वाचन संस्कृतीच्या विकासासाठी ग्रंथपालये केंद्रबिंदू – ग्रंथमित्र शिरसे
उदगीर (एल. पी. उगीले) : नव्या पिढीला समृद्ध वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचनालय, ग्रंथालय अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना इतर कामे लावली जात असल्यामुळे वाचन संस्कृतीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना केवळ आणि केवळ ग्रंथालयाशी निगडित कामेच लावावीत. अशी सूचना ग्रंथालय चळवळीचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक ग्रंथमित्र सूर्यकांत शिरसे यांनी व्यक्त केले. ते उदगीर नगर परिषदेच्या वतीने हुतात्मा स्मारक सार्वजनिक वाचनालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उदगीरचे उपविभागीय अधिकारी तथा नगर परिषदेचे प्रशासक सुशांत शिंदे हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सुंदर बोंदर हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी सतीश बेलापट्टे, अभियंता शुभम मटके, इसबा सिद्दीकी, सरदार पटेल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कुलकर्णी, महेश विद्यालयाचे सचिव प्रवीण बिरादार, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते रामेश्वर बिरादार नागराळकर, लक्ष्मण फुलारी (भालके), श्रीमती सुजाता बिरादार, विश्वनाथ मानसे, विजया एल्गुलवार, योगिता पाटील, सुवर्णा तांबोळी, सचिन पारखे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नगर परिषदेचे प्रशासक सुशांत शिंदे यांनी सांगितले की, नगरपरिषदेच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या ग्रंथालया मध्ये समृद्ध अशी ग्रंथसंपदा आहे. वाचक प्रेमींनी याचा लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी चौफेर वाचन करून ज्ञानसाधना करावी. वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही, आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी चौफेर ज्ञान मिळवावे, तसेच येणारे युगे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा. त्यासाठी पुस्तकांना मित्र बनवा, जे निस्वार्थपणे ज्ञानदान करतात, असेही आवाहन केले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी मुख्याधिकारी सुंदर बोंदर म्हणाले की, मी स्वतः एक वाचक आहे, मला वाचण्याची आवड आहे. या वाचनाच्या आवडीमुळे स्पर्धा परीक्षेमध्ये मला यश मिळवता आले. याची जाण ठेवून नगरपरिषदेच्या वतीने चालणाऱ्या ग्रंथालयामध्ये दर्जेदार ग्रंथ खरेदी करावी या दृष्टीने विशेष प्रयत्न करून ही खरेदी केली आहे. या ग्रंथांची ओळख उदगीरकरांना व्हावी, यासाठीच ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रंथालयाचे ग्रंथपाल ज्ञानेश्वर पारसेवार यांच्यासह सर्वच कर्मचारी प्रामाणिकपणे कार्य करत असल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा पी. एम. देवशेट्टे यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल ज्ञानेश्वर पारसेवार यांनी केले.