छत्रपती शाहू महाराज: लोककल्याणकारी राजा!

छत्रपती शाहू महाराज: लोककल्याणकारी राजा!

“26 जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झाला. शाहू महाराजांनी त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यात लोककल्याणाचे व समाज उद्धाराचे कार्य केले. महाराष्ट्र शासनामार्फत हा दिन संपूर्ण राज्यात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच राज्य शासन सामाजिक न्याय विभागामार्फत विविध लोककल्याणकारी योजना राज्यातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवत आहे. शाहू महाराजांनी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात केलेल्या कार्याची महती…”छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१७ मार्च १८८४) छत्रपती शाहू महाराजांवर महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा मोठा प्रभाव होता. छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील महात्मा फुले यांचे खरेखुरे वारसदार होते. सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हिंदुस्तानला आवश्यकता आहे असे सांगून त्यांनी कोल्हापूर संस्थानात शिक्षणासाठी सवलती जाहीर केल्या.

महाराष्ट्राने छत्रपती शाहू महाराजांचा शेतकऱ्यांचा खरा राजा म्हणून गौरव केला. भारतातील वस्तीगृहाचे आद्य जनक म्हणून छत्रपती शाहू महाराजांचा गौरव केला जातो. ते कल्याणकारी राजा होते. एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धाराचे कार्य करणाऱ्या अखिल भारतवर्षीय क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपुर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात शाहू महाराजांना त्यांच्या कार्याबद्दल राजर्षी ही पदवी बहाल करण्यात आली.

कार्य

ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणाऱ्या विविध जाती-धर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृह स्थापन शाहू महाराजांनी केली. तर सन 1901 मध्ये मराठा विद्यार्थ्यासाठी विक्टोरिया मराठा बोर्डिंग ची स्थापना कोल्हापूर येथे केली. तर नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारून शहरी भागात विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था केल्याने त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य झाले. सन 1902 मध्ये शाहू महाराजांनी राज्यातील मागासवर्गीयांसाठी प्रशासकीय सेवा मध्ये 50 टक्के जागा राखीव ठेवल्या. तसेच महाराजांनी 15 नोव्हेंबर 1906 किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सन 1907 मध्ये मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना अस्पृश्य विद्यार्थ्यासाठी करून त्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. सन 1911 मध्ये कोल्हापूर संस्थानात जाहीरनामा काढून त्यानुसार 15 टक्के विद्यार्थ्यांना नादारी देण्याची घोषणा करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली केली. शाहू महाराजांनी 1911 मध्ये शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना राबवले. तर 1917 मध्ये आदेश काढून माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. व कोल्हापूर संस्थानातील गोरगरीब घरातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. 14 फेब्रुवारी 1919 पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू करण्याचा जाहीरनामा काढला.

बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता. लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूल सुरू केले व पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल तर जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूट ची स्थापना करून शाहू महाराजांनी तांत्रिक शिक्षणाला महत्त्व देण्याबरोबरच लष्करी शिक्षणाची दारे खुली केली. शाहू महाराजांनी सन 1917 मध्ये विधवा विवाहाचा कायदा करून पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली
तर 1918 मध्ये आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केला. व समाजातील अनिष्ठ चाली-रीती वर हल्ला चढवला. 1918 मध्ये महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी ने करून दिल्या व वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली व 1920 मध्ये माणगाव अस्पृश्यतानिवारण परिषदेचे आयोजन केले. छत्रपती शाहू महाराज यांनी व्यवसाय निर्बंध दूर करून अस्पृश्यांना व्यवसाय स्वातंत्र्य दिले. जातिभेदास तीव्र विरोध केला महाराजांच्या या सर्व लोक कल्याणकारी कार्यामुळे खरेखुरे लोककल्याणकारी राजा होते. पददलित व मागासवर्गीयांचे उन्नती हेच छत्रपती शाहू महाराजांनी जीवितकार्य मानले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही अशी घोषणा त्यांनी केली. उदार विचारप्रणालीचा राजा होते. राज्य सोडावे लागले तरी बेहत्तर पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही, असे शाहू महाराजांनी ठासून सांगितले. कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या असा संदेश त्यांनी दिला.

“He was a king.But democratic king”. असे उद्गार भाई माधवराव बागल यांनी शाहू महाराजांबद्दल काढले. तर थोर समाज सुधारक वि. रा. शिंदे शाहू महाराजा बद्दल म्हणाले की, शाहू राजा नुसता मराठा नव्हता ब्रह्मतोतर ही नव्हता. तो नव्या युगातील सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष होता. तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होता.

सुनील सोनटक्के
जिल्हा माहिती अधिकारी

About The Author