कलियुगातील ईश्वरी अवतार डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज – रामलिंग तत्तापूरे
अहमदपूर (गोविंद काळे) : सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे,विज्ञान व अध्यात्माची सांगड घालणारे, अंधश्रद्धेपासून समाजाला मुक्त करणारे, राष्ट्राभिमान शिकविणारे, स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठवाड्यातील पहिले एम.बी.बी.एस. डॉक्टर वयाच्या 104 व्या वर्षापर्यंत समाजप्रबोधन करणारे, महामानव राष्ट्रसंत, वसुंधरारत्न, कलियुगातील ईश्वरी अवतार, अतुलनीय व्यक्तिमत्व, ज्यांच्या नावातच शिव आणि लिंग आहे असे प्राप्तस्मरणीय, वंदनीय, आदरणीय डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना जयंती दिनाच्या निमित्ताने मनःपूर्वक आप्पांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत…
या देशामध्ये जोपर्यंत सूर्य,चंद्र,तारे आहेत .तोपर्यंत आप्पांच्या महान कार्य अजरामर राहणार आहे.
पिता विश्वनाथ स्वामी व माता प्रयागबाई यांच्या पोटी गुरूवर्यांचा जन्म दि. 25 फेब्रुवारी 1917 रोजी अहमदपूर वरवाळ राजुर येथे झाला.
वयाच्या तिसऱ्या वर्षी म्हणजे 1920 मध्ये गुरु मडिवाळ शिवाचार्य महाराज यांच्या स्वाधीन करण्यात आले तर वयाच्या विसाव्या वर्षी सन 1937 मध्ये माघ वद्य सप्तमीला गुरुवर्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा पट्टाभिषेक करण्यात आला.
बाळ शिवलिंग हे सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य झाले. शिवाचार्य झाल्यानंतर तीनच महिन्यांनी ज्ञानप्राप्तीसाठी ते 1937 साली रवाना झाले.
श्रावण शुद्ध प्रतिपदेपासून एकवीस दिवस आवडते क्षेत्र कपिलधार येथे पहिले अनुष्ठान केले.
आजतागायत 2020 मध्ये म्हणज काही दिवसापूर्वीच श्रावण महिन्यात 84 वे तपोअनुष्ठान नुकतेच पार पडले आहे. प्रतिवर्षी या अनुष्ठानात कडुनिंबाचा रस व पाणी सेवन करून वाचन-लेखन,चिंतन, मनन व तपसाधना करत असत.
स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1945 साली लाहोर विद्यापीठातून त्यांनी एम.बी.बी.एस. पदवी घेतली.
1947 साली भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला व दोन वेळा तुरुंगवासही भोगला. फाळणी काळात सिंध प्रांतात संघाचे प्रसारक म्हणून कार्य केले.
वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतरही त्यांनी जेथे आदिशक्ती पार्वती माता यांचा जन्म पर्वतावर झाला तेथे भगवान शंकराने तपश्चर्या केली अशा पवित्र स्थानी अन्नाशिवाय फळे व कंदमुळे सेवन करून अडीच वर्षाचा काळ हिमालयात व्यतीत केला हे विशेष होय.
वीरशैव लिंगायत धर्माचा पाया महात्मा बसवेश्वरांनी रचला तर कळस राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी चढवला आहे.
बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर सोळाव्या शतकात संत शिरोमणी मन्मथ स्वामी तर विसाव्या शतकात राष्ट्रसंत सद्गुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे कार्य अजरामर आहे.
त्यांनी लाखो भक्तांना अज्ञांनाकडून ज्ञानाकडे, अधर्माकडून धर्माकडे,भक्ती कडून मुक्तीकडे, जिवाकडून शिवाकडे जाण्याचा मार्ग दाखवला. व्यक्तीची जात, कुळ, गोत्र न पाहता ज्ञानाची मुक्तहस्ताने उधळण करणारे, मानवता हा एकच धर्म आहे असे शिकविणारे, घराघरातील तीन-चार पिढ्यांना म्हणजे लाखो भक्तांना शिवदीक्षा देणारे माझे गुरु माऊली महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातील तमाम भक्तासाठी कल्पवृक्षाची सावली आहेत.
राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अर्थात गुरुमाऊली शेवट च्या श्वासापर्यंत पर्यंत स्वावलंबी जीवन जगले.
स्वतःची सर्व कामे स्वतःच करत. स्वतःच्या हाताने बनविलेले फक्त 16 घास अन्न ग्रहण करत असत. 104 वर्षाच्या काळात जीवन भर एक ही रूपयांचा दक्षिणा म्हणून स्वीकारला नाही.
भक्ताने पुष्पहार, शाल किंवा उपहार अर्पण केला तर त्यांचा त्यांना परत करत असत. इतके ते विरक्त होते. याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत.
महाराष्ट्रातील एका भक्तांनेवीस तोळ्याचा मुकूट राष्ट्रसंतांना जयंती दिनाच्या निमित्ताने अर्पण केला होता पण क्षणाचाही विलंब न लावता तो भक्ताच्या डोक्यावर अर्पण केला .
आज पर्यंत दररोज शंभर-दोनशे रुग्णांना मोफत तपासत असत. दुर्धर आजारही त्यांच्या औषधाने कमी होत. याचा हजारो भक्ताने अनुभव घेतला आहे.
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींचे कार्य राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या सारखे आहे. चापोली ते कपिलधार पदयात्रा गेल्या सहा दशकांपासून काढून भजन,कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून लोक जागृती करून समाजाला दिशा देण्याचे काम करत आहेत.
अंधश्रद्धा,अस्पृश्यता,जातिभेद, मानवता, राष्ट्रभक्ती,भ्रूण हत्या, रक्तदान,वृक्षारोपण, स्वच्छता,व्यसनमुक्ती अशा ज्वलंत समस्यांना आळा घालण्याचे कार्य त्यांनी जीवनभर केले आणि ते करण्यासाठी समाजाला प्रोत्साहन देण्याचे काम केलं आहे.
लाखो लोक पायी दिंडी मध्ये प्रतिवर्षी सहभागी होतात. पंढरपूर सारखंच कपिलाधार येथे राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रांतातून पायी दिंड्या येतात.
गुरुवर्य मराठी,कन्नड, संस्कृत,हिंदी,इंग्रजी, उर्दू व पंजाबी अशा सहा भाषांतून प्रभावीपणे आपले विचार मांडत असत. अध्यात्मिक कार्या सोबतच शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य होते.
साहित्य क्षेत्रातही श्री परमरहस्य,शिवानंद बोध,स्वयंप्रकाश, वीरशैवत्कर्षण, गुरुगीता,बसवपुराण, रत्नत्रय असे त्यांचे 20 ग्रंथसंपदा प्रकाशित आहेत.
कर्म हीच पूजा माना आई-वडिलांची, समाजाची, रराष्ट्राची,देशाची सेवा करा. निस्वार्थी जीवन जगा. चोरी, भ्रष्टाचार करू नका. असा संदेश आपल्या प्रवचनातून, कीर्तनातून देत असत.
वास्तव आणि सत्य त्यांचे बोल असल्याने त्यांच्या शब्दाला भक्तांनी प्रमाण मानले.वयाच्या 104 वर्षापर्यंत ही त्यांची प्रकृती ठणठणीत होती. कसलाच आजार नव्हता परंतु कोणाची नजर लागली की चार दिवसातच होत्याचे नव्हते झाले. संपूर्ण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगना, कर्नाटक पोरके झाले.सतत समाजाच्या भल्याचा विचार आपल्या कृतीतून चालू ठेवणारा एक दिप आता मालवला आहे.
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी देह ठेवल्यामुळे सर्व भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला परंतु आपण दुःखाला सावरून त्यांनी आयुष्यभर आपल्या आचरणातून, कृतीतून दिलेला विवेकाचा जागर पुढे सुरू ठेवणे गरजेचे आहे.
रामाची मुर्ती ज्या दगडामध्ये निर्माण करण्यात आली त्या निल शालीग्राम दगडामध्ये समाधी अत्यंत कलाकुसरीने अत्यंत लक्षवेधी निर्माण केलेली आहे.
राष्ट्रसंत परमपूज्य डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज संजीवन समाधी शिवलिंग प्रतिष्ठापना सोहळा विधी, धार्मिक पूजा केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते दि 23 रोजी अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी प्रारंभी भक्ती स्थळापासून या सोहळ्याच्या निमित्ताने वीरमठ संस्थानापासून भक्तीस्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी, वीरमठ संस्थांचे उत्तर अधिकारी राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, हाडोळती मठाचे मथाधीपदी अभिषेक शिवाचार्य महाराज यांची सजवलेल्या रथामध्ये शहराच्या प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढून त्यांचा समोर भक्ती स्थळावर करण्यात आला. या सोहळ्याला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्म दिवस 25 फेब्रुवारी असल्याने त्यांच्या जीवनावर टाकलेला हा अल्पसा परिचय.