यवसाय अजून वाढवायचा आहे. योग्य दिशा मिळाल्यास शेळीपालनात आर्थिक उन्नती साधता येते हे त्यांनी आपल्या मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर बेरोजगार युवक, भूमिहीन अल्पभूधारक शेतकरी आणि बचत गटातील महिला यांचेसमोर आदर्श ठेवलेला आहे.