दलितमित्र, शिक्षण महर्षी, आदर्श संस्थाचालक डी.बी. लोहारे गुरुजी – राम तत्तापुरे
शिक्षण महर्षी, दलित मित्र, सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देणारे कर्मयोगी आदरणीय डी.बी. लोहारे गुरुजीं यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना यशवंत परिवार आणि संबंध अहमदपूर शहरवासी यांच्या वतीने वाढदिवसाच्या मनःपूर्वक आभाळभर लाख लाख शुभेच्छा.
शिक्षण महर्षी डी बी अर्थात धुंडीराज भुजंगराव लोहारे गुरुजी यांचे शिक्षण क्षेत्रातील व समाज क्षेत्रातील कार्य अथांग महासागरासारखे आहे .
डी.बी. लोहारे गुरुजीचा जन्म दि. १२ फेब्रुवारी १९३४ रोजी चिखलात कमळ फुलावे या उक्तीप्रमाणे अहमदपूर तालुक्यातील मुळकी उबंरगा येथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या एका शेतकरी कुटुंबात झाला .
अगदी लहान वयातच वडिलांचे छत्र हरवलं.त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची अत्यंत दयनीय अवस्था झाली.त्यांचे प्राथमिक शिक्षण अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथे मामाच्या गावी झाले.
गुरुजी आपल्या आईला सर्वस्वी मानून आईच्या आज्ञेनुसार वागत. गुरुजींच्या आईचे नाव गंगाबाई तर वडिलांचे नाव भुजंगराव असे होते.
स्वर्गीय गंगाबाई ही गंगेसारखी पवित्र,मोठ्या मनाची, तहानलेल्या पाणी, भुकेलेलेल्या अन्न, गरीब होतकरू मुलांना शाळेत जाण्यास प्रवृत्त करी. दारावरचा भिक्षुक देखील रिकाम्या हाताने कधी परत जाऊ दिला नाही. अशी ही अन्नदात्री आई गुरुजींना लाभलेली होती. ” आईसारखे दैवत सा-या जगतामध्ये नाही.” या उक्तीप्रमणे दररोज आईचे राम प्रहारी दर्शन, आर्शिवाद घेऊनच गुरुर्जीची दैनंदीनी सुरु होत असे.
प्राथमिक शिक्षण अंधोरीत, माध्यमिक शिक्षण अहमदपूर येथे घेऊन पुढील शिक्षणासाठी ते नंदिग्राम अर्थात नांदेड नगरीत आले . त्यावेळी त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत बेताची, हालाखीची होती. त्यांनी पार्ट टाइम नोकरी करत बी ए पदवीचे शिक्षण घेतले.
या वेळी हैदराबाद मुक्ती लढ्यातील प्रमुख सेनानी स्वामी रामानंद तीर्थ, मुक्ती लढ्यातील प्रमुख कार्यकर्ते गोविंदभाई श्रॉफ, राष्ट्रसंत परमपूज्य डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा अनमोल सहवास लाभल्यामुळे त्यांच्या विचारात बदल झाला .समाजसेवेचा, शिक्षण चळवळीचा प्रवास सुरू झाला . त्यामुळे त्यांचे सामाजिक विचार प्रगल्भ झाले आणि अनेक संस्कारक्षम मित्र जोडले गेले.
शिक्षण व समाजसेवेचा वसा घेऊन गुरूजीनी आपल्या शैक्षणिक कार्याचा श्री गणेशा केला .
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नांदेड येथील शिक्षण संस्थेत काम करून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या जन्मभूमीत म्हणजे अहमदपूर तालुक्यातील मुळकी उबंरगा येथे ग्रामीण भागातील गोरगरीब, दीनदलित, पीडित, शेतकरी, मुलां मुलींना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने त्यांनी 1962 साली शांतिनिकेतन विद्यालयाची स्थापना केली.
ग्रामीण भागामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी अहमदपूर येथील यशवंत विद्यालयाची उभारणी राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रेरणेने केली आणि ज्ञानगंगेचे तोरण बांधले.
त्यानंतर तालुक्यातील कुमठा येथील सरस्वती विद्यालय,रोकडा सावरगाव येथील बापुजी विद्यालय, धनेगाव येथील महादेव विद्यालय, कबन सांगवी येथील महात्मा फुले विद्यालय,धामनगांव येथील संत भगवान बाबा विद्यालय, येस्तार येथील साने गुरूजी विद्यालय, मुरढव येथील पद्मावती विद्यालय, अहमदपूर शहरातील यशवंत बालवाडी,यशवंत प्राथमिक विद्यालय, यशवंत माध्यमिक विद्यालय, यशवंत तांत्रिक विद्यालय, यशवंत कनिष्ठ महाविद्यालय आणि डॉक्टर एस एस एम प्रतिष्ठानचे यशवंत अध्यापक महाविद्यालयाच्या गुरुजींनी सुसज्ज इमारती व मैदानासह शाळा स्थापन करून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा यज्ञ चालू केला.
महात्मा गांधी यांच्या उक्ती प्रमाणे लोहारे गुरुजी म्हणत की, जोपर्यत खेडयांचा विकास होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही.
हा मंत्र ध्यानी धरुन गुरुजींनी सर्व शाळा विशेष करून ग्रामीण भागात चालू केल्या.
यामुळे शेतक-यांच्या, शेतमजुरांच्या, दीनदलितांच्या मुलांना शिक्षणाची दारे उघडी झाली. मुळकी- उंबरगा हे गाव डोंगराळ भागात वसलेले, या गावात व आजूबाजूच्या परिसरात शिक्षणाची कोणत्याही प्रकारची सोय सुविधा नव्हती म्हणून लोहारे गुरुजींनी गोरगरीब दिनदलीत मुलांच्या शिक्षणासाठी मूळकी उबंरगा येथे पहिल्या आदर्श वस्तीगृहाची मुहूर्त मेढ रोवली.
आर्थिक परिस्थितीशी सामना करत पुढे आलेल्या अनेक प्रश्नांचे धैर्याने निराकरण करून वस्तीगृह चालूच ठेवले. त्यामुळे हजारो विद्यार्थी वस्तीगृहात शिक्षण घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध पदावर अतिशय उल्लेखनीय काम करत असून यशवंत विद्यालयाचे माजी विद्यार्थी माजी राज्य मंत्री विनायकराव पाटील यांचेही कार्य उल्लेखनीय अशा स्वरूपाचे आहे.
त्यात महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात या वस्तीगृहाच्या माजी विद्यार्थी मंत्री अविनाश घाटे यांनी अत्यंत उल्लेखनीय काम केले आहे.
आमच्या विद्यालयाचा लाडका माजी विद्यार्थी विलास बडे यांनीही पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे.
गुरुजींनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त, प्राणायाम, ध्यान, योगासने, वेळेचे बंधन, वाचन, चिंतन, मनन, मौन, राष्ट्र चेतना व राष्ट्र जागृती चा मंत्र दिला. हा मंत्र घेऊनच विद्यार्थी संबंध देशभर वावरताना दिसत आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि अडचणीतून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वास्तव्याचा व खर्चाच्या सुविधा अभावी प्राथमिक शिक्षणापासून दूर राहावे लागत असे. जातीय व्यवस्थेच्या पगड्यामुळे दलितांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अडचण दूर करून अनेक ठिकाणी ग्रामीण भागात मागासवर्गीय मुलांसाठी वस्तीगृहाची स्थापना केली.
आर्थिक दुर्बलता, शैक्षणिक जाणीवांचा अभाव, अंधश्रद्धा, शिक्षण कमी, दारिद्र्यामुळे मागासवर्गीयांच्या मुलांपासून शिक्षणाची गंगा कोसो दूर होती. ही ज्ञानगंगा दलितांच्या घरी पोहोचवण्याचे कार्य सातत्याने गुरुजींनी केले.
महाराष्ट्राची भूमी ही संतांची, महंतांची, समाजसेवकांची, सुधारकांची भूमी म्हणून ओळखली जाते.
जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे की, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपले, तोचि साधू ओळखावा, देव तेथे ची जाणावा.
हा संदेश आपल्या कार्यातून गुरुजींनी यशस्वी करून दाखवला. म्हणूनच शासनाने राज्य पातळीवरील दलित मित्र पुरस्कार 1995 साली त्यांना बहाल केला.
सोबतच शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 1998 साली त्यांच्या कार्याकडे पाहून प्रधान केला.
विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली,
नीतीविना वित्त गेली,
वित्ता विना शुद्र खचले,
सारे अनर्थ एका अविद्येने केले.
या महात्मा फुले यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या गुरुजींनी स्त्री शिक्षणाला अनन्य साधारण अशा स्वरूपाचे महत्त्व दिले. म्हणून आपल्या धर्मपत्नीला यशवंत बालवाडी आणि नंतर प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणून काम करण्याची संधी दिली.
त्यांच्या अर्धांगिनी सौ. पुष्पाताई लोहारे या अतिशय मेहनती, शिस्तप्रिय, लहान मुलांत एकाग्र होऊन अध्ययन करत असत. मुले हीच आपले दैवत समजून त्यांनी बालकांचा पाया पक्का केला.
आजही त्यांच्या शाळा संस्काराची खान म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध आहेत.
शिक्षण क्षेत्र हे त्यांचे जीवन भराचे कार्यक्षेत्र राहिले, समाजसेवा हाच त्यांनी आपला जीवन धर्म मानला. आपल्या निरपेक्ष कार्यातून आणि स्वावलंबनशील वृत्तीतून समाजसेवकांचा, उपासकांचा एक उदंड आदर्श निर्माण केला.
शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण संस्थांच्या कार्याची सुरुवात कशी असली पाहिजे हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. त्यामागे असणाऱ्या नेतृत्वगुणांचा, संघटन कौशल्याचा आणि प्रभावी परिणामकारक व्यवस्थापन दृष्टीचा एक आदर्श अशा स्वरूपाचा वस्तू पाठ त्यांनी निर्माण केला.
माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते ही माणुसकी गुरुजींच्या व्यक्तिमत्वातून आणि कार्यातून दिसून येते. सुंदर मैत्री भाव, मनाचा मोठेपणा, व्यापक समज, सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या अंगी असल्यामुळे माणसं जोडणं हिच त्यांनी आपली संपत्ती मानली.
लोहारे गुरुजी हे अहमदपूर पॅटर्नचे जनक असून यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी असताना शालांत प्रमाणपत्र परीक्षेत मीनाक्षी सुभाषराव नलाबले ही महाराष्ट्रातून सर्वप्रथम आली.
शाळा स्थापनेपासूनच यशवंत विद्यालयाचा प्रतिवर्षी यशाच्या चढता आलेख असून सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षाचा निकाल शेकडा 99 टक्के असून शाळेतून 100% चे 18 मुले आहेत. हे विशेष होय.
महाराष्ट्रातील 151 विद्यार्थी 100% चे त्यात यशवंत विद्यालयाचे 18 मुलं ही बाब सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्याजोगी आहे.
यासोबतच यशवंत विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल, एन.एम.एम.एस.स्पर्धा परीक्षेचा निकाल, गणित अध्यापक मंडळाचा निकाल, एम.टी.एस.,एन. टी.एस.स्पर्धा परीक्षेचा निकाल जवाहर नवोदय परीक्षेचा निकाल या विविध स्पर्धा परीक्षेमध्ये नेत्र दीपक अशा स्वरूपाचे यश संपादन केलेले असून क्रीडा क्षेत्रातही नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
शाळेला खादीचा शंभर टक्के गणवेश, गीताई वाचन, माता पिता पालक योजना महाराष्ट्राला शिक्षण क्षेत्राला दिशादर्शक ठरली आहे.
मलखांब, लेझीम, बास्केटबॉल, हँडबॉल यांच्यासह तलवारबाजी क्रीडा प्रकारात तर आमच्या विद्यालयाचा साईराज जंगवाड यांनी सुवर्णपदक तर दिव्यांका कदम यांनीही सुवर्णपदक हस्तगत केले आहे.
आज 90 व्या वर्षी सुद्धा गुरुजी जातीने शालेय व्यवस्थापनामध्ये विशेष लक्ष देत असून त्यांच्या सोबत त्यांच्या कन्या प्रा. डॉक्टर सुनिता ताई चवळे लोहारे, संस्थेचे अध्यक्ष डॉ.अशोकराव सांगवीकर, मातोश्री पुष्पाताई लोहारे, उपाध्यक्ष डॉ.भालचंद्र पैके, सेवानिवृत्त अभियंता तथा कवी अनिलजी मुळे, संस्थेचे सदस्य अभियंता उत्तमराव बिराजदार यांच्या सह विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे मोठे योगदान असल्याकारणाने या संस्थेचे व शाळेचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर कोरले असून महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षण संस्थेचा पुरस्कार प्राप्त करणारी लातूर जिल्ह्यातील ही एकमेव संस्था आहे.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
पुन्हा एकदा गुरुजींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक आभाळभर शुभेच्छा देतो. गुरुजींना आरोग्य संपन्न 100 वर्ष आयुष्य लाभावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
राम तत्तापुरे,
पर्यवेक्षक,तथा महाराष्ट्र शासनाचा महात्मा बसवेश्वर समता शिवा पुरस्कार विजेते,
यशवंत विद्यालय, अहमदपूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर